बॅअरस्टोव, हेझलवूडचा ‘टॉप १०’ मध्ये प्रवेश

0
246

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने काल गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजांमध्ये आपले पहिले स्थान कायम राखले आहे. इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बॅअरस्टोव याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील दमदार कामगिरीच्या बळावर ‘टॉप १०’मध्ये प्रवेश केला आहे.

कोहली ८७१ गुणांसह पहिल्या तर उपकर्णधार रोहित शर्मा ८५५ गुणांसह दुसर्‍या क्रमांकावर कायम आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत १९६ धावा जमवलेल्या बॅअरस्टोवला सातत्यपूर्ण कामगिरीमुळे अव्वल दहांत स्थान प्राप्त करता आले आहे. ३० वर्षीय बॅअरस्टोव याने यापूर्वी २०१८ साली ऑक्टोबर महिन्यात नवव्या स्थानापर्यंत मजल मारली होती. सध्या बॅअरस्टोव याचे वैयक्तिक सर्वाधिक ७७७ रेटिंग गुणांपेक्षा २३ गुण कमी आहेत. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज जोश हेझलवूड याने जवळपास दोन वर्षांनंतर ‘टॉप १०’मध्ये पुनरागमन केले आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात ३४ धावांतील ३ बळींसह सामनावीर ठरलेल्या हेझलवूड याने १५व्या स्थानावरून थेट आठवे स्थान प्राप्त केले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या मालिका विजयात सिंहाचा वाटा उचललेल्या ग्लेन मॅक्सवेल व आलेक्स केरी यांनी देखील क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. मॅक्सवेल याने पाच स्थानांची सुधारणा करताना आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंग याच्यासह संयुक्त २६वे स्थान मिळविले आहे. मॅक्सवेलने मालिकेत १८६ धावा केल्या. तर यष्टिरक्षक फलंदाज आलेक्स केरीने आपल्या १५२ धावांच्या बळावर ११ स्थानांची प्रगती करत २८व्या क्रमांकावर हक्क सांगितला आहे.

गोलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा अष्टपैलू ख्रिस वोक्स याला सर्वाधिक लाभ झाला आहे. मालिकेतील सहा बळींमुळे त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम चौथे स्थान मिळविले आहे. न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट व भारताचा जसप्रीत बुमराह अनुक्रमे पहिल्या व दुसर्‍या स्थानी आहेत.
वोक्स हा अष्टपैलूंच्या यादीत द्वितीय क्रमांकावर आहे. त्याने आपलाच संघ सहकारी बेन स्टोक्स याला मागेे टाकले. पहिल्या स्थानावरील अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी व वोक्स यांच्यात केवळ २० गुणांचे अंतर आहे.

पाचवेळच्या विश्‍वविजेत्या ऑस्ट्रेलियाने सुपर लीगमधील पहिल्या मालिका विजयाचे २० गुण मिळविले आहेत. सुपर लीगमध्ये पहिल्या सात स्थानावर राहणारे संघ २०२३ विश्‍वचषकासाठी थेट पात्र ठरणार आहेत. सुपर लीगमध्ये दोन मालिका खेळणारा इंग्लंड हा एकमेव संघ आहे. आयर्लंडविरुद्धची पहिली मालिका त्यांनी २-१ अशी जिंकली होती.