बाबुश प्रकरणातील मुलीचा शोध जारी

0
196

>> मुख्यमंत्री : सत्य लवकरच उघड

माजी मंत्री बाबुश मोन्सेर्रात यांच्या विरोधातील कथित बलात्कार प्रकरणातील बेपत्ता युवतीचा शोध सुरू असून सत्य लवकरच बाहेर येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काल दिली. सरकारने य्ुवतीच्या बेपत्ता प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून युवतीला ठेवण्यात आलेला आश्रम, शिक्षण घेत असलेले महाविद्यालय व इतर ठिकाणी पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. युवतीच्या चौकशी प्रकरणाचा दर दिवशी आढावा घेतला जात आहे. सदर युवतीचे अपहरण की बेपत्ता हे चौकशीत उघड होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कॅसिनोबाबत निर्णय अभ्यासाअंती
मांडवी नदीतील तरंगते कॅसिनो बंद करण्याच्या भाजपच्या निवेदनावर अभ्यासाअंती निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मांडवी नदीतील तरंगते कॅसिनो बंद करण्याची नागरिकांची मागणी असून कॅसिनो बंद करण्यासाठी सरकारला निवेदन सादर केले जाणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी दिली होती. यासंबंधीच्या प्रश्‍नावर बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, सरकारला भाजपचे मांडवितील तरंगते कॅसिनो बंद करण्याबाबतचे निवेदन मिळाले आहे. या निवेदनावर अभ्यासाअंती योग्य निर्णय घेतला जाणार आहे.

राज्यातील १८ खाण लीजेेस वर्ष २०२० पर्यंत वैद्य आहेत. केंद्र सरकारकडून या खाणी सुरू करण्यासाठी पर्यावरण दाखला व इतर परवाने घ्यावे लागणार आहेत. ८८ खाण लीजेस प्रकरणी न्यायालयाच्या माध्यमातून तोडगा काढला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
शहांवरील हल्ल्याचा निषेध
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकाता येथील रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे.