भारताने उभारला ५०२ धावांचा डोंगर

0
121

>> मयंक अगरवालने ठोकले द्विशतक

>> द. आफ्रिका ३ बाद ३९

रोहित शर्मा व मयंक अगरवाल यांनी दिलेल्या त्रिशतकी सलामीनंतर फिरकीपटूंच्या शानदार सुुरुवातीच्या बळावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीवर मजबूत पकड मिळविली आहे. भारताच्या ७ बाद ५०२ धावांना उत्तर देताना दुसर्‍या दिवसअखेर पाहुण्यांची ३ बाद ३९ अशी दयनीय अवस्था झाली आहे. पाहुण्यांचा संघ अजून ४६३ धावांनी पिछाडीवर असून त्यांचे केवळ ७ गडी बाकी आहेत.

२२ महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार्‍या अश्‍विनने मार्करमचे सदोष बचावतंत्र भेदताना त्याची यष्टी वाकवली. यानंतर ‘अराऊंड दी विकेट’ येताना एका उंची दिलेल्या चेंडूवर त्याने थ्युनिस डी ब्रुईनला शरीरापासून दूर खेळण्यास भाग पाडताना यष्टिरक्षक साहाकरवी तंबूचा रस्ता दाखवला. नाईट वॉचमन म्हणून आलेल्या डॅन पिदचा त्रिफळा उडवून जडेजाने भारताला तिसरे यश मिळवून दिले.

तत्पूर्वी, पहिल्या दिवसाच्या बिनबाद २०२ धावांवरून पुढे खेळताना रोहितने सर्वप्रथम २२४ चेंडूंत आपले दीडशतक पूर्ण केले. महाराजला पुढे सरसावत षटकार खेळण्याच्या नादात एका झपकन वळलेल्या चेंडूला बॅटचा स्पर्श होऊ न झाल्याने त्याला डी कॉकने क्रीझबाहेर गाठत तंबूची वाट दाखवली. व्हर्नोन फिलेंडर याने चेतेश्‍वर पुजाराचा त्रिफळा उडवत संघाला दुसरे यश मिळवून दिले. अगरवाल व कोहली मोठी भागीदारी करणार असे वाटत असताना पदार्पणवीर मुथूसामीच्या एका ‘थांबून’ आलेल्या चेंडूवर सोपा झेल देत कोहली परतला. सुरेख क्षेत्ररक्षण रचना करून पाहुण्यांनी रहाणेला जाळ्यात अडकवले. सहाव्या स्थानी बढती मिळालेला जडेजा ३० धावा करून नाबाद राहिला. विहारीने १० धावांचे योगदान दिले. साहाने फटकेबाजी करत १६ चेंडूंत झटपट २१ धावा केल्या.

धावफलक
भारत पहिला डाव ः मयंक अगरवाल झे. पिद गो. एल्गार २१५ (३७१ चेंडू, २३ चौकार, ६ षटकार), रोहित शर्मा यष्टिचीत डी कॉक गो. महाराज १७६ (२४४ चेंडू, २३ चौकार, ६ षटकार), चेतेश्‍वर पुजारा त्रि. गो. फिलेंडर ६, विराट कोहली झे. व गो. मुथूसामी २०, अजिंक्य रहाणे झे. बवुमा गो. महाराज १५, रवींद्र जडेजा नाबाद ३०, हनुमा विहारी झे. एल्गार गो. महाराज १०, वृध्दिमान साहा झे. मुथूसमी गो. पिद २१, रविचंद्रन अश्‍विन नाबाद १, अवांतर ८, एकूण १३६ षटकांत ७ बाद ५०२ घोषित.
गोलंदाजी ः व्हर्नोन फिलेंडर २२-४-६८-१, कगिसो रबाडा २४-७-६६-०, केशव महाराज ५५-६-१८९-३, डॅन पिद १९-१-१०७-१, सेनुरन मुथूसामी १५-१-६३-१, डीन एल्गार १-०-४-०
दक्षिण आफ्रिका पहिला डाव ः डीन एल्गार नाबाद २७, ऐडन मार्करम त्रि. गो. अश्‍विन ५, थ्युनिस डी ब्रुईन झे. साहा गो. अश्‍विन ४, डॅन पिद त्रि. गो. जडेजा ०, तेंबा बवुमा नाबाद २, अवांतर १, एकूण २० षटकांत ३ बाद ३९
गोलंदाजी ः इशांत शर्मा २-०-८-०, मोहम्मद शमी २-२-०-०, रविचंद्रन अश्‍विन ८-४-९-२, रवींद्र जडेजा ८-१-२१-१.