मद्य घोटाळ्यात अबकारी खात्याचे अधिकारी

0
8

>> आप प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांचा आरोप

बेकायदा मद्य प्रकरणातील संशयितांना मदत करणारे गोव्यातील अबकारी खात्यातील काही अधिकारी बेकायदा मद्य घोटाळ्यामध्ये गुंतले आहेत, असा आरोप आपचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी पत्रकार परिषदेत काल केला.

गुजरातमधील आंतरराज्यीय दारू तस्करीप्रकरण ज्याचे मूळ गोव्यात आहे. गोव्यातून कर्नाटकमध्ये चोरट्या मार्गाने मद्याची वाहतूक केली जाते. त्याबाबतचे पुरावे आमच्याकडे आहेत. गोवा राज्य बेकायदा मद्य व्यापारासाठी हॉटस्पॉट बनले आहे, असा दावा पालेकर यांनी केला.

राज्य सरकारचा अबकारी विभाग, गोवा पोलीस आणि सीमा तपासणी नाके यांच्याकडून बेकायदेशीर मद्याच्या व्यवहाराकडे दुर्लक्ष केले जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे या मद्याच्या बेकायदा व्यवहाराला आळा घालण्यात कुचकामी ठरले आहेत, असा आरोप पालेकर यांनी केला.
औद्योगिक वसाहतींमधील काही डिस्टिलरीज कंपन्या बेकायदा मद्य व्यवहारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रत्येक डिस्टिलरीमध्ये अबकारी विभागाचा अधिकारी असतो. तर ही दारू राज्याबाहेर बेकायदेशीरपणे नेली जाणे कसे शक्य आहे? उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार ही कामे होऊ शकतात, असा आरोप पालेकर यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी आरोप फेटाळले
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आपचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी बेकायदा मद्यप्रकरणी केलेले आरोप फेटाळताना राज्याबाहेर कुठेही पकडले जाणारे बेकायदा मद्य गोव्यातीलच आहे, असे म्हणता येणार नाही, असे म्हटले आहे.