बोर्डे-डिचोली येथे अपघातात एक ठार

0
13

डिचोली – म्हापसा मुख्य रस्त्यावर कुंभारवाडा बोर्डे डिचोली येथे काल गुरूवार दि. 19 रोजी रात्री दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात उसप लाटंबार्से येथील वीज कर्मचारी श्रीराम गावकर (37) यांचा मृत्यू झाला.

सदर अपघात रात्री 8 वा. च्या सुमारास घडला. जीए 04 के 3146 या दुचाकीने पडोसे येथील एक युवक म्हापशाच्या दिशेने जात होता. तर त्याचा मागाहून जीए 04 एम 9863 या दुचाकीने येणाऱ्या दुचाकीस्वार श्रीराम गावकर (उसप लाटंबार्से) यांनी वरील दुचाकीला मागून धडक दिली. या धडकेत दोन्ही चालक रस्त्यावर पडले. परंतु श्रीराम गावकर यांचे तोंड व डोके रस्त्यावर आपटले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले.

यावेळेी जमलेल्या स्थानिकांनी 108 रूग्णवाहिकेला संपर्क केला. परंतु डिचोली येथील रूग्णवाहिका अन्यत्र गेल्याने ती वेळीच पोहोचू शकत नव्हती. त्यामुळे चोडण येथून रूग्णवाहिका पाठविण्यात आली. ती पोहोचेपर्यंत अर्धा तासावर वेळ गेला. त्याच दरम्यान गंभीर जखमी असलेल्या श्रीराम यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मयताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथे गोमेकॉत पाठविण्यात आला. याप्रकरणी डिचोली पोलीस उपनिरीक्षक विकेश हडफडकर अधिक तपास करीत आहेत.