भावदीप

0
20
  • डॉ. सीताकांत घाणेकर

योगसाधना- ५६४, अंतरंगयोग

‘‘स्वतः जळून जगाला प्रकाश देणार्‍या, सतत पेटत राहून मानवाला प्रेम, प्रकाश, शांती देणार्‍या. तसेच दुसर्‍याला आपल्यासारखे बनवणार्‍या दीपाकडून जीवनदर्शन प्राप्त केले तरच देवदर्शन सार्थक झाले असे मानले जाईल.’’

कलियुगात सर्व विश्‍वात घनघोर आंधार पसरला आहे. मानव मानवाचा, निसर्गाचा, पशुपक्षी, जीव-जंतू यांचा शत्रू बनलेला आहे. आपला स्वार्थ साधण्यासाठी या सर्व घटकांचा तो दुरुपयोग करीत आहे. स्वतःचाच विनाश ओढवत आहे. बहुतेकांना ही गोष्ट, हे सत्य माहीतदेखील नाही. ज्या प्रबुद्धांना हे माहीत आहे ते हतबल झाले आहेत. अवश्य काहीजण प्रयत्न करतात, पण ते अपुरे आहेत. दुःखाची गोष्ट म्हणजे, अनेकांची बुद्धी स्वार्थापोटी भ्रष्ट झाली आहे. शांतपणे थोडावेळ बसून, विचार करून त्यावर ठोस उपाय करण्याची, शोधण्याची सद्बुद्धीदेखील अनेकांना होत नाही.
अशावेळी काही सत्पुरुष, काही संस्था या विषयावर चिंतन करून कार्यरत आहेत. या अंधारात त्यांचाच एक आधार. अशा व्यक्ती, तीच एक थोडीशी दीपज्योती. हे लोक अखंड झिजून लोकांना प्रकाश देत असतात.
यासंदर्भात गुरुवर्य रविंद्रनाथ टागोर यांचे एक छोटेसे सुंदर काव्य अत्यंत मार्गदर्शक आहे ः
मावळता सूर्य विचारतो-
‘माझे कार्य कोण उचलणार?’
सर्व शांत विश्‍वात कुणाकडेही उत्तर नाही.
अशावेळी एका कोपर्‍यातून एक छोटीशी
दीपज्योती म्हणते ः
‘सूर्यदेवा, मी मला जमेल तसे हे कार्य करीत राहीन!’
खरेच, या थोड्याच ओळीत पुष्कळ बोध आहे, जीवनाचे महान तत्त्वज्ञान आहे.

टागोरांनी तर असेच महान कार्य जीवनभर केले. यातील बोध आपण प्रत्येकाने घेऊन त्याप्रमाणे कार्यरत व्हायचे आहे. अशावेळी हे कर्म, कर्मभोग न राहता कर्मयोग होते. जिथे भगवंताचे मूर्तीरूपात अस्तित्व आहे- आपल्या कुटुंबाचे देवघर, सार्वजनिक मंदिर, सण-उत्सवाचे ठिकाण- जेथे आपण दीपज्योतीच्या रूपात पणती, समई, सरमाळी लावतो. तिला नमस्कार करतो.
दिवाळीच्या दिवशी तर सगळीकडे प्रातःकाळी नरकासुर वधानंतर अभ्यंगस्नान करतो व सगळीकडे पणत्या पेटवतो. तो पणतीचा मंद प्रकाश बघून आपले मन शांत होते, सुखावते.
या पणतीची किंमत अल्प असेल पण तिने दिलेला संदेश महान आहे, अत्यंत मूल्यवान आहे.
पूजनीय पांडुरंगशास्त्री या विषयावर बोलताना छान सांगतात ः
‘ती लहानशी दिवली! सतत मला प्रेरणा देते. भले तू लहान असशील, भले तुझी किंमत दोन पैसे असेल. तू जळण्याची तयारी ठेव. हिंमत ठेव. मग तूही प्रकाश देऊ शकशील. तूच ते करू शकशील.’

