बोलकी घरं!

0
394

नेहमी बसमधून मडगावला जाताना वेर्णा ते नुवे या भागात रस्त्याच्या दुतर्फा पोर्तुगीजकालीन बांधणीची छान लहान-मोठी घरं दिसतात. एखादं छान-सुबक घर दिसलं की वाटतं, आपलं पण असंच एक सुंदर घर असावं!
…आणि मग मनामध्ये नाना प्रकारचे विचार येतात. खरंच सुंदर घर आहे, पण या घरातील माणसं सुखी-समाधानी-आनंदी असतील का? एखाद्या घराच्या व्हरांड्यामध्ये एखादा वृद्ध एकटाच बसलेला असतो. त्याला पाहून वाटतं याची काळजी घेणारं घरात दुसरं कुणी असेल का? पत्नी, मुलं वगैरे? का याची मुलं परदेशी स्थायिक होऊन राहिली असतील? पत्नी तरी असेल का? असलीच तर यांची आणि स्वतःची काळजी घेऊ शकत असेल का? एकमेकांची सुखं-दुःखं वाटून घेत असतील का? यांच्यामध्ये काही सुसंवाद घडत असेल का? का ‘दोन ध्रुवांवर दोघे आपण, तू तिकडे अन् मी इकडे’ असं घरातल्या घरात होत असेल?
बर्‍याच वेळा अशा छान घरांमध्ये एखादं वृद्ध जोडपं किंवा दोघांपैकी कुणीतरी एक एकाकीपणे जीवन कंठीत असतं. कुणीतरी कामवाली येऊन आपल्या मनाप्रमाणे काम आटोपून जात असते. कुणीतरी दोन वेळा जेवणाचा डबा आणून देत असते. आणि बाकीचा वेळ आपल्या गतकाळातल्या कौटुंबिक आठवणींची उजळणी करण्यात जात असतो.
काही वर्षांपूर्वी मी माझ्या पतीबरोबर त्यांच्या काही कामासाठी एका कॅथलिक घरात गेले होते. घर चांगलं मोठं होतं. दहाबारा खोल्यांचं. बाहेरून पण खूप छान दिसत होतं. कुणालाही हेवा वाटेल असं. पुढे-मागे, आजूबाजूला चांगली मोठ्ठी बाग होती. बागेत सगळ्या प्रकारची लहान-मोठी झाडे होती. पण त्या घराच्या मालकिणीला भेटले आणि भ्रमनिरास झाला. तिचा एकुलता एक मुलगा अपघातात गेला होता. एक विवाहित मुलगी त्याच गावात राहात होती. नोकरी करीत होती. अधूनमधून येऊन आपल्या आईला भेटून जायची. पण त्या बाईच्या बोलण्यावरून मुलीशीही तिचे विशेष सख्य असेल असे वाटत नव्हते. तब्येत पण ढासळलेली. कुणाला तरी पैसे देऊन मदतीला घेऊन दवाखान्यात वगैरे जायची. सार्‍या जगाबद्दल मनात अविश्‍वास बाळगायची. सगळेच आपल्याला फसवायला टपलेत असे तिला वाटायचे. काय अर्थ आहे अशा जगण्याला? काय कामाचं हे घर, हा जमीनजुमला आणि ही श्रीमंती?
एखादं घर कायम बंदच दिसायचं. जणू आपल्या सोबतीला कोणी येईल का याची वाट पाहत, अश्रू ढाळत. कधीकाळी या घरात माणसांचा राबता असेल, मुलाबाळांच्या हसण्या-खेळण्याचा आवाज घुमला असेल. पण आज मात्र ते घर खिन्नपणे भूतकाळातील आठवणी काढत असेल….
