भारतीय लोकशाहीमुळेच गरीब घरातील मुलगी सर्वोच्चपदी

0
10

>> नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे उद्गार; सरन्यायाधीशांनी दिली राष्ट्रपतीपदाची शपथ

द्रौपदी मुर्मू यांनी काल देशाच्या सर्वोच्च पदाची शपथ घेतली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ६४ टक्के मतांसह विजय मिळवलेल्या द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. संसदेत सकाळी १०.१५ वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली. त्यानंतर देशाच्या नव्या राष्ट्रपतींना २१ तोफांची सलामी देण्यात आली. नगरसेविका ते देशाच्या राष्ट्रपती होण्याची संधी मला मिळाली असून, महान भारतीय लोकशाहीमुळेच एका गरीब घरात जन्मलेली मुलगी देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचू शकली. राष्ट्रपती होणे माझे वैयक्तिक यश नसून हे भारतातील प्रत्येक गरिबाचे यश आहे, असे द्रौपदी मुर्मू यावेळी म्हणाल्या.

या सोहळ्याला मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री, खासदार, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आदी उपस्थित होते. या सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही हजेरी लावली.

संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये पार पडलेल्या या शपथविधीला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व मोठे नेते उपस्थित होते. शपथविधीनंतर देशाला संबोधित करत द्रौपदी मुर्मू यांनी आपला जीवनप्रवास मांडला.

आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना मला ही संधी मिळाली आहे. देश आपल्या स्वातंत्र्याची ५० वर्ष साजरी करत असताना माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली होती. आज ७५ व्या वर्षात मला ही नवी संधी मिळाली आहे. आगामी २५ वर्षांचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होत असताना ही जबाबदारी मिळणे हे माझे सौभाग्य आहे, असे सांगत द्रौपदी मुर्मू यांनी सर्व आमदार, खासदार व देशवासियांचे आभार मानले.

देशातील गरिबांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असून, प्रगतशील भारताचे नेतृत्व करताना मला अभिमान वाटत आहे. देशाला राष्ट्रपतीपदाची मोठी परंपरा असून, मी पूर्ण निष्ठेने कर्तव्याचे पालन करेन. सर्व देशवासीय माझ्या ऊर्जेचे स्रोत असतील.

  • द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती.