बेरोजगारीच्या आकडेवारीसाठी खात्यावर विसंबून राहू नका

0
9

>> कामगार व रोजगारमंत्री बाबूश मोन्सेरात यांचा नागरिकांना सल्ला

राज्यातील नागरिकांनी कामगार व रोजगार खात्याच्या राज्यातील बेरोजगारी संबंधीच्या आकडेवारी विसंबून राहू नये. खात्याच्या रोजगार केंद्राकडून खासगी क्षेत्रातील नोकर्‍यांची माहिती ठेवली जात नाही. केवळ सरकारी खात्यातील नोकर्‍यांबाबत माहिती गोळा केली जाते, असे कामगार व रोजगारमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.

गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील बेरोजगारीबाबत माहिती देण्यात आली होती, त्यात राज्यात १.१६ लाख नागरिक बेरोजगार असल्याचे म्हटले आहे. बेरोजगार असलेल्यांना सरकारी नोकरी मिळालेली नाही. तथापि, बेरोजगार म्हणून नोंद असलेले बहुतांश व्यक्ती खासगी क्षेत्रात नोकरी करू शकतात. खासगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांबाबत माहिती घेऊन बेरोजगारीबाबत वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असेही मोन्सेरात यांनी सांगितले.

युवा वर्गाने आपल्या मानसिकतेमध्ये बदल केला पाहिजे. केवळ सरकारी नोकरीवर विसंबून राहता कामा नये. राज्यात खासगी क्षेत्रात नोकर्‍या निर्मितीवर भर दिला जात आहे. तसेच युवा वर्गाला स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे, असेही मोन्सेरात यांनी सांगितले. दरम्यान, बाबूश मोन्सेरात यांनी पणजी महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांवर चर्चा करण्यासाठी सरकारी अधिकार्‍यांची बैठक काल घेतली. या बैठकीत रस्ता, मलनिस्सारण, वीज, पाणी, आरोग्य, वाहतूक, पर्यटन व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.