मंकीपॉक्सचा भारतात चौथा रुग्ण

0
36

>> केरळनंतर आता दिल्लीतही मंकीपॉक्सचा फैलाव

>> ७० हून अधिक देशांत रुग्ण

भारतात मंकीपॉक्सचे रुग्ण वाढत असून केरळनंतर आता दिल्लीतही मंकीपॉक्सचा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे आता भारतात मंकीपॉक्सचे एकूण चार रुग्ण झाले आहेत.
दिल्लीत आढळलेल्या ३१ वर्षीय सदर रुग्णाला दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. या रुग्णाने कोणताही प्रवास केला नसून या रुग्णाला ताप आणि त्वचेच्या जखमांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात मंकीपॉक्सचे निदान करण्यासाठी १६ प्रयोगशाळांची निर्मिती करण्यात आली असून त्यातील २ प्रयोगशाळा केरळमध्ये आहेत.
विमानतळावर तपासणी
देशातील सर्वच आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून येणार्‍या प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहे. तसेच ‘मंकीपॉक्सच्या व्यवस्थापनासाठी केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या नागरिकांनी आजारी व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये. तसेच मृत किंवा जिवंत वन्यप्राण्यांचा संपर्क टाळावा. आदी सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आल्या आहेत.

जगभरात १६००० रुग्ण

अमेरिकेच्या केंद्रीय रोगनियंत्रण आणि प्रतिबंध संस्थेच्या आकडेवारीनुसार जगातील ७४ देशांमध्ये मेपासून १६,००० हून अधिक रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. तथापि, केवळ आफ्रिकेतच मंकीपॉक्सच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. मंकीपॉक्स विषाणूचा अतिघातक प्रकार प्रामुख्याने नायजेरिया आणि कॉंगोमध्ये फैलावत आहे.

७० हून देशांत रुग्ण

या अगोदर १४ जुलैला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला होता. त्यानंतर १८ जुलैला दुसरा आणि २२ जुलैला तिसरा असे तिनही मंकिपॉक्सचे रुग्ण केरळमध्येच आढळून आले होते. केरळनंतर आता या रोगाने देशाच्या राजधानीतही शिरकावा केला आहे. जगातील ७० हून अधिक देशांत मंकीपॉक्स आजाराची साथ पसरल्याने जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जागतिक आणीबाणी जाहीर केली आहे.