अशावेळी मला माझ्या माहेरच्या घराची आठवण येते. आमचं चांगलं मोठं दुमजली घर. लहानपणी आम्ही सात भावंडं, आई, बाबा, आजी आणि एक मावशीही कायम राहायची आमच्याबरोबर. उजाडल्यापासून अंधारेपर्यंत कायम घराचा मुख्य दरवाजा सताड उघडा असायचा. सतत नातेवाईकांची, ओळखीपाळखीच्या लोकांची घरात वर्दळ. दिवसभर घरात आवाज हसण्या-खिदळण्याचा, भांडणाचा, रडण्याचा. बापरे! किती गजबज दिवसभर… पण मोठे होता होता एकेक पाखरू दाणापाणी शोधण्यासाठी निघून गेलं. शेवटी तर घराला कुलूपच लागलं. कधी आठवण अनावर झाली की आम्ही बहिणी जात असू घराला भेटायला. पण ते इतकं केविलवाणं वाटायचं की आम्हाला रडूच कोसळायचं त्याला पाहून. आणि वाटायचं घरही रडतंय आमच्यासाठी, आमच्याबरोबर. आम्ही वेड्यासारखं उगीचंच घरभर फिरत असू. भिंती-भिंतीवरून हात फिरवत असू. काही वर्षांपूर्वी आक्काही गेली आणि माहेर जवळजवळ बंदच झालं. आता दादा निवृत्त होऊन आलाय घरी. कधीतरी वर्ष, सहा महिन्यांतून एखाद दिवशी जाते भेटायला. पण आता घर खूप परकं वाटतं.
मी नोकरीत असताना असोल्डा गावात काही वर्षे राहिले होते. तेथे एका भाटकाराच्या चौसोपी वाड्यात भाड्याने बिर्‍हाडाला राहिले होते. गावातील बहुतेक नोकरदार मंडळी याच वाड्यात भाड्याने राहत होती. पण वाड्याचे मालक चारही भाऊ मात्र जवळपासच्याच वेगवेगळ्या शहरांत राहायचे. वर्षातून दोनतीन वेळा सणावारी सगळेजण वाड्यात एकत्र जमत. त्यावेळी वाड्याला जणू धुमारे फुटल्याचा भास व्हायचा, इतका आनंदी असायचा वाडा! सगळी मुलंबाळं एकत्र यायची. लांबच्या लांब पंगती बसायच्या. सगळ्या गृहिणींची स्वयंपाकाची आणि येणार्‍या-जाणार्‍यांच्या आदरातिथ्याची लगबग चाललेली असायची. वाटायचं, वाडा चार मुखांनी बोलतोय, आनंद व्यक्त करतोय. पण दोनचार दिवसांतच वाडा रिकामा व्हायचा, आणि पोटात पाय आकसून घेतलेल्या गोगलगाईप्रमाणे निर्जीव वाटायचा.
मी मुंबईच्या चाळीही पाहिल्या आहेत. पाहू गेल्यास त्या चाळीत अनेक बिर्‍हाडं, अनेक कुटुंबं राहतात. पण प्रत्येक कुटुंबाची सुख-दुःखे एकमेकांशी अशी जोडलेली असतात की वाटतं ही अख्खी चाळ म्हणजे एकच भलं मोठं कुटुंब आहे. तेथील परिस्थिती, तेथील चहल-पहल पाहून सगळ्या मोठमोठ्या इमारतींना, बंगल्यांना त्या चाळीचा हेवा वाटावा. एका कुटुंबात कुणी आजारी असलं, दुःखी असलं की सार्‍या चाळीवर त्याचं सावट पडतं. त्याच्या दुःखात सहभागी व्हायला, त्याचं दुःख दूर करायला सारी चाळ धावून येते. एखाद्या घरात कुणाचं बारसं, मुंज, लग्न, कोणताही विशेष प्रसंग असला की संपूर्ण चाळीत धुमधाम. जणू काही हे कार्य त्यांच्या घरचंच; सार्‍या चाळीचं आहे!
मोठ्या इमारतीतील सदनिकांची तर वेगळीच तर्‍हा. अगदी शेजारील सदनिकेमध्ये राहणारी माणसंही एकमेकांना अनोळखी. मोठी तर मोठी; छोटी मुलंसुद्धा एकमेकांशी मिळून-मिसळून वागतील तर शपथ! बहुतेक सगळ्या घरांना दिवसभर कुलूपच.
माणसाप्रमाणंच प्रत्येक घराचंही एक प्राक्तन असावं. काही दिवस ते मुलांमाणसांनी भरलेलं… सुखी-समाधानी-आनंदी बोलकं घर असतं. काही काळाने ती माणसं, ते सूख-समाधान-आनंद लुप्त होऊन जातो आणि घर मुकं बनतं.
मी जेव्हा बसमधून जाताना ही घरे निरखीत असते तेव्हा मनात हेच विचार येतात. यातील कोणती आणि किती घरं मुकी झालेली असतील? आणि बोलकी घरं…? ती असतील तरी का?