भीषण बस अपघातात 18 प्रवाशांचा मृत्यू

0
10

>> उत्तरप्रदेशच्या उन्नावमधील घटना; दुधाच्या कंटेनरला बसची धडक; 19 प्रवासी जखमी

उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे बुधवारी पहाटे सव्वा पाचच्या सुमारास आराम बस आणि टँकरच्या धडकेत बसमधील 18 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 19 जखमी झाले. मृतांमध्ये 14 पुरुष, 2 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे. ही बस बिहारमधील सिवान येथून दिल्लीला जात होती. लखनऊ-आग्रा द्रुतगती मार्गावरील बांगरमाऊ कोतवालीजवळ हा अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की बसच्या चालकाच्या बाजूचा भाग पूर्णपणे वेगळा झाला आणि प्रवासी बाहेर फेकले गेले. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात बिहारमधील एकाच कुटुंबातील सहा जणांचा अंत झाला आहे.

सविस्तर माहितुीनसार, अपघातग्रस्त बस डबलडेकर प्रवासी वाहन असल्यामुळे त्यात मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत होते. दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या या बसची पहाटे 5 वाजून 15 मिनिटांनी लखनऊ-आग्रा महामार्गावर एका दुधाच्या कंटेनरशी धडक झाली. हा कंटेनर महामार्गाच्या कडेला उभा असताना बसने मागच्या बाजूने कंटेनरला जोरात धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचा चुराडा झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, तोपर्यंत काही स्थानिक लोकांनी बसमधून जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच बचावकार्य वेगाने सुरू केलें. जखमींना तातडीने नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी सांगितले की, दुधाच्या टँकरला ओव्हरटेक करताना बसचे नियंत्रण सुटले आणि टँकरला धडकून बस उलटली. जिल्हाधिकारी गौरांग राठी यांनी सांगितले की, बसमध्ये 57 प्रवासी होते. सुमारे 20 प्रवासी सुखरूप आहेत. 18 मृतांपैकी 16 जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. 19 जखमींना उन्नाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 5 गंभीर जखमींना लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे.
काही प्रत्यक्षदर्शींच्या मते, महामार्गावर वेगाने जाणाऱ्या बसचालकाला वेगावर नियंत्रण ठेवता न आल्यामुळे बस थेट दुधाच्या कंटेनरला जाऊन धडकली.