मद्यपी वाहनचालकांविरुद्ध सतत कारवाई हवी

0
48
  • – गुरुदास सावळ

गोव्यातील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी गोवा सरकारने जोरदार मोहीम उघडली आहे. जुवारी पुलावरून मध्यरात्री नदीत पडलेल्या मोटारीतील चौघांचा मृत्यू झाल्याने गोवाभर जी खळबळ माजली, त्यामुळे सरकारला जाग आली आणि पोलीस कामाला लागले. वाढदिवसाची पार्टी आटोपून मित्राला पोचवण्यासाठी जाताना हा अपघात घडला. मोटार चालविणार्‍या महिलेने मद्यप्राशन केले असणार असा पोलिसांचा अंदाज आहे. गोव्यात कोणत्याही पार्टीत उंची विदेशी दारू असतेच. दारू पिण्यात काही गैर आहे असे काही अपवाद वगळता कोणालाच वाटत नाही. काही लोकांना तर दारू पिऊन गाडी चालविण्यात मजा येते. रात्रीच्यावेळी रस्त्यावर वाहनांची संख्या कमी असते, त्यामुळे भरधाव वेगाने गाड्या हाकल्या जातात. जुवारी पुलावर जो भयानक अपघात झाला त्याला ही सगळी कारणे जबाबदार आहेत.
रात्रीचा समय. पोटात दारूचे चार पेग गेले होते. मित्राला पोचवून परत आल्यावर आणखी दोन पेग घेण्याचा विचार असणार. त्यामुळे गप्पागोष्टींच्या ओघात गाडीचा वेग किती वाढला हे चालकाच्या लक्षात आले नसणार. कारण काहीही असले तरी या भीषण अपघातात चौघांचा बळी गेला. त्यानंतरही अनेक अपघात घडत राहिले. त्यामुळे सरकारला कारवाई करणे भाग पडले.
गोव्यात पत्रादेवीपासून काणकोणपर्यंत महामार्गाचे काम चालू आहे. या रस्त्याचे काम वेगवेगळ्या कंत्राटदारांना विभागून दिले आहे. काम निर्धारित वेळेत पूर्ण व्हावे म्हणून ही योजना राबविण्यात येत आहे. पत्रादेवी ते म्हापसा पर्यंतच्या रस्त्याचे कंत्राटदार ही असामी फार मोठी असून गोव्यातील अधिकारीच नव्हे तर मंत्रीही त्या कंत्राटदाराला म्हणे घाबरतात. सदर कंत्राटदाराचे हात दिल्लीपर्यंत पोचलेले असल्याने या रस्त्याचे काम करताना कोणतेही नियम पाळले जात नाहीत. करासवाडा नाक्यावरील काम करताना त्यांनी किमान सहावेळा तरी जलवाहिन्या फोडल्या. त्यामुळे बारदेश तालुक्यातील लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. रस्त्याखालून जाणारी जलवाहिनी बदलतानाही त्यांनी असाच गोंधळ घातला. मात्र, त्याना धारेवर धरण्याचे धाडस कोणालाच होत नाही. पेडणे तालुक्यातील तोरसे व तांबोसे गावातील रस्त्याचे काम करताना स्थानिक लोकांचा कोणताही विचार त्यांनी केला नाही. त्यामुळे लोकांचे खूपच हाल झाले. स्थानिक अधिकारी व आमदार – मंत्र्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणूनही काहीच फायदा झाला नाही. गिरी येथील सेवा रस्ता अगदी अलीकडे वाहून गेला. एका रिक्षावाल्यालाच्या सतर्कतेमुळे भीषण अपघात टळला. अन्यथा आणखी एक मोठा अपघात होऊन काही लोकांचे बळी गेले असते. गोमंतकीयाचे सुदैव म्हणून गिरी प्रकरण थोडक्यात निभावले.
पत्रादेवी ते पर्वरीपर्यंतचा रस्ता बांधण्यासाठी दिलेली मुदत केव्हाच संपली आहे. हा रस्ता पूर्ण करण्यासाठी दिलेली मुदत सतत वाढवून दिली जात आहे. ज्या पद्धतीने हे काम चालले आहे ते पाहता मोपा विमानतळ चालू झाला तरी हा रस्ता तयार होणार नाही असे वाटते. प्रत्यक्षात १५ ऑगस्ट रोजी मोपा विमानतळ चालू होणार होता. काही तांत्रिक अडचणी आल्याने विमानतळाचे उद्घाटन लांबणीवर पडले. आता पुढील महिन्यात मोप विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. दिवाळीपूर्वी या विमानतळाचे नक्कीच उद्घाटन होईल. मोपा विमानतळ ते सुकेकुळण या रस्त्याचे काम अजून पूर्ण झालेले नाही, तसेच धारगळ ते पर्वरी या रस्त्याचे कामही पूर्ण झालेले नाही. नजीकच्या भविष्यकाळात हा रस्ता पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मोपा विमानतळ निर्धारित वेळेत पूर्ण होतो, पण धारगळ ते पर्वरी हा रस्ता मुदत संपूनही तयार होत नाही? आश्‍चर्य म्हणजे सरकार त्याबद्दल एक शब्द बोलत नाही.
