भाजपनेच देशाची माफी मागण्याची वेळ ः सूरजेवाला

0
98

राहुल गांधींच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करून व टीका करून भाजप राजकारण करीत असल्याचा आरोप काल कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी केला. संपूर्ण देश एकजूट व्हावा असे भाजपला वाटत नाही का असा सवाल सूरजेवाला यांनी केला.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे राजकीय संतुलन बिघडले असून भाजप खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असल्याचे सूरजेवाला म्हणाले. राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीर आणि लडाख प्रदेश भारताचा अविभाज्य घटक होता आणि राहील अशी ठाम भूमिका मांडली आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये होणार्‍या हिंसेच्या घटना पाकिस्तानकडून होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे असे सूरजेवाला म्हणाले. पाकिस्तान दहशतवाद पोसत आहे, भारतविरोधी कट कारस्थान रचत आहे, असे वक्तव्यही राहुल गांधींनी केले आहे. दुर्दैवाने भाजप सरकार राहुल गांधींच्या या भूमिकेसाठी विरोध करत आहे असा दावा त्यांनी केला. यामुळे भाजपनेच देशाची माफी मागण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी सुनावले.

राहुल गांधी यांनी वरील वक्तव्ये केल्यानंतर भाजपने पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी व कॉंग्रेसच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. प्रकाश जावडेकर यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले. त्यामुळे कॉंग्रेस नेते सूरजेवाला यांनी वरील उत्तर दिले.