भाजपची दुसरी यादी आज होणार जाहीर

0
4

जिल्हा पंचायत निवडणूक : मुख्यमंत्र्यांची माहिती; मगोला 3 जागा सोडल्या; काही मतदारसंघांत भाजपचा अपक्षांना पाठिंबा

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मगोला 3 जागा देण्यात आल्या आहेत. काही मतदारसंघांत भाजपचा अपक्ष उमेदवारांना पाठिंबा असणार आहे. तसेच, भाजपच्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी मंगळवारी जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. पहिल्या यादीत जाहीर केलेल्या 19 उमेदवारांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

भाजपने जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या 19 उमेदवारांची बैठक भाजप मुख्यालयात काल घेण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीतील उमेदवारांना मार्गदर्शन केले. उमेदवारांना मतदारसंघांतील निवडणूक प्रचार, रणनीती आणि इतर विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भाजप-मगो यांच्यात आघाडी कायम आहे. मगोला तीन जागा देण्यात आल्या आहेत. भाजपला विधानसभेत अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे काही जिल्हा पंचायत मतदारसंघांत अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिला जाणार आहे. भाजपच्या जिल्हा पंचायत निवडणूक समितीची मंगळवारी बैठक होणार आहे. त्यानंतर उर्वरित मतदारसंघासाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
भाजपचे सर्व मतदारसंघांतील उमेदवार बुधवारपर्यंत निश्चित होणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे कार्य वर्षभर सुरू असते. केंद्र तसेच राज्य सरकारच्या योजना लोकापर्यंत पोचवितात. त्याचा उमेदवारांना प्रचारामध्ये फायदा होणार आहे, असे दामू नाईक यांनी सांगितले.

पहिल्या दिवशी एकही
उमेदवारी अर्ज दाखल नाही

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला कालपासून सुरुवात झाली; मात्र पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी येत्या 9 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहे. त्यात 3 आणि 7 डिसेंबरच्या सुट्टीमुळे उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ही निवडणूक पक्षीय पातळीवर घेतली जात आहे. भाजप, आप, आरजीपी, गोवा फॉरवर्ड या पक्षांनी आपल्या काही उमेदवारांची नावे जाहीर करून प्रचाराला सुरुवात केली आहे. तथापि, काँग्रेसने आघाडीसंबंधीच्या चर्चेमुळे अजूनपर्यंत उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नाही.

मगोला कुठल्या जागा दिल्या?
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मगो पक्षाला मडकई विधानसभा मतदारसंघातील 2 आणि मांद्रेतील एक जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतर 47 जागांपैकी काही ठिकाणी पक्ष उमेदवार उभे करणार आहे, तर काही ठिकाणी अपक्षांना पाठिंबा देणार आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.

आघाडीविषयीच्या चर्चेमुळे काँग्रेसची उमेदवार निवड रखडली
राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मित्रपक्षांसोबत आघाडीबाबत चर्चा सुरू असल्याने काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नाही. ज्या मतदारसंघात उमेदवार निवडीबाबत कुठलाही वाद नाही. त्या मतदारसंघातील उमेदवाराच्या नावांची घोषणा सोमवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर केली जाईल, अशी माहिती गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी जिल्हा पंचायत उमेदवार निवड समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.
जिल्हा पंचायतीच्या काही मतदारसंघांबाबत मित्रपक्षांसोबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांची अजूनपर्यंत घोषणा करण्यात आलेली नाही. जिल्हा पंचायतीसाठी मित्रपक्षांसोबत आघाडीच्या विषयावर चर्चा सुरू आहे. ज्या मतदारसंघांतील आघाडीबाबत चर्चा सुरू आहे. ते मतदारसंघ वगळून इतर मतदारसंघांतील उमेदवारी नावे जाहीर केली जाणार आहे, असेही पाटकर यांनी सांगितले.

आम आदमी पक्षाची तिसरी यादी जाहीर
आम आदमी पार्टीने (आप) जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 7 उमेदवारांची तिसरी यादी काल जाहीर केली. आपने यापूर्वी 22 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. तिसऱ्या यादीत सात मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. त्यात शिवोली मतदारसंघात डायोनिझिया जॉइस फर्नांडिस बिट्रो (बुना), चिंबलमध्ये मारिया क्रिस्टलिना अंताओ, सेंट लॉरेन्समध्ये रतिष्मा विश्वजित शिरोडकर, बार्सेमघ्ये संजवी शेषांक वेळीप, रिवणमध्ये तेजस्विनी गावकर, धारबांदोड्यात शशिकांत वेळीप आणि खोला मतदारसंघात ॲड. समिक्षा खोलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.