दारू पिऊन गाडी चालविणे हा गंभीर गुन्हा आहे. नव्या कायद्यातील तरतुदीनुसार वाहतूकविषयक सर्वच गुन्ह्यांना कठोर शिक्षेची तरतूद आहे. या सुधारित कायद्याची कार्यवाही करण्याची प्रक्रिया गेली दोन वर्षे प्रलंबित होती. गोव्यातील रस्ते आधी दुरुस्त करा व मगच सुधारित कायद्याची कार्यवाही करा अशी मागणी काही राजकीय नेते तसेच तथाकथित जागरूक नागरिकांनी केली. सरकारलाही या सुधारित कायद्याची अंमलबजावणी करणे गैरसोयीचे वाटत होते. त्यामुळे वेगवेगळ्या सबबी पुढे करीत या सुधारित कायद्याची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्यात आली. सगळे प्रयत्न संपल्यानंतर आता कार्यवाही चालू झाली आहे.
याच सुमारास अपघातांची मालिकाच घडल्याने सरकारला कारवाईची संधी आयतीच मिळाली. या कारवाईला विरोध करणे कोणालाच शक्य नाही. नावेली येथे घडलेल्या अपघातात आणखी दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे अपघातांचे गांभीर्य आणखी वाढले. दारू पिऊन वाहन चालविणे म्हणजे अपघाताला निमंत्रण असते. त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईमुळे अपघातांचे प्रमाण कमी होणे अपेक्षित आहे. दारू पिऊन गाडी चालविल्याचे सिद्ध झाल्यास सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. न्यायालयाने या गुन्ह्याची गंभीर दखल घेऊन एका दोघांना तुरुंगात टाकले तर दारू झोकून गाडी चालविणार्‍यांचे प्रमाण एकदम कमी होईल. रात्रीच्या वेळी दारू पिण्यास कोणाचीच हरकत नाही. जेवढी दारू प्यायची असेल तेवढी दारू प्या, पण दारू पिऊन गाडी चालवू नका. गाडी चालविणार्‍या व्यक्तीने दारू प्यायची नाही हा नियम आहे. हा नियम जोपर्यंत तोडला जात नाही तोपर्यंत कोणावर कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दारू पिऊन वाहने चालविणार्‍या चालकाविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिसांना मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या आदेशाची वाट का पाहावी लागली? आता सुरू केलेली कारवाई हा केवळ देखावा राहू नये. ही कारवाई सतत चालू राहीली पाहिजे. अधूनमधून रात्रीची गस्त चालू राहिली तर दारू पिऊन वाहन चालविणे बंद होईल. गाडी चालवायची असेल तर दारू प्यायची नाही हे प्रत्येकाच्या मनात कोरले गेले पाहिजे. तोपर्यंत ही मोहीम सतत चालू राहिली पाहिजे.
जुवारी पुलाचे कामही असेच रखडले आहे. चिनी तंत्रज्ञ भारतात येण्यावर निर्बंध घालण्यात आल्याने जुवारी पुलाचे काम रखडत पडले आहेत सांगण्यात येत होते. पुलाची एक लेन चालू करणार असे बांधकाम मंत्री नीलेश काब्राल वारंवार सांगत होते. आता ते उद्घाटन लांबणीवर पडले आहे. मोपा विमानतळ ते मडगाव हा एक्सप्रेस रस्ता तयार न झाल्यास मोप विमानतळावर उतरणार्‍या देशी – विदेशी पर्यटकांना त्रास होतील. त्याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर होईल. मोपा विमानतळामुळे दक्षिण गोव्यातील पर्यटनावर परिणाम होणार अशी ओरड दक्षिण गोव्यातील राजकीय नेते सदैव करत होते. आता प्रत्यक्षात तसे घडले तर सरकार विरोधात टीका करण्याची आयतीच संधी मोपा विरोधकांना मिळेल. हा घोळ टाळायचा असल्यास मोप विमानतळ ते मडगाव हा एक्स्प्रेस रस्ता तयार होईपर्यंत मोप विमानतळाचे उद्घाटन लांबणीवर टाकावे लागेल. मात्र तसे केल्यास सरकारचीच बदनामी होईल. त्यासाठी मोपा विमानतळाबरोबरच या रस्त्याचे कामही प्राधान्याने पूर्ण करावे लागेल.
मोपा विमानतळ ते मडगाव हा रस्ता पूर्ण झाल्यावर अपघातांचे प्रमाणही कमी होईल अशी अपेक्षा आहे. मोपा ते मडगाव हा रस्ता गुळगुळीत झाल्यावर वाहनांची गती वाढविण्यावर तरुण चालकाच्या कल राहील अशी भीती पोलिसांना वाटत आहे. त्यामुळे या बेफाम वेगाने धावणार्‍या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. वाहतूक पोलिसांनी आताच त्याचा अभ्यास केला पाहिजे.