मद्यालय ते महामार्गपर्यंतचे अंतर थेट मार्गावरून मोजणार

0
81

>> सरकारचा आदेश ः मद्य विक्रेते संघटनेची माहिती

> हवाई पद्धतीऐवजी थेट मोजमाप
> पणजी, फोंडा, मडगाव, वास्कोतील मद्यालयांना लाभ मिळणार
> पालिका क्षेत्रातील रस्त्यांबाबतची अधिसूचना रद्द करणार
> दीड हजार मद्यालयांना दिलासा

महामार्गापासून पाचशे मीटर अंतराच्या परिघातील मद्यालयांवर बंदी घालण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्‍वभूमीवर मद्यालय ते महामार्गापर्यंतचे अंतर हवाई पद्धतीने न मोजता थेट मार्गावरून मोजण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यासंबंधीचा आदेश
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अबकारी खात्याला दिला आहे. त्याचप्रमाणे पालिका क्षेत्रातून जाणारे राज्य महामार्ग म्हणून असलेली अधिसूचना रद्द करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे राज्यात सध्या बंद असलेल्या २२०० मद्यालयांपैकी सुमारे दीड हजार मद्यालयांना दिलासा मिळेल अशी माहिती मद्य विक्रेते संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पणजी, ङ्गोंडा, वास्को, मडगाव शहरात असलेल्या अनेक मद्यालयांना या निर्णयाचा ङ्गायदा मिळेल. संघटनेने सुरुवातीपासून सरकारकडे वरील मागणी केली होती. काही राजकीय पक्षांनी या प्रश्‍नावर मोर्चा काढावा म्हणून चिथावणी देण्याचाही प्रयत्न केला होता. परंतु संघटनेचा मुख्यमंत्र्यांवर विश्‍वास होता. पर्रीकर यांच्या या निर्णयाबद्दल त्यांचे आभार मानीत असल्याचे सांगून सरकारने न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याचीही तयारी दाखविल्याचे नाईक यांनी सांगितले.
मद्यबंदीचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश जारी झाल्याच्या दिवसापासून महामार्गावरील मद्याची दुकाने बंद आहेत. असे असतानाही
महामार्गावरील अपघातात दगावण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे मद्यालयांमुळे अपघात होतात याला अर्थ राहिलेला नाही, हे स्पष्ट होते, असे ते एका प्रश्‍नावर म्हणाले.
सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राषन करण्यास सरकारने घातलेल्या निर्बंधांचा संघटना स्वागत करीत असल्याचे त्यांनी सांगितले.