मॉडर्न पेंटाथलॉनमध्ये गोव्याला सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाच्या दिवशीच घवघवीत यश
तप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अधिकृत उद्घाटन होण्याच्या दिवशीच गोव्याने घवघवीत यश संपादन केले. फोंडा येथे संपन्न झालेल्या मॉडर्न पेंटाथलॉन क्रीडा प्रकारात गोव्याच्या संघांनी गुरुवारी सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकाची कमाई केली. मॉडर्न पेंटाथलॉनमधील लेझर रन प्रकारात नेत्रावळी-सांगे येथील 22 वर्षीय बाबू गावकर याने गोव्याला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले.
बाबू गावकर याने पुरुषांच्या लेझर रन प्रकारात 12.26.27 सेकंद अशी वेळ नोंदवत गोव्याला सुवर्ण जिंकून दिले. काही स्पर्धांमध्ये पदकाच्या जवळ येऊन हुलकावणी मिळाल्यानंतर गोव्याचे ह्या स्पर्धेतील हे पहिलेच पदक ठरले. बाबू गावकर याने यानंतर सीता गोसावी हिच्यासह मिश्र रिलेमध्ये रौप्य पदक मिळवून दिले. गावकर-गोसावी यांच्या मिश्र रिले संघाने 16.01.50 अशी वेळ नोंदवली. हरियाणाच्या अंजू-रवी जोडीने 15.23.91 अशा वेळेसह सुवर्ण मिळवले. गोव्याच्या महिला संघाने रेझर रनमध्ये कांस्य पदक मिळविले. महिलांच्या रेझर रनमध्ये मध्य प्रदेशने सुवर्ण, तर महाराष्ट्राने रौप्य पदक जिंकले.
दरम्यान, गोव्याच्या पुरुष नेटबॉल संघाने फास्ट फाईव्ह प्रकारात आपल्या सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. ‘अ’ गटातील पहिल्या सामन्यात त्यांनी उत्तर प्रदेशचा 33-20 असा पराभव केला. यानंतर राजस्थानला त्यांनी 40-28 असे पराजित केले. महिला संघाला मात्र हिमाचल प्रदेश व केरळकडून पराभवामुळे बाहेर जावे लागले. हिमाचलने गोव्याचा 24-15 असा, तर केरळने 26-24 असा पराभव केला.