बायोस्कोप फ्लॅट … ब्लॉक … अपार्टमेंट

0
138
  • प्रा. रमेश सप्रे

‘तुमची (भारतीय) संस्कृती नि आमची (पाश्चात्त्य) संस्कृती यातला महत्त्वाचा फरक एका वाक्यात सांगायचा झाला तर कोणता सांगाल?’
पटकन् उत्तर आलं स्वामी विवेकानंदांकडून …‘आमच्या संस्कृतीत घराबाहेर दुसरं घर असतं तर तुमच्या संस्कृतीत घराबाहेर रस्ता असतो’.

आपला बायोस्कोप म्हणजे सिनेमा नाही. चलत्‌चित्रपटासारखा. तर मायक्रोस्कोप म्हणजे जीवनदर्शक. आजच्या जीवनाची विविध चित्रंच दाखवत नाही तर हा बायोस्कोप जीवनदर्शन घडवतो म्हणजे जीवनाबद्दल नवं चिंतन करतो…नवी दिशा नवी दृष्टी देतो.

पूर्वी आपण ज्याला घर म्हणायचो त्याला खोल्या असायच्या. दिवाणखाना, माजघर, स्वयंपाकघर नि मुख्य म्हणजे देवघर. या खोल्यांनासुद्धा फक्त लांबी रुंदी नसायची तर उंची नि खोलीही असायची. उंची विचारांची, संस्कारांची अन् खोली भाव-भावनांची. खरंच ‘खोली’ असायची म्हणून तर त्याला ‘खोली’ म्हणायचे. तिचे घरातील इतर खोल्यांशी नव्हे तर शेजारच्या घरांशीही संबंध असायचे.
बाहेरच्या खोलीत (दिवाणखान्यात) आल्यागेल्याचं आगतस्वागत होई नि खाताना- पिताना गप्पांचा फड रंगे. विशेषतः पुरुष मंडळींचा. मधल्या खोलीत म्हणजे माजघरात महिलावर्गाचं राज्य असे. ‘पेटिकोट गव्हर्मेंट’! इथं कुणी आजारी असेल तर आस्थेनं विचारपूस व्हायची. घरगुती औषधं नुसती सुचवली जायची नाहीत तर करून आणून दिली जात. विविध काढे, निरनिराळ्या मात्रांचे वळसे, वेगवेगळी चाटणं नि आसवं- द्राक्षासव, कुमारी आसव इ. हे सारं करताना डोळ्यातून आसवंही ओघळायची सहानुभूतीची, माणुसकीची.

स्वयंपाकघरात असतील तेच पदार्थ- त्यांचं प्रमाण बदलून, निरनिराळी मिश्रणं बनवून नवनवीन पदार्थ बनवले जायचे. फोडणीचा भात, चपातीचा तूपगूळ घालून केलेला लाडू, भाकरी असेल तर ताक, तिखटमीठ घालून केलेला कुस्करा… विशेष म्हणजे असले पदार्थ शिळ्या भात- भाकरी- आमटी अशा पदार्थांपासून बनवले जात नि ते कमालीचे रुचकर असत. आजच्यासारख्या देशीविदेशी डिशेस नि रेसिपीज् नसायच्या ज्या जिभेला चटकदार पण तब्येतीला मारक असतात. पूर्वी पाकगृहात साधा, सकस, सरस आहार बने – एक शीतही – एक कणही वाया जाऊ दिला जात नसे. अगदी कोंड्याचासुद्धा मांडा करून मजेत खाल्ला जाई. उरलेले सगळे पदार्थ, अगदी भाजी- आमटीसुद्धा एकजीव करून, कुस्करून जे थालीपीठ बनवलं जाई ते आजच्या पिझ्झा पास्ताच्या थोबाडीत मारणारं असे. आजच्यासारखं इन्स्टंट फूड, टेक् अवे आयटम्स नि खाण्याची पार्सलं नसत. ही परिस्थिती फ्लॅट – ब्लॉक – अपार्टमेंट संस्कृतीला मॅचिंग अशीच आहे.

एकदा स्वामी विवेकानंदाना परदेशात एक गंमतीदार पण चिंतनीय प्रश्‍न विचारला गेला. ‘तुमची (भारतीय) संस्कृती नि आमची (पाश्चात्त्य) संस्कृती यातला महत्त्वाचा फरक एका वाक्यात सांगायचा झाला तर कोणता सांगाल?’
पटकन् उत्तर आलं स्वामी विवेकानंदांकडून …‘आमच्या संस्कृतीत घराबाहेर दुसरं घर असतं तर तुमच्या संस्कृतीत घराबाहेर रस्ता असतो’. साधं वाटलं तरी अंतर्मुख होऊन चिंतन करायला प्रेरणा देणारा हा विचार आहे. घराशेजारचं घर म्हणजे शेजार (नेबरहूड) आणि त्यात राहणारे लोक ते शेजारी (नेबर्स). विशेष म्हणजे आमच्या शेजार्‍यांचे शेजारी आम्ही असायचो. एकमेकांचे सख्खे शेजारी ही वस्तुस्थितीच कालबाह्य झालीय आजच्या फ्लॅट- ब्लॉक- अपार्टमेंटच्या जगात नि जीवनात. शेजारधर्म हा शब्दसुद्धा काळकोठडीत अदृश्य झालाय. याला ‘कालाय तस्मै नमः’ म्हणून शरण जायचं की आजच्या तुटक जीवनशैलीत नवं वातावरण निर्माण करायचं? हाच खरा प्रश्‍न, नव्हे हेच खरं आव्हान आहे.
जेव्हा घराला फ्लॅट म्हणू लागले तेव्हा आत राहणार्‍या लोकांची दृष्टी, वृत्ती, कृती एकूण जीवनपद्धतीही फ्लॅट बनली. म्हणजे मी आहे राजा. माझी पत्नी आहे राणी. मुलगा राजकुमार तर मुलगी राजकुमारी. हो, तेव्हा दोन मुलं असायची. या राजाला किंवा राणीला विचारलंत की ‘काय हो, तुमचं राज्य आहे तरी केवढं?’ यावर अभिमानानं उत्तर येई – पन्नास स्क्वेअर मीटर्स किंवा पाचशे स्क्वे. फूट! यात खास गोष्ट ही असायची की या पाचशे फुटाबाहेर राजा-राणींना कोणतीही सत्ता नसायची. अगदी समोरच्या कॉमन कॉरिडॉर (व्हरांडा) किंवा जिना कधीतरी स्वच्छ करणारी झाडूवालीसुद्धा तिला ‘नीट झाड’ म्हटल्यावर नागीणीसारखी फणा काढून म्हणायची, ‘मी तुमची नोकर न्हाई.’

पुढे शब्द आला ब्लॉक. आता म्हणू लागले बीएचके! टू बीएचके म्हणजे दोन बेडरुम, हॉल नि किचन. आता तीन (किंवा अडीच) बीएचके. याचा अर्थ घरातली महत्त्वाची रुम झाली बेडरुम. सारा पुरुषार्थ, पराक्रम इथंच. कारण हॉलमध्ये कुणी फारसं येईनासं झालं. किचनचा उपयोग कुकिंगपुरताच. डाइनिंग बाहेर. निराळीच लाइफस्टाइल सुरू झाली. शब्द मुद्दामच इंग्रजी वापरलेयत. कारण ही शैलीही पाश्चात्यांचं अनुकरण करणारी आहे.

काळाच्या ओघात घराला म्हणू लागले अपार्टमेंट. त्याबद्दल आमच्या रामरावांची (इंग्रजीचे निवृत्त प्राध्यापक) प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. त्यांच्याच शब्दात, ‘म्हणे अपार्टमेंट. म्हणजे आय् ऍम् नॉट् युअर् पार्ट, यू आर नॉट माय पार्ट… टिल वुई डिपार्ट!’ याचा अर्थ तुझा-माझा (शेजारी म्हणून) काहीही संबंध नाही, अगदी मरेपर्यंत! किती छान वाटतं नाही हे ऐकून? रामराव पुढे म्हणतात, ‘अहो, या अपार्टमेंटपेक्षा ऑफिसची डिपार्टमेंट्‌स नि रेल्वेची कंपार्टमेंट्‌स बरी. काहीतरी संबंध असतो परस्परांचा. बघा विचार करून!’
अगदी खरं आहे. गंमत म्हणजे या फ्लॅट् – ब्लॉक् – अपार्टमेंटमध्ये काहीतरी ‘अटॅच्ड’ असतं. ‘सेल्फकंटेन्ड’ही असतं. त्याचंही दर्शन वायोस्कपमध्ये घेऊ, पुढे कधीतरी.

या सगळ्या इंग्रजी शब्दांना आपला एकच शब्द आहे. म्हणजे आतलं वातावरण जरी तेच असलं तरी नाव गोड आहे – ‘सदनिका’. सदन, भवन, निवास मोठे असतात. सदनिका असते छोटी. पण याहीपेक्षा छोट्या असलेल्या झोपडीत जी शांती, तृप्ती असते ती कुठं असते सदनिकेत? सदनिकेतले सदस्य म्हणतात (सार्‍या सुखसोयी हात जोडून उभ्या असूनही) ‘कसलं हे जीवन? रोज तेच तेच तेच तेच! दिवसभर मर मर मरायचं नि रात्री निवार्‍याला यायचं.’ निवारा, निवास नव्हे! पण तुकडोजी महाराज धन्यतेनं म्हणतात, ‘‘मरुनी जिवंत व्हावे या —
झोपडीत माझ्या..’’ खरं आहे ना हे?