बिघाड झाल्याने इस्रायली विमानाचे दाबोळी तळावर आपत्कालीन लँडिंग!

0
32

विमानात बिघाड झाल्याने सुमारे २५० प्रवाशांसह इस्रायलच्या विमानाला सोमवारी पहाटे दाबोळी विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. बोईंग ७८७ विमानाच्या पायलटला इंधन गळतीचे सूचक दिवे दिसले. त्यानंतर पायलटने प्रभावित इंजिन बंद करून परवानगी मिळाल्यानंतर दाबोळी विमानतळावर विमान उतरवले.

परराष्ट्र मंत्रालयाने अधिकार्‍यांनी संपर्क साधला व भारत सरकारच्या नियमांनुसार प्रत्येक प्रवाशाची आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर प्रवासी व विमानांतील कर्मचार्‍यांना जवळच्या हॉटेलमध्ये एक रात्र राहण्यास परवानगी देण्यात आली.

दाबोळी विमानतळाचे संचालक गगन मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ४ वाजता विमानाचे गोवा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. हे विमान बँकॉकहून तेल अवीवला जात होते. त्यात सुमारे २५० प्रवासी होते. तथापि, इंजिनमध्ये समस्या निर्माण झाल्याने विमानाचे दाबोळी विमानतळावर तात्काळ लँडिंग करण्यात आले. त्यात सुमारे ५० थायलंडचे व २०० इस्रायली प्रवासी होते. इमर्जन्सी लँडिंगवेळी कोणीही प्रवासी जखमी झाले नाहीत. या प्रवाशांना तेल अवीवला नेण्यासाठी दुसरे विमान काल गोव्यात आल्याचे मलिक यांनी सांगितले.