भारतीय वीज वितरणावर चीनचे सायबरहल्ल

0
88

मुंबईत गेल्या वर्षी वीज खंडित होण्याचा जो प्रकार घडला, त्यामागे चिनी हॅकर्सचा सायबर हल्ला असल्याचे वृत्त ‘न्यूयॉर्क टाइम्स’ ने दिले असून महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही तो दावा खरा असल्याचा दुजोरा दिला आहे. यासंदर्भात चौकशीसाठी महाराष्ट्र सरकारने तीन समित्याही नियुक्त केल्या आहेत.
मुंबईत गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये वीज खंडित होण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे रेलसेवेपासून इस्पितळांपर्यंत सर्व यंत्रणा जवळजवळ दहा ते बारा तास ठप्प झाल्या होत्या. सॉफ्टवेअरमधील मॅलवेअरमुळे सदर दोष निर्माण झाल्याचे सांगण्यात येत होते, मात्र, त्यामागे चिनी सायबरहल्लाच असावा असे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने प्रसिद्ध केले आहे.

पूर्व लडाखमध्ये भारतीय व चिनी फौजा एकमेकांना भिडल्या असतानाच चीनच्या सायबर गुन्हेगारांनी सदर वीजपुरवठा कंपनीच्या नियंत्रण कक्षातील सॉफ्टवेअरमध्ये मॅलवेअर घुसवून वीजपुरवठा बंद पाडला होता असे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे. अमेरिकेतील मॅसेच्युसेट्‌स मधील रेकॉर्डेड फ्यूचर ह्या कंपनीने सदर मॅलवेअरचा छडा लावला असल्याचेही बातमीत म्हटले आहे. चिनी हॅकर्सनी पाठवलेल्या ह्या मॅलवेअरपैकी बहुतेक मॅलवेअर कार्यान्वित झाली नाहीत, परंतु केवळ काही भाग कार्यान्वित होऊ शकला असेही वृत्तात पुढे म्हटले आहे. चीनमधील रेड एको ह्या सायबर हल्लेखोरांच्या गटानेच भारतातील वीजपुरवठा कंपन्यांच्या सॉफ्टवेअरवर सायबरहल्ल्याचा हा प्रयत्न केला असावा असेही वृत्तात म्हटले आहे.

किमान बारा भारतीय सरकारी कंपन्यांच्या संगणक नेटवर्कवर चिनी हॅकर्सनी सन २०२० च्या मध्यापासून आतापर्यंत हल्ले केल्याचेही न्यूयॉर्क टाइम्सचे म्हणणे आहे. संरक्षण क्षेत्रातील कंपन्याही चिनी हॅकर्सच्या रडारवर होत्या असे बातमीत नमूद केले आहे. ज्या बारा सरकारी कंपन्यांवर सायबरहल्ले झाले त्यामध्ये एनटीपीसी लि. पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन लि., एनटीपीसीचा कुडगी येथील वीजप्रकल्प, पश्‍चिम, दक्षिण, उत्तर व पूर्व विभागीय लोड डिस्पॅच सेंटर, तेलंगण, दिल्ली सरकारची लोड डिस्पॅच सेंटर्स, डीटीएल टिकरी कलान हे दिल्ली ट्रान्सको लि. चे वीज उपकेंद्र, चिदंबरनार बंदर व मुंबई पोर्ट ट्रस्ट यांचा समावेश असल्याचेही आढळून आले आहे.