मंत्रिमंडळ फेररचनेचा कोणताही विचार नाही

0
9

>> मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट; संपूर्ण लक्ष अधिवेशनावर; मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना पूर्णविराम

सध्याच्या घडीला राज्य मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेचा कोणताही विचार नसून, राज्य सरकारने आपले संपूर्ण लक्ष हे आगामी गोवा विधानसभा अधिवेशनावर केंद्रित केले असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी काल आपल्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, तसेच भाजप व अन्य सर्व पक्षांच्या आमदारांबरोबर बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.

राज्य विधानसभेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या तयारीच्या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अधिवेशनात येणार असलेल्या विधेयकांवर, तसेच विविध खाती व खातेनिहाय प्रश्न, अर्थसंकल्प आदींवर चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पूर्ण पुरवणी अर्थसंकल्प यावेळी विधानसेभत चर्चेसाठी मांडण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना होणार असल्याचे वृत्त मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य मंत्रिमंडळाची फेररचना ही या निवडणुकीनंतर होणार असल्याचे बोलले जात होते; मात्र आता राज्य विधानसभेचे अधिवेशन तोंडावर आलेले असून, या अधिवेशनानंतरच आता राज्य मंत्रिमंडळाची फेररचना होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या पुनर्रचनेच्यावेळी सत्ताधारी पक्षातील एक-दोन मंत्र्यांना डच्चू देऊन काँग्रेस पक्षातून फुटून आलेल्या आमदारांची मंत्रिपदी वर्णी लावली जाणार असल्याचे वृत्त आहे. तसेच अन्य एका मंत्र्याला डच्चू देऊन एका भाजप नेत्याला मंत्रिपद दिले जाणार असल्याचीही चर्चा आहे.

मुख्यमंत्री होण्यासही तयार : नीलेश काब्राल
माझ्याकडे कोणती जबाबदारी द्यावी हे पक्ष ठरवेल. आपल्याकडे क्षमता असून, आपणास पक्षाने मुख्यमंत्रिपद दिले, तर ती जबाबदारी देखील आपण स्वीकारू, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार नीलेश काब्राल यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली. पक्षाने तुम्हाला पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिल्यास तुम्ही ते स्वीकारणार आहात का, असा प्रश्न नीलेश काब्राल यांना पत्रकारांनी केला असता त्यांनी हे वक्तव्य केले.

मनोहर विमानतळ लिंक रोडचे गुरुवारी उद्घाटन
मनोहर विमानतळ लिंक रोडचे गुरुवार दि. 11 जुलै रोजी केंद्रीय महामार्ग व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.