बांगलादेशचा दक्षिण आफ्रिकेला दणका

0
97

 

बांगलादेशने काल क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेत बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा २१ धावांनी पराभव करत सर्वांत धक्कादायक निकालाची नोंद केली. प्रथम फलंदाजी करताना ३३० धावा फलकावर लगावल्यानंतर बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेचा डाव ८ बाद ३०९ धावांत रोखला. सलामीच्या लढतीत इंग्लंडकडून दारुण पराभव झाल्यानंतर द. आफ्रिकेसाठी कालचा पराभव धक्कादायक ठरला.

विजयासाठी ३३१ धावांचा पाठलाग करताना द. आफ्रिकेला हाशिम आमलाची उणीव जाणवली. दुखापतीमुळे त्याला कालच्या सामन्यात खेळता आले नाही. पहिल्या गड्यासाठी ४९, दुसर्‍यासाठी ५३, तिसर्‍यासाठी ४५ व चौथ्यासाठी ५५ धावांची भागीदारी होऊनही दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी धावा कमी पडल्या. बांगलादेशच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या डावातील एकही भागीदारी खुलू दिली नाही. दक्षिण आफ्रिकेकडून ड्युप्लेसीने सर्वाधिक ६२ धावा केल्या.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्युप्लेसिसने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय संघाच्या अंगलट आला. आपल्या वेगवान मार्‍याच्या बळावर बांगलादेशला झटपट गुंडाळण्याच्या इराद्याने त्याने हा निर्णय घेतला. परंतु, खेळपट्टीकडून त्यांना अपेक्षित मदत मिळाली नाही. सलामीवीर सौम्य सरकार एन्गिडी व रबाडाच्या गोलंदाजीवर तुटून पडला. त्याने आणि तमिम इक्बालने पहिल्या गड्यासाठी ६० धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. ठराविक अंतराने सलामीचे फलंदाज माघारी परतल्यानंतर शाकिब अल हसन (७५) आणि मुश्फिकुर रहीम (७८) याने संघाचा डाव सावरला. शाकिबने आपले ४३वे तर रहीमने ३४वे वनडे अर्धशतक लगावले. त्यांनी तिसर्‍या गड्यासाठी २३.३ षटकांत ६.०४च्या सरासरीने १४२ धावांची भागीदारी केली. विश्‍वचषक स्पर्धेतील त्यांची ही सर्वाधिक भागीदारी ठरली. महमुदुल्ला व रहीम यांनी २०१५च्या विश्‍वचषकात इंग्लंडविरुद्ध पाचव्या गड्यासाठी केलेली १४१ धावांची भागीदारीचा विक्रम आज मोडला. मात्र यानंतर मधल्या फळीत महमदुल्ला, मोसद्देक यांनी फटकेबाजी करत संघाला ३०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. दक्षिण आफ्रिकेकडून फेहलुकवायो, ख्रिस मॉरिस आणि इम्रान ताहीर यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. दुखापतीमुळे प्रमुख वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी केवळ चार षटके गोलंदाजी करू शकला.

बांगलादेशने आपल्या क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक धावसंख्येची नोंद काल केली. यापूर्वी २०१५ साली पाकिस्तानविरुद्ध ३२९ धावा त्यांनी केल्या होत्या. विश्‍वचषक स्पर्धेत केवळ दुसर्‍यांदा बांगलादेशला तीनशे धावांचा टप्पा काल पार करता आला. २०१५ साली स्कॉटलंडविरुद्ध त्यांनी ३२२ धावांपर्यंत मजल मारली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावसंख्येचा आपला २७८ धावांचा विक्रमही बांगलादेशने काल मोडला.

दक्षिण आफ्रिकेने काल स्वैर मारा करतानाच ढिसाळ मैदानी क्षेत्ररक्षणही केले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण व योग्य टप्प्यावर मारा करण्यासाठी सुपरिचित असलेल्या आफ्रिका संघाने तब्बल २१ अवांतर धावांची खैरात बांगलादेशवर केली.

धावफलक
बांगलादेश ः तमिम इक्बाल झे. डी कॉक गो. फेहलुकवायो १६, सौम्य सरकार झे. डी कॉक गो. मॉरिस ४२ (३० चेंडू, ९ चौकार), शाकिब अल हसन त्रि. गो. ताहीर ७५ (८४ चेंडू, ८ चौकार, १ षटकार), मुश्फिकुर रहीम झे. दुसेन गो. फेहलुकवायो ७८ (८० चेंडू, ८ चौकार), मोहम्मद मिथुन त्रि. गो. ताहीर २१, महमुदुल्ला नाबाद ४६ (३३ चेंडू, ३ चौकार, १ षटकार), मोसद्देक हुसेन झे. फेहलुकवायो गो. मॉरिस २६, मेहदी हसन मिराझ नाबाद ५, अवांतर २१, एकूण ५० षटकांत ६ बाद ३३०
गोलंदाजी ः लुंगी एन्गिडी ४-०-३४-०, कगिसो रबाडा १०-०-५७-०, आंदिले फेहलुकवायो १०-१-५२-२, ख्रिस मॉरिस १०-०-७३-२, ऐडन मार्करम ५-०-३८-०, इम्रान ताहीर १०-०-५७-२, जेपी ड्युमिनी १-०-१०-०
दक्षिण आफ्रिका ः क्विंटन डी कॉक धावबाद २३, ऐडन मार्करम त्रि. गो. शाकिब ४५, फाफ ड्युप्लेसी त्रि. गो. मिराझ ६२, डेव्हिड मिलर झे. मिराझ गो. रहमान ३८, रस्सी वेंडर दुसेन त्रि. गो. सैफुद्दिन ४१, जेपी ड्युमिनी त्रि. गो. मुस्तफिझुर ४५, आंदिले फेहलुकवायो झे. शाकिब गो. सैफुद्दिन ८, ख्रिस मॉरिस झे.

ऑस्ट्रेलियाकडून अफगाणिस्तानचा पराभव
शनिवारी झालेल्या विश्‍वचषकातील चौथ्या व दिवसातील दुसर्‍या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा ७ गडी व ९१ चेंडू राखून पराभव केला. डेव्हिड वॉर्नरने यशस्वी पुनरागमन करताना ११४ चेंडूंत नाबाद ८९ धावांची खेळी केली. ऍरोन फिंचसह त्याने संघाला ९६ धावांची सलामी दिली. फिंचने केवळ ४९ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ६६ धावा कुटल्या. ऑस्ट्रेलियाने विजयी लक्ष्य ३४.५ षटकांत ३ गडी गमावून गाठले.

शाकिबने टाकले रझाकला मागे
बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५० बळी व ५ हजारांहून जास्त धावा करणारा सर्वांत वेगवान खेळाडू ठरला. ऐडन मार्करम हा शाकिबचा २५०वा बळी ठरला. शाकिबने केवळ १९९ सामन्यांत हा टप्पा ओलांडला. यानंतर अब्दुल रझाक (२५८ सामने), शाहिद आफ्रिदी (२७३), जॅक कॅलिस (२९६), सनथ जयसूर्या (३०४) यांचा क्रमांक लागतो.