भारतीय महिला संघाने पहिल्या विश्वचषकावर कोरले नाव

0
10

>> पहिल्यांदाच आयोजित 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला चारली धूळ

क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच पार पडलेल्या 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषकावर भारतीय संघाने नाव कोरले. दक्षिण आफ्रिकेतील सेनवेस पार्क येथे काल झालेल्या 19 वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला 7 गड्यांच्या फरकाने मात देत भारतीय महिला संघाने विश्वचषक पटकावला.

कर्णधार शफाली वर्मा हिच्या नेतृत्वातील भारतीय संघ पहिल्या-वहिल्या 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषकाचा किताब पटकावण्याच्या इराद्याने काल मैदानात उतरला होता. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो गोलंदाजांनी सार्थ ठरवला. या सामन्यात भारतीय महिला गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. तीतस साधू, अर्चना देवी आणि पार्शवी चोप्रा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले, तर मन्नत कश्यप, सोनम यादव आणि कर्णधार अष्टपैलू शफाली वर्मा यांना प्रत्येकी 1 गडी बाद करण्यात यश आले. या कामगिरीच्या जोरावर भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला 68 धावांवर सर्वबाद केले. त्यानंतर 69 धावाचे माफक आव्हान केवळ 14 षटकांत तीन गड्यांच्या बदल्यात पूर्ण करत सामना आणि विश्वचषक जिंकला.

अंतिम सामन्यात सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत 4 षटकांत केवळ 6 धावा देत दोन बळी टिपणाऱ्या तीतस साधू हिला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले, तर स्पर्धेत 293 धावा व 9 बळी घेतलेली इंग्लंडची कर्णधार ग्रेस स्क्रिव्हन्सला मालिकावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत सुरुवातीपासून भारताने चांगली कामगिरी केली. भारताचा संघ ड गटात होता. यादरम्यान टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती आणि स्कॉटलंडचा पराभव केला. त्यानंतर सुपर सिक्सच्या पहिल्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत श्रीलंकेचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर न्यूझीलंडला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली होती.