भूकच लागत नाही…!

0
47
  • डॉ. मनाली महेश पवार

भूक लागत नाही. सारखं घटाघटा पाणी प्यावंसं वाटतं. जेवण पुढ्यात घेतलं तरी कंटाळा येतो. बाकी आजार काही नाही, पण खाणंच नको झालंय! अशा तक्रारी घेऊन सारखे रुग्ण येतात. चरचरीत भूक लागणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. शारीरिक व्याधी, मानसिक अस्वास्थ्य, तणाव आणि निरामय प्रकृतीतदेखील भूक मंदावण्याचा अनुभव येऊ शकतो.

भूक लागत नाही. सारखं घटाघटा पाणी प्यावंसं वाटतं. जेवण पुढ्यात घेतलं तरी कंटाळा येतो. बाकी आजार काही नाही, पण खाणंच नको झालंय! अशा तक्रारी घेऊन सारखे रुग्ण येतात. चरचरीत भूक लागणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. शारीरिक व्याधी, मानसिक अस्वास्थ्य, तणाव आणि निरामय प्रकृतीतदेखील भूक मंदावण्याचा अनुभव येऊ शकतो. शारीरिक अथवा मानसिक विकारात वजन कमी होत असेल तरच भूक न लागण्याच्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहावे. वैद्याचा सल्ला घ्यावा. तपासण्या कराव्यात.

रुग्णाची मुख्य तक्रार ‘अन्नद्वेष’ ही अकस्मात उद्भवणारी असल्यास कावीळ या रोगाचा विचार करावा. एक तर कावीळ झाली असेल (इतर लक्षणांवरून निदान करावे) किंवा नजीकच्या काळात यकृतात बिघाड होऊन कावीळ होण्याची शक्यता आहे हे जाणावे. अशा व्यक्तींना सकाळी उठल्यावर भूक लागते किंवा पहाटे-सकाळी अन्न घेऊ शकते; पण जसा दिवस उजाडेल व वाढेल तसा त्रास वाढत जातो.

सततच्या किंवा दीर्घकालीन आजारपणामुळे भूक कमी होऊ शकते. मग तो तीव्र डोकेदुखीसारखा सामान्य आजारदेखील असू शकतो किंवा कॅन्सरसारखा गंभीर आजारही असू शकतो. तीव्र आणि दीर्घकालीन असे दोन्ही आजार भूक मंदावण्यास कारणीभूत ठरू शकतात. आजार किंवा दुखापतीमुळे होणारी वेदनासुद्धा भूक कमी होण्यास कारण ठरू शकते. भूक न लागण्याची काही संभाव्य कारणे पुढीलप्रमाणे आहेत ः

  • तीव्र डोकेदुखी.
  • थकवा.
  • गर्भावस्था.
  • सर्दी, ताप, कावीळ, पोटाचे आजार, उलटी, अपचन, बद्धकोष्ठता.
  • मासिकपाळीच्या अगोदर, गर्भधारणेदरम्यान, रजोनिवृत्तीच्या वेळी भूक कमी होते.
  • काही विशिष्ट औषधांचे दुष्परिणाम.
  • शस्त्रक्रियेत होणाऱ्या वेदना.
  • भीती, नैराश्य आणि ताणतणाव.
  • मद्यपान, सिगारेट, तंबाखू यांसारख्या व्यसनांमुळेही भूक लागत नाही.
  • अयोग्य आहार म्हणजे फास्टफूड, जंकफूड, चिप्स, स्नॅक्स, कोल्ड्रिंक्स, भरपूर चहा-कॉफी पिण्यामुळेही अन्न जेवताना भूक न लागण्याची तक्रार सुरू होते.
  • अपुरी झोप.
  • जठराच्या अस्तराला झालेल्या जखमेमुळेदेखील भूक मंदावते.
  • विशेष आजार नसतानाही उन्हाळ्यात तशीही भूक मंदावते.

भूक वाढीसाठी काही घरगुती उपाय

  • दोन ते तीन काळी मिरी आणि लवंग यांचे एकत्र चूर्ण घ्यावे. त्यात मध मिसळून चाटण करून खावे. यामुळे भूक वाढते व अन्न पचण्यास मदत होते.
  • लवंग व पिप्पली समप्रमाणात घेऊन त्यांचे बारीक चूर्ण करावे. एक ते दीड ग्रॅम चूर्ण घेऊन, त्यात अर्धा चमचा मध मिसळून, त्या मिश्रणाचे सकाळ व संध्याकाळी चाटण करावे.
  • रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यातून घेतल्यास सकाळी पोट साफ होते आणि भूक वाढते.
  • जेवल्यावर ओवा, तीळ आणि सैंधव मीठ हे एकत्र करून अर्धा चमचा खाल्ल्यास भूक लागते.
  • काळ्या मनुका रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी कुस्करून पाण्यासकट त्यांचे सेवन करावे.
  • उपचारामध्ये योग्य आहार, औषधे व व्यायाम यांचा अंतर्भाव केला जातो.
  • आल्याचा रस मधातून जेवणाअगोदर अर्धा तास घ्यावा.
  • लवणभास्कर चूर्ण व दही हे ताक किंवा पाण्याबरोबर सेवन केल्याने मंदाग्नी नष्ट होतो.
  • पंचलवण हे धणे, पिप्पली, विप्पलमूळ, जीरे, तेजपत्र, नागकेशर, तालिसपत्र, अमरवेल, अनारदाना, वेलची, दालचिनीसारखी द्रव्ये वापरून तयार केले जाते. अजीर्ण, अग्निमांद्यामध्ये याचा विशेष उपयोग होतो.
  • हिंगापासून तयार केलेले हिंग्वाष्टक चूर्ण हे भूक वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे औषध आहे. हे चूर्ण लहान मुलांपासून वृद्धांनाही देता येते. वयानुसार फक्त प्रमाण बदलावे लागते. पाव चमचा ते एक चमचापर्यंत या चूर्णाचे सेवन करता येते. पाव चमचा हिंग्वाष्टक चूर्ण जेवताना पहिल्या दोन घासामध्ये मिश्रित करून, त्यात अर्धा चमचा तूप घालून सेवन करावे. म्हणजेच जेवताना तूप व हिंग्वाष्टक चूर्ण घालून भात खाल्ल्यास भूक चांगली लागून अन्नाचे पचनही नीट होते.
  • चित्रक, सुंठ, हिंग, पिप्पली, चव्य, अजमोदा, काळी मिरी, यवक्षार, सर्जिक्षार, पंचलवण आदी द्रव्यांचे मिश्रण करून ‘चित्रकादी’ चूर्ण तयार होते. हे चित्रकादी चूर्ण अग्निदीपनासाठी तसेच रूची वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
  • तसेच वडवानचूर्ण हेदेखील चांगले अग्निदीपक आहे.
    परंतु ही सारी औषधे वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यावीत.
  • पोटात कृमी होऊन भूक लागत नसेल तर प्रथम कृमीवर उपचार करावा. कृमिकुठार रस किंवा विंडगारिष्टसारखी औषधे घ्यावीत म्हणजे भूक लागते.
  • सर्दी होऊन भूक लागत नसेल तर सीतोपलादी चूर्ण मधासोबत घ्यावे.
  • अगदी साध्या घरगुती उपायांमध्ये 1 चमचा लिंबाचा रस, त्यात अर्धा चमचा आल्याचा रस घालून ते मिश्रण सकाळी रिकामी पोटी घ्यावे किंवा आल्याच्या तुकड्यावर सैंधव लवण लावून तो तुकडा जेवणापूर्वी साधारण अर्धा तास तोंडात घालून चघळत राहावा. यानेही उत्तम भूक लागते.
  • हिंग, सैंधव, आले, सुंठ, लिंबू, चिंच, ओवा ही सगळी भूक वाढवणारी औषधी द्रव्ये आहेत.
  • रोज सकाळी मधाचे गण्डुष धारण करण्याने आतून तोंडाची स्वच्छता होते. अरूचीमध्ये फायदा होतो.
  • लिंबू, सैंधव व काळी मिरी याने कवल-धारण (चुळा भरण्याने) अरूची रोग नष्ट होतो.
  • लाम्बुल सेवन, पान, कर्पूर, जावित्री, लवंग, लताकस्तुरी, चुना आणि सुपारी याने युक्त पान सेवन करावे. हे पान सकाळी उठल्यावर, भोजनानंतर किंवा स्नान केल्यावर सेवन करावे. ताम्बुल सेवनाने मुख स्वच्छ व सुगंधित होते. याने दात, गळा व जिभेचा मळ नष्ट होतो. मुखाचा चिकटपणा दूर होतो. म्हणजे अरूची नष्ट होते व भूक वाढते.

भूक वाढीसाठी आहार
भूक कमी झाल्यास सहज पचणारा योग्य आहार घ्यावा. यामध्ये आयुर्वेदशास्त्रात सांगितल्याप्रमाणे मण्ड, पेया, विलेपी, यूष यांसारख्या पदार्थांचे सेवन करावे.

  • मण्ड ः आहारद्रव्य तांदूळ. तांदळाच्या 14 पट पाणी घालून तांदूळ शिजवले व हा भात वेगळा करून जे पाणी (पेज) शेष राहते तो ‘मण्ड.’ त्या मण्डामध्ये सुंठ व सैंधव घालून त्याचे सेवन करावे. अशा प्रकारे तयार केलेली पेज उत्कृष्ट, दीपन-पाचन करणारी आहे.
  • पेया व यूष ः आहारद्रव्यामध्ये 14 पट पाणी घालून उकळावे. थोड्याशा भाताबरोबर जास्त अधिक पातळ द्रव सेवन केल्यास त्याला ‘पेया’ म्हणतात. हाच पातळ द्रव व द्रव्याला थोडासा जास्त घट्टपणा किंवा घन केल्यास ‘यूष’ बनतो. पेया यूषपेक्षा लघु पाकी असते. या बलकारक असतात.
  • विलेपी ः द्रव्याच्या चार पट पाणी घालून विलेपी (लाप्सी) तयार करतात. ही विलेपी स्वादिष्ट, पित्तनाशक व हृदयबलकारक असते.
  • लाजामण्ड ः लाह्यापासून तयार केलेल्या भण्डाला ‘लाजामण्ड’ म्हणतात. हे लाजामण्ड अरूचीनाशक, दीपन-पाचन करणारे असते. भूक लागत नसल्यास लाजामण्डने सुरुवात करावी.
  • अष्टगुणमण्ड ः धणे, सुंठ, मिरी, पिप्पली व सैंधव घालून मूग व तांदळाचे मण्ड करावे. त्याला तीळतेलामध्ये हिंगाची फोडणी द्यावी व सेवन करावे. हे दीपन, रक्तवर्धक, ज्वरशामक, मूत्राशय विरोधक, वात, पित्त व कफ नाशक आहे. हे अशा गुणांनी उपयुक्त असल्याने याला ‘अष्टगुणमण्ड’ म्हणतात. याचे सेवनही भूक लागण्यासाठी करता येते.

इतर आहार

  • हिरव्या पालेभाज्या, विविध फळे यांमध्ये फायबर्सचे प्रमाण भरपूर असते. यांचेही सेवन करावे.
  • पुरेसे पाणी प्यावे. दिवसभरात साधारण आठ ग्लास पाणी प्यावे. फास्टफूड, जंकफूड, स्नॅक्स, कोल्ड्रिंक्सपासून दूर राहावे.
  • तंबाखू, सिगारेट, मद्यपान अशा विविध व्यसनांपासून दूर राहावे.
  • नियमित व्यायाम करावा.
    या दिवसांत म्हणजे उन्हाळ्यात भूक कमी झाल्यास काळजीचे कारण नाही. हलका पेया, विलेपी, मण्डा, यूषसारखा आहार घ्या. पालेभाज्यांचा आहारात उपयोग करा, विविध फळे खा, थोडासा व्यायाम करा. फक्त भूक कमी लागत असेल व वजन घटत असेल तर लगेच वैद्यांचा सल्ला घ्या.