बार्ज मालकांना वार्षिक शुल्क कपातीसाठी प्रस्ताव तयार

0
119
????????????????????????????????????

एका कॅसिनोच्या स्थलांतराचा आदेश आठ-दहा दिवसांत
>> अन्य कॅसिनोंबाबत कळ सोसावी ः लोबो

राज्यातील खाण बंदीमुळे खनिजवाहू टिप्पर ट्रक मालकांना रस्ता शुल्कात सूट देण्यात आलेली आहे. त्याच धर्तीवर बार्ज मालकांना बार्ज शुल्कांमध्ये सूट किंवा कपात करून दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. बंदर कप्तान खात्याने बार्ज मालकांना वार्षिक शुल्कामध्ये सूट किंवा कपात देण्यासंबंधीचा एक प्रस्ताव तयार केला आहे. मुख्यमंत्र्यांकडून या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर कार्यवाही केली जाणार आहे, असेही बंदर कप्तान मंत्री लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना काल सांगितले.

राज्यातील खाण बंदीमुळे आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. खाण व्यवसाय बंद पडल्याने ट्रक मालक, बार्ज मालक व इतरांनी आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सरकारने टिप्पर ट्रक मालकांना रस्ता शुल्कात सूट देऊन दिलासा दिला आहे. राज्यातील बार्ज व्यवसायसुध्दा पूर्णपणे ठप्प आहे. या पार्श्‍वभूमीवर बार्ज मालकांना बार्ज शुल्कात सूट किंवा कपात करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, असेही मंत्री लोबो यांनी सांगितले.

राज्यातील खाण बंदीच्या प्रश्‍नावर येत्या नोव्हेंबर अखेरपर्यंत तोडगा निघाला पाहिजे. अन्यथा आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या सुधारणेसाठी खाण व्यवसाय पूर्ववत होणे गरजेचे आहे. खाणबंदीवरील तोडगा सर्वसमावेशक असला पाहिजे. मुख्यमंत्र्यांसमवेत नवी दिल्ली येथे खाण प्रश्‍नाचा पाठपुरावा करण्यासाठी जाण्याची आपली तयारी आहे, असेही मंत्री लोबो यांनी सांगितले.

मांडवी नदीतील एक तरंगता कॅसिनो आग्वादच्या बाजूला स्थलांतरित करण्यासंबंधीचा आदेश येत्या आठ ते दहा दिवसात जारी केला जाणार आहे, अशी माहिती बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना येथे काल दिली.
पाण्यात पसरणारे वंगण (ऑईल) गोळा करणार्‍या अंदाजे ४ कोटी १८ लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या बंदर कप्तान खात्याच्या नवीन जहाजाचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री लोबो बोलत होते. मांडवी नदीतील सहा कॅसिनोंपैकी एक कॅसिनो आग्वादच्या बाजूच्या भागात स्थलांतरित करण्यासाठी जागा निश्‍चित करण्यात आलेली आहे. बंदर कप्तान खात्याकडून यासंबंधीचा अहवाल तयार केला जात आहे. राज्य सरकारने मांडवी नदीत तरंगते कॅसिनो सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नदीतील तरंगते कॅसिनो एकदम बंद करू शकत नाही. कॅसिनो मालकांना कॅसिनोच्या स्थलांतरासाठी वेळ दिला पाहिजे. त्यामुळे पणजीतील नागरिकांनी थोडी कळ सोसली पाहिजे, असेही मंत्री लोबो यांनी सांगितले.

व्यापार परवान्यावर
मनपाने फेरविचार करावा
राज्य सरकार मांडवीतील कॅसिनो स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आग्वाद किंवा बेतीच्या बाजूला दोन कॅसिनो जहाजे स्थलांतरित केली जाऊ शकतात. त्यामुळे पणजी महानगरपालिकेने तरंगत्या कॅसिनोच्या व्यापार परवान्याचे नूतनीकरण न करण्याचा निर्णयावर फेरविचार केला पाहिजे, असेही मंत्री लोबो यांनी सांगितले.
मोपा विमानतळाचे काम मार्गी लागल्यानंतर कॅसिनो मोपा येथे गेमिंग विभागात स्थलांतरित केले जाऊ शकतात. त्यासाठी कॅसिनो धोरण आणि आवश्यक साधन सुविधा निर्माण करण्याची गरज आहे, असेही मंत्री लोबो यांनी सांगितले.

मनपा ठाम ः मडकईकर
पणजी महानगरपालिका कॅसिनोच्या व्यापार परवान्याचे नूतनीकरण न करण्याच्या निर्णयावर ठाम आहे, असे महापौर उदय मडकईकर यांनी बंदर कप्तान मंत्री लोबो यांच्यासमोर बोलताना सांगितले. मांडवीतील कॅसिनो स्थलांतरित करण्याची गेल्या कित्येक वर्षापासून मागणी केली जात आहे. पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी कॅसिनो जहाजाच्या स्थलांतराचे आश्‍वासन दिलेले आहे. कॅसिनो बंद करण्याची मागणी केलेली नाही. तर, मांडवी नदीत कॅसिनोचे स्थलांतर करण्याची मागणी केली जात आहे, असेही महापौर मडकईकर यांनी सांगितले.