भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत अडवाणी, मुरली मनोहर जोशी

0
26

भाजपने काल जाहीर केलेल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी तसेच मुरली मनोहर जोशी यांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या वेळी अडवाणी आणि जोशी यांना मार्गदर्शक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आता त्यांचा समावेश राष्ट्रीय कार्यकारिणीत करण्यात आला आहे.

भाजपने काल गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकूण ८० सदस्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी जाहीर केली. या यादीमध्ये राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य म्हणून पहिले नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. पंतप्रधानांनंतर दुसरे नाव पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व त्यानंतर मुरली मनोहर जोशी यांचे नाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, पियुष गोयल, लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी आदींचा समावेश असलेली ही ८० सदस्यांची राष्ट्रीय कार्यकारिणी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना मार्गदर्शक बनवून मुख्य राजकीय प्रवाहातून बाजूला काढल्याची टीका विरोधकांकडून केली जात होती.

कार्यकारिणीमध्ये महाराष्ट्रातील चित्रा वाघ यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांच्या जबाबदारीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यासोबत विशेष निमंत्रित म्हणून सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार यांचा देखील राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

गोव्यातील नेत्यांना स्थान

भाजपने गोव्यातील आपल्या अनेक नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान दिले आहे. अशा प्रकारे पक्षाने गोव्यातील नेत्यांना मोठ्या संख्येने राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

उत्तर गोव्यातून पाचवेळा खासदार म्हणून निवडून आलेले केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना ८० सदस्यीय राष्ट्रीय कार्यकारिणीत सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. तर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे आणि माविन गुदिन्हो यांना राष्ट्रीय कार्यकारिणीवरील खास निमंत्रित म्हणून नियुक्त केले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, मनोहर आजगावकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटन सचिव सतीश धोंड यांचा समावेश कायम निमंत्रित/पदसिद्ध सदस्य म्हणून राष्ट्रीय कार्यकारिणीत करण्यात आला आहे.