भारत-विंडीज दुसरी कसोटी आजपासून

0
109

भारत व वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून किंग्सटन येथे सुरु होणार आहे. पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील ६० मौल्यवान गुणदेखील आपल्या खात्यात जमा केले आहेत. विंडीजला व्हाईटवॉश देऊन अजून साठ गुणांची कमाई करण्यासाठी भारत मैदानात उतरणार आहे.

भारतीय संघाचा विचार केल्यास रविचंद्रन अश्‍विनला खेळविण्याचा प्रश्‍न सर्वप्रथम येतो. पहिल्या कसोटीसाठी अश्‍विनला बाहेर बसवून जडेजाला पसंती देण्यात आली होती. या कसोटीत जडेजाला गोलंदाजीत फारसा प्रभाव पाडता आला नसला तरी त्याची फलंदाजी संघाच्या कामी आली होत. अश्‍विनचा विचार केल्यास त्याच्या नावावर विंडीजविरुद्ध दोन कसोटी शतकांची नोंद आहे. त्यामुळे त्याला बाहेर बसवणे कितपत योग्य ठरेल, हा संघ व्यवस्थापनाला विचार करावा लागेल. दोघांना खेळविण्याचे ठरल्यास मोहम्मद शमीला बाहेर बसावे लागणार आहे. पहिल्या कसोटीच्या दुसर्‍या डावात विंडीजचा संघ शंभरात गडगडला असला तरी या डावात त्यांच्या फलंदाजांनी जडेजाच्या गोलंदाजीवर हल्ला करत मुक्तपणे धावा जमविल्या हे विसरून चालणारे नाही.

दुसरीकडे विंडीज संघात मिगेल कमिन्सची जागा अष्टपैलू किमो पॉल याने घेतली आहे. अचूक टप्पा व दिशा राखून गोलंदाजीसाठी पॉल ओळखला जातो. टी-ट्वेंटी व वनडेचा अनुभव गाठीशी असल्याने कसोटीतही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. नवोदित ब्रूक्स याला पहिल्या कसोटीत तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीस पाठवण्याचा प्रयोग फसला होता. डॅरेन ब्राव्होेने तिसर्‍या व शेय होपला चौथ्या क्रमांकावर पाठवल्यास विंडीजला फायदा होऊ शकतो. ब्रूक्सच्या जागी कॉर्नवॉलला संधी दिली तर रॉस्टन चेजला योग्य जोडीदार मिळू शकतो.