>> संशयितास १२ तासांत अटक
मडगाव एसजीपीडीए बाजारालगत वालंकिणी बारसमोर रविवारी मध्यरात्री दन मजुरांचा डोक्यात दगड घालून व दारुच्या बाटलीने खून झाला. यात तिसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अर्जुन मारुती काझीदोनी (३२) या तरुणाला अटक केली. या प्रकरणात रवी (२०) व भीम (३०) या दोघांचा खून झाला असून सुनील सावंत (४५) हा गंभीर जखमी झाला आहे.
रवी व भीम हे एसजीपीडीएच्या मासळी बाजारात काम करतात. रविवारी रात्री वालंकिणी बारमध्ये ते दोघे व त्यांच्यासोबत सुनीलही दारू प्यायला बसले. बार बंद झाल्यानंतर रवी, भीम व सुनिल हे बारबाहेर दारू प्यायला बसले. रात्रौ ११.४५ वा. अर्जुन मारुती काझीदोनी (मुंगूल, फातोर्डा) मूळ उत्तर प्रदेशातील हा बारमध्ये गेला होता. बार बंद झाल्याने त्याने त्या तिघांकडे दारू मागितली. पण त्यांनी ती देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. त्यातून अर्जुन याने बाटली फोडून ती रवीच्या पोटात खुपसली व भीमाच्या डोक्यात सिमेंटचा भला दगड घालून त्याचे डोके फोडले. त्यानंतर दोघांवर पुन्हा त्याने दगड घालला. त्यामुळे ते जागच्या जागी ठार झाले. त्यानंतर सुनीलवर दगड फेकला. त्यात सुनील जखमी होऊन खाली कोसळला. मात्र तोही मरण पावला असे समजून अर्जुन पसार झाला.
सोमवारी सकाळी पोलिसांना फोनवर दोघांचा खून झाल्याचे वृत्त अज्ञाताने देताच पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सेराफीन डायस, निरीक्षक कपील नायक हे घटनास्थळी पोहोचले. मृत रवी व भीम यांना इस्पितळात नेताच ते मरण पावल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्याआधी सुनीलही इस्पितळात दाखल झाला होता. काल सोमवारी दुपारी एसजीपीडीएच्या बाजारात तपास करीत असताना पोलीस कॉन्स्टेबल अविनाश नाईक यांनी संशयित अर्जुन याला ओळखले व त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी बारा तासात खुन्याचा तपास लावला. त्याबद्दल पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी पोलिसांना २५ हजार रुपयांचे इनाम जाहीर केले.