भाजप सरकारने साडेसात वर्षांत सीआरझेड प्रश्‍नावर काय केले?

0
123

>> उत्तर देण्याची कॉंग्रेसची मागणी

सीआरझेड प्रश्‍नावर २०१२ पासून आतापर्यंत भाजप सरकारने काय केले याचे उत्तर सरकारने अगोदर द्यावे व २०१२ पूर्वी असलेल्या कॉंग्रेस सरकारने काहीच केले नाही हा आरोप नंतर करावा असे विरोधी पक्ष नेते चंद्रकांत कवळेकर हे काल पत्रकार परिषदेतून बोलताना म्हणाले. काल पर्वरी येथे झालेल्या कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर ते बोलत होते.

गेली सुमारे साडेसात वर्षे राज्यात भाजपचे सरकार आहे. या साडेसात वर्षांत भाजपने सीआरझेडचा प्रश्‍न धसास लावण्यासाठी काय केले ते आम्हाला कळायला हवे, असे कवळेकर म्हणाले.

सीआरझेडच्या मसुद्यात आम्ही कॉंग्रेस आमदारांनी बर्‍याच दुरुस्त्या सुचवल्या होत्या. मात्र, त्या विचारात घेण्यात आल्या नाहीत, असे कवळेकर यांनी नजरेस आणून दिले. काही दिवसांपूर्वी सीआरझेडप्रश्‍नी आमदारांसाठी जे एक सादरीकरण करण्यात आले त्यावेळी मंत्री व सत्ताधारी पक्षाचे आमदारही या मसुद्यावर तुटून पडल्याचे सांगून सरकारनेच हा मसुदा तयार करण्याची जबाबदारी एका एजन्सीकडे सोपवली होती. त्यामुळे मसुद्यात त्रुटी राहणार नाहीत हे बघण्याची जबाबदारी ही सरकारची होती. पण ती जबाबदारी सरकारला योग्य प्रकारे पार पाडता आली नसल्याचा आरोप कवळेकर यांनी केला.

टॅक्सीवाल्यांच्या प्रश्‍नावर
सरकारला अपयश
सरकारने राज्यातील टॅक्सीवाल्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केलेली असली तरी त्यांच्या मागण्या मान्य करून प्रश्‍न सोडवण्यास सरकारला अपयश आल्याच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसच्या बैठकीत टॅक्सीवाल्यांच्या प्रश्‍नावर सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे कवळेकर यांनी सांगितले. राज्यातील टॅक्सीवाले हे गोमंतकीय असून त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. आम्ही या प्रश्‍नी विधानसभेत आवाज उठवणार आहोत, असे कवळेकर यांनी स्पष्ट केले.

कॅसिनोंचा मुद्दाही महत्त्वाचा असून त्याबाबतही सरकारला कोंडीत पकडणार असल्याचे सांगून या अधिवेशनात आम्ही सरकारला आही विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे न देता वेळ मारून नेण्यास देणार नसल्याचे कवळेकर म्हणाले.
अद्यायावत कचरा प्रक्रिया प्रकल्प हवेत ः राणे
राज्यातील कचरा समस्या बिकट बनली असून हा प्रश्‍न सोडवण्यासाठी सरकारने राज्यात अद्ययावत असे कचरा प्रकल्प उभारण्याची गरज असल्याचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.