बहुगुणी कडीपत्ता

0
64
  • – डॉ. मनाली महेश पवार

कोणताही पदार्थ चटकदार व आणखी चवदार करायचा असेल तर कढीपत्त्याची फोडणी दिली जाते. चवीसाठी वापरला जाणारा हा कढीपत्ता आरोग्यासाठीही तेवढाच फायदेशीर आहे. पण या कढीपत्त्याचे नेमके आरोग्यदायी फायदे माहीत नसल्याने काहींच्या घरात या पानांचा वापर कमी होतो.

फोडणीमधील अतिशय महत्त्वाचे द्रव्य, ज्याच्याशिवाय फोडणी पूर्णच होत नाही तो म्हणजे कढीपत्ता. कढीपत्त्याच्या पानांचा उपयोग जेवणाची चव वाढविण्यासाठी करतात. कोणताही पदार्थ चटकदार व आणखी चवदार करायचा असेल तर कढीपत्त्याची फोडणी दिली जाते. चवीसाठी वापरला जाणारा हा कढीपत्ता आरोग्यासाठीही तेवढाच फायदेशीर आहे. पण या कढीपत्त्याचे नेमके आरोग्यदायी फायदे माहीत नसल्याने काहींच्या घरात या पानांचा वापर कमी होतो. ‘काय हा पालापाचोळा जेवणात घालतात’ असाच काहींचा सूर असतो. जेवणात म्हणजे आमटीत, पोह्यात, चटणीच्या फोडणीसाठी, चिवड्यात, भडंगमध्ये, उप्पीट-उपम्यात इत्यादी पदार्थांत वापरला जाणारा कढीपत्ता हा बाहेर काढून ठेवण्यासाठीच असतो असा काहीसा गैरसमज आहे. त्यामुळे आज कढीपत्त्याचे गुणधर्म व उपयोग जाणून घेऊ म्हणजे यापुढे हा कढीपत्ता तुम्ही ताटाच्या बाहेर काढून टाकणार नाही तर त्या पानांचेही सेवन नक्कीच कराल.

कढीपत्त्याचे झाड बर्‍यापैकी मोठे आणि भारतातील वनांमध्ये सहज सापडते. जंगलात कढीपत्ता जास्त गडद रंगाचा दिसतो. त्याच्या बियाही बर्‍यापैकी सापडतात. या बिया गोळा करून आणून अंगणात लावल्या म्हणजे फार चांगल्या पद्धतीने रुजतात व झाड मोठे झाले की त्याच्याही बिया झाडाच्या आजूबाजूला पडून भरपूर रोपं येतात. कढीपत्त्याच्या फांदीपासूनदेखील नवीन रोपटे तयार होते.

कढीपत्ता ही उष्णकटीबंधीय वनस्पती आहे. त्यामुळे त्याला भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. कढीपत्त्याला पाण्याचा चांगला निचरा होणारी माती लागते. माती कोरडी झाल्यावर पाणी द्यावे. ताक ५% व पाणी ७५% एकत्र करून झाडाला दिल्याने पानांची चांगली वाढ होते व पालवी फुटते. कढीपत्ता २० फूट उंच वाढू शकतो. त्याची वर्षातून एकदा किंवा दोनदा काटछाट करावी. त्यामुळे कढीपत्त्याला चांगला आकार मिळतो व वाढीसही मदत होते. कढीपत्त्याला बुरशीचा (ब्लॅक स्पॉट फंगस) प्रादुर्भाव होतो. त्याच्या पानांच्या मागील बाजूस काळे डाग येतात. अशावेळी कडुनिंबाच्या तेलाचा फवारा करावा.

कढीपत्त्याचे औषधी गुणधर्म

  • कढीपत्त्याच्या पानांमध्ये कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस, ऍमिनो ऍसिड, प्रथिने भरपूर प्रमाणात असतात.
  • तसेच जीवनसत्वे अ, ब-१, ब-२ व क असतात.
    त्यामुळे कढीपत्त्याच्या सेवनाने हे सर्व गुणधर्म शरीराला मिळतात व त्यातूनच शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  • आयुर्वेदशास्त्रानुसार कढीपत्ता हा दीपक, पावक, कृमिघ्न व आमांशयासाठी पोषक असतो.

कढीपत्त्याचा उपयोग

  • आहारात कढी, आमटी, रसम, पोहे, चटण्या यांची चव वाढविण्यासाठी कढीपत्त्याची पाने नेहमी उपयोगात आणावीत. ही पाने पाचक असल्याने भूक वाढते व घेतलेला आहार पचण्यास मदत होते.
  • कढीपत्त्याच्या पानांमध्ये पालक, मेथी, कोथिंबीरपेक्षाही ‘अ’ जीवनसत्त्व जास्त असते, तसेच इतर भाज्यांपेक्षा कार्बोहायड्रेड व प्रोटिन्सही जास्त प्रमाणात असतात. अपचन, अरूची, अग्निमांद्य ही लक्षणे असल्यास कढीपत्त्याची २-३ पाने चावून खावीत. याने बेचव तोंडाला रुची येईल.
  • पोटात मुरडा असल्यासही २-३ पाने चावून खाल्ल्याने लाभ मिळतो.
  • मूळव्याधीतून रक्त पडत असेल तर कढीपत्त्याच्या पानांचा काढा बनवून प्यावा.
  • बालकांच्या पोटