अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा स्फर्टफोन बनवणारी कंपनी ॲपलवर निशाणा साधला आहे. यावेळी ट्रम्प यांनी कठोर भूमिका घेतली असून, आयफोन बनवणाऱ्या कंपनीला थेट धमकी दिली आहे. अमेरिकेत विकले जाणारे आयफोन हे अमेरिकेतच तयार झालेले पाहिजेत, भारत किंवा इतर कुठे नाही, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. याबद्दल ॲपलचे सीईओ टिम कुक यांना आधीच सूचित केले होते आणि जर ॲपलने त्याचे पालन केले नाही, तर कंपनीवर किमान 25 टक्के कर लादला जाईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या टर्ममध्ये अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याचा संकल्प केलेला आहे. यासाठी ते वेगवेगळे मार्ग वापरुन पाहत आहेत. जगभरातील विविध देशांना टॅरिफचा दणका देऊन त्यास पुन्हा 90 दिवसांची स्थगिती देणाऱ्या ट्रम्प यांनी ट्र्थवरील सोशल अकाऊंटवरुन मोठी धमकीवजा घोषणा केली. आयफोनचे अमेरिकेबाहेरील उत्पादन थांबवण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. अमेरिकेत आयफोन तयार न केल्यास 25 टक्के आयात शुल्कासाठी तयार राहण्याचा इशारा देखील दिला.
डोनाल्ड ट्रम्प यांचे हे विधान त्यांनी टिम कूक यांना भारतात आयफोनचे उत्पादन करू नका, त्याऐवजी अमेरिकेत आयफोन तयार करा, असे कतारमधील दोहा येथे सांगितल्यानंतर आठवडाभरात करण्यात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेच्या बाहेर उत्पादन करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांवर दबाव टाकला जात आहे, यादरम्यान ॲपलला ट्रम्प यांनी हा इशारा दिला आहे. ॲपल कंपनी ही चीनमधील आपले उत्पादन कमी करून भारतातील उत्पादन हळूहळू वाढवू इच्छित आहे. सध्या एकूण आयफोनपैकी भारतात 15 टक्के आयफोनचे उत्पादन होत आहे. येत्या वर्षात हे उत्पादन एक चतुर्थांशने वाढविण्याची कंपनीची योजना आहे. विशेष म्हणजे ॲपल अमेरिकेत आयफोनची निर्मिती करत नाही. कंपनीचे बहुतांश आयफोन हे चीनमध्ये तयार केले जातात, तर भारतात दरवर्षी 40 दशलक्ष युनिट्स तयार केले जातात.
दोहा येथे ट्रम्प काय म्हणाले होते?
डोनाल्ड ट्रम्प दोहा येथे दौऱ्यावर असताना टिम कूक यांच्याशी झालेल्या संवादाबद्दल माहिती दिली होता. मी टिम कुक यांच्याशी बोललो. तुम्ही 500 अब्ज डॉलर्सची कंपनी बांधत आहात; पण आता मी ऐकत आहे की तुम्ही भारतात कारखाने उभारत आहात. तुम्ही आधी चीनमध्ये कारखाने उभारले, ते आम्ही वर्षानुवर्षे सहन केले. आता तुम्ही भारतात कारखाने स्थापन करावेत, असे मला वाटत नाही. भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो. तुम्ही अमेरिकेत कारखाने उभारावेत असे आम्हाला वाटते, असे ट्रम्प म्हणाले होते.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
मी खूप आधीच ॲपलच्या टिम कूक यांना सांगितले होते की मला अपेक्षा आहे की अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या त्यांच्या आयफोनचे उत्पादन आणि निर्मिती ही अमेरिकेत होईल. भारतात किंवा इतर कुठे नाही. जर तसे झाले नाही तर ॲपलला अमेरिकेला 25 टक्के कर द्यावा लागेल, अशी पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.