आज सर्व विश्‍वात शास्त्रीजींचा वैश्‍विक स्वाध्याय परिवार या पणतीसारखा अखंड झिजतोय. या परिवारात समाजातील सर्वजण कार्य करतात. कसलाच भेदभाव ठेवत नाहीत- राष्ट्रीयता, वंश, वर्ण, रंग, धर्म, लिंग, वय, शिक्षण, स्थिती, परिस्थिती… गीतेचे विचार घेऊन- वेळात वेळ काढून- नियमितपणे हे स्वाध्यायी गावागावांत, खेड्यांत, शहरांत… सगळीकडे स्वखर्चाने फिरतात. या फिरण्याला शास्त्रीजींनी एक गोंडस नाव दिले आहे- ‘भावफेरी’, ‘भक्तिफेरी’
आज विश्‍वात माणसामाणसांत भाव लोप पावला आहे. भक्तीला पूर आला आहे पण ती कर्मकांडांत अडकली आहे. त्यामागील भाव व ऋषीप्रेरित तत्त्वज्ञानाचे भान बहुतेकांना नाही.
मागच्या आठवड्यात रक्षाबंधनाचा सोहळा लाखो लोकांनी साजरा केला. पण त्यातील पवित्रता कितीजणांना समजली हा संशोधनाचा विषय ठरवा.

भाऊ-बहीण यांच्या भेटी अवश्य झाल्या. आपल्या ऐपतीप्रमाणे सोहळे पार पडले. महागड्या वस्तूंची देवाण-घेवाण झाली. यात गैर काहीच नाही. पण भावाविना या कर्मकांडाला किती अर्थ आहे याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. भारतीय इतिहासात रक्षाबंधनाची अनेक उदाहरणे आहेत. या कथा-गोष्टी तरुणपिढीपर्यंत नेल्या तर त्यांना या सोहळ्याचे तत्त्वज्ञान समजेल.

उपनिषदामध्ये ऋषींनी भगवंताजवळ प्रार्थना केली आहे-
असतो मा सद्गमय|
तमसो मा ज्योतिर्गमय|
मृत्योर्माऽमृतम् गमय॥

  • मला असत्याकडून सत्याकडे ने, अंधःकारापासून प्रकाशाकडे ने, मृत्यूपासून अमरत्वाकडे ने.
    या प्रार्थनेच्या संदर्भात पूजनीय शास्त्रीजी सांगतात ः ‘‘या प्रवासात दिव्याप्रमाणे जळत राहून त्याच्या जीवनमार्गावर प्रकाश पसरविणारे महापुरुष मार्गदर्शक बनून उभे राहतात. हे महापुरुष त्यांच्यावर येणार्‍या संकटांना घाबरत नाहीत किंवा दूर पळून जात नाहीत. ते तर प्रभूजवळ एवढीच प्रार्थना करतात की, जी संकटे येतात ती प्रेमाने स्वीकारीन. ‘संकट दे’ असे वरदान मागत नाहीत. संकटाचे संकट मी बनेन अशी शक्ती तू मला दे. हे ईश! जीवनदीपक सदोदित जळत ठेव.’’
    शास्त्रीजींसारखे महापुरुष स्वतः झिजतात. जगात ज्ञानाचा प्रकाश सतत पसरलेला राहावा यासाठी स्वाध्याय-दीप प्रज्वलित ठेवायला सांगतात-
    ‘‘स्वतः जळून जगाला प्रकाश देणार्‍या, सतत पेटत राहून मानवाला प्रेम, प्रकाश, शांती देणार्‍या. तसेच दुसर्‍याला आपल्यासारखे बनवणार्‍या दीपाकडून जीवनदर्शन प्राप्त केले तरच देवदर्शन सार्थक झाले असे मानले जाईल.’’
    अशा या दीपज्योतीसमान अनेक महापुरुषांना शत्‌शत् प्रणाम!
    योगसाधक अशा महापुरुषांकडून प्रेरणा घेऊन कर्मयोग करतातच, पण इतरांना ज्ञान देऊन त्यांचादेखील जीवनविकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. भगवंत सर्वांना भाव व शक्ती देवो, हीच प्रार्थना!
    (संदर्भ ः प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले- संस्कृतिपूजन- दीपदर्शन)