भरती-ओहोटी

0
66
  • गौरी भालचंद्र

जगणं म्हणजे भरती-ओहोटीच्या लाटांमधून अचूक वेळ साधून त्या त्या घडीला वाळूचा किल्ला बांधणं.. वाळूत किल्ले बांधण्याचा छंद तर केवळ अनाकलनीय .. आयुष्याच्या प्रवासात असे किल्ले तर जरूर बांधावे लागतात. लाटा या येतच राहणार…

सर्वसामान्य जन्माला येणारे बाळ हे जन्माला येते ते सोबत एक कोरी पाटी घेऊन…आणि मग हळूहळू अवतीभवतीच्या माणसांच्या सहवासात ते एक एक गोष्ट शिकून घेते..आणि यात सर्वांत महत्त्वाचा वाटा असतो आईचा… त्यानंतर वडिलांचा.. घरातील व्यक्तींचा.. नंतर शाळा.. समाज यांच्याकडून त्याच्यावर होणारे संस्कार…आणि बालसुलभ बाळाच्या अंगी असणारा चौकसपणा…. जिज्ञासूवृत्ती.. कुतूहल… निरीक्षण शक्ती.. आणि अनुभव नसल्याने प्रत्येक बाबतीत त्याच्यापाशी नसणारी पूर्वग्रहदूषित दृष्टी. यातून त्याचे व्यक्तिमत्त्व घडत असते.

याबरोबर वाचनसंस्कार हाही माणसांच्या व्यक्तिमत्त्वाला घडविण्यात मोलाचा हिस्सेदार असतो.. एवढे सारे जमून आल्यानंतर निव्वळ संस्काराच्या पाठिंब्यावर हमखास यशाची खात्री देता येत नाही. कारण संस्काराइतपत किंबहुना जरा झुकत्या मापानं ‘सोबत’ ही माणसाला घडवते वा बिघडवते.

थोडक्यात परिस्थिती माणसाला तिच्या इशार्‍यानुसार झुकवीत असते.. तिच्याशी सामना करताना खरे तर तारेवरची कसरत करावी लागते.. कधी मनासारख्या गोष्टी घडल्या म्हणून हसू येते तर कधी नाही घडल्या तरी हसून गोड करावे लागते. कारण आपल्या हसण्यात आपली नाती जपली जाणार असतात. त्यावेळची माघार ही आपली प्राथमिकता स्वत:च्या अहंभावाला जपण्यापेक्षा नाती टिकविण्याकडे आहे याचा दाखला देत असते.

याउलट या माणसाच्या वागण्याची पुण्यवान आणि पापी म्हणून विभागणी समाजात केली जाते आणि यावर पुढल्या पिढीसाठी चालीरीती, संस्कार, रूढी, रिवाज यांची मानके आखली जातात. म्हणून कुठल्याही माणसाच्या एखाद्-दुसर्‍या कृतीवरून त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाबद्दल काही टिप्पणी करणे अन्याय केल्यासारखे होईल. आणि ते सर्वांनी टाळायला हवं.

जगणं म्हणजे भरती-ओहोटीच्या लाटांमधून अचूक वेळ साधून त्या त्या घडीला वाळूचा किल्ला बांधणं.. वाळूत किल्ले बांधण्याचा छंद तर केवळ अनाकलनीय .. आता हा छंद त्या अजाण बालवयात शोभून दिसतो.. तन्मयतेने लहान मुलाचा वाळूतला किल्ला बांधण्याचे काम चालू असते. आपण का उमजून घेत नाही की आयुष्याच्या प्रवासात असे किल्ले तर जरूर बांधावे लागतात… लाटा या येतच राहणार… कित्‌पत् बांधाबांध झाली नि कितीसं वाहून गेलं याच्या जमाखर्चात अडकायचं नाही.
आयुष्य म्हणजे हिशोबाच्या चोपडीत काही डाव्या नि काही उजव्या नोंदींची केवळ उपचार म्हणून नोंद नव्हे तर प्रत्येक पान उलटताना शेवटी राहिलेल्या बाकीची खबरबात घेणे होय. कारण या बाकीच्या नोंदी पुढल्या पानावर उतरल्याशिवाय पुढचा हिशोब पुरा होत नसतो. पण आपण आपल्या लहानपणाची ढाल पुढे करून.. झोपेचे सोंग घेऊन… असे हिशोब पुढे रेटू पाहतो. आपण आपल्या अनुभवाचा, निरीक्षणाचा , चौकस बुद्धीचा, कुतूहलाचा, जिज्ञासूपणाचा नि या सार्‍यातून मिळालेल्या शहाणपणाला हाक न देता अशा हिशोबाच्या मागे धावत सुटतो.
हिशोबाच्या ओझ्याचे जडत्व माणसामाणसागणिक बदलणारे असते… कुणाला हिशोब कळत नाही म्हणून तो दु:खी असतो तर कुणी खरा हिशोब कळल्यामुळे दु:खी असतो.. हिशोब म्हणजे काय हे ज्याच्या गावी नसते तो खुशालचेंडू मात्र नितांत मजेत असतो.. प्रत्येकजण आपापला हिशोब आपल्यापरीने मांडण्याचा जन्मभर प्रयत्न करीत जातो.
आपल्याला सगळ्या गोष्टीत मधला मार्ग… शॉर्टकट शोधण्याची घाई झालेली असते.. डोळे मिटून काही सभोवतालचा अंधार मिटत नसतो.. तर अंधार खरोखर मिटवायचा असेल तर पुढे होऊन अंधार आरपार कापीत जावे लागते, मग पलीकडच्या उजेडाच्या प्रदेशात आपल्याला आपसूकच पाऊल ठेवता येईल.

इथे आपल्याला जसं वाटतं की आपली आवड जपली गेली पाहिजे तसं समोरच्यालाही त्याची आवड असते हे आपण ध्यानात घेत नाही.. सदैव आपलेच घोडे दामटण्याची तयारी, माणसाला वस्तुस्थितीला धरून राहण्याबाबत आवश्यक असणारा लवचिकता, सोशिकपणा यापासून दूर लोटीत असते. ज्ञानार्जनाच्या प्रत्येक चढत्या पायरीसंगे आपल्यातला माणूस सजग होऊन परिपक्व होत गेला पाहिजे. माणूसपण टिकले पाहिजे.