मध्यप्रदेशात गोव्याची कोळसा खाण

0
108

गोव्याला मध्यप्रदेश राज्यात एक कोळसा खाण मंजूर झाली आहे. या कोळसा खाणीबाबत केंद्र सरकार आणि आयडीसी यांच्यात सामंजस्य करार येत्या १० ऑक्टोबरला केला जाणार आहे, अशी माहिती गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ग्लेन टिकलो यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

या कोळसा खाणीबाबत सामंजस्य करार केल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. कोळसा खाणीतून वीज निर्मिती व इतर बाबतीत सल्लागाराची नियुक्ती करून आवश्यक आराखडा तयार करून घेतला जाणार आहे, असे मंडळाचे अध्यक्ष टिकलो यांनी सांगितले.

गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर मंडळाचे अध्यक्ष टिकलो यांनी ही माहिती दिली. सरकारच्यावतीने आयडीसीने कोळसा खाणीसाठी अर्ज केला होता. आणखी एका कोळसा खाणीसाठी अर्ज करण्यात आलेला आहे. कोळसा खाणी मिळविण्यासाठी आणखी अर्ज केले जाणार आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली.