भजनाचार्य सोमनाथबुवांना अखरेचा निरोप

0
149

भजनाचार्य पं. सोमनाथबुवा च्यारी यांना आज त्यांचे शिष्य, चाहते, मित्रमंडळी यांनी अखेरचा निरोप दिला. रायबंदर येथील मुक्तीधाम स्मशानभूमीत त्यांची अंत्ययात्रा टाळ-मृदंगाच्या गजरात दुपारी दीड वाजता निघाली. श्रीराम जयराम जयजय रामचा अखंड गजर चालू होता.
स्मशानभूमीत त्यांच्या शिष्यमंडळीने आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, निरोप घेता देवा आम्हा आज्ञा असावी, हे सोमनाबुवांचे औचित्यपूर्ण अभंग म्हटले. उभी हयात ज्यांनी भजनसेवेत घालवली त्या सोमनाथबुवांच्या आत्म्याला ही भजने इहलोकीची यात्रा संपवून जातांना शांती देतील असे ते वातावरण होते.

त्यांचा मृतदेह त्यांच्या चिंबल निवासस्थानी काल सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आणला त्यावेळी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी रीघ लागली होती. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनीही त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना श्रध्दांजली वाहिली.

ज्येष्ठ गायक व गोवा संगीत महाविद्यालयाचे माजी प्राचार्य पं. कमलाकार नाईक, विद्यमान प्रभारी प्राचार्य डॉ. शशांक मक्तेदार, सोमनाथबुवा बरोबर अनेक वर्षे भजनात तबल्याची साथ दिलेले पं. तुळशीदास नावेलकर, कला अकादमीचे माजी सदस्य सचिव तथा लोककलांचे गाढेअभ्यासक विनायक खेडेकर, स्वातंत्र्यसैनिक तथा साहित्यिक नागेश करमली, माजी आमदार धर्मा चोडणकर, कला संस्कृती संचालनालयाचे उपसंचालक अशोक परब, समाज कार्यकर्ते ऍड. आयरिश रॉड्रिग्स, गोमंतक मराठी समाजाचे अध्यक्ष गोरख मांद्रेकर, ज्येष्ठ कवी लक्ष्मण पित्रे, प्रा. रामराव वाघ, स्वस्तिकचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गावकर, चिंबलचे सरपंच चंद्रकांत कुंकळेकर आदी अनेक मान्यवर त्यांच्या अंत्यदर्शनाला उपस्थित होते. शिवाय शिष्य मंडळी, कलाकार मंडळी, भजनी प्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. गोव्याच्या काना कोपर्‍यांतून ही मंडळी आली होती.

सोमनाथबुवांना निरोप देतांना अनेकांचे डोळे पाणावले. त्यांचे सुपुत्र सुहास्य च्यारी यांनी त्यांच्या चितेला अग्नी दिली. अंत्यविधी समयी श्रीपाद नाईकही उपस्थित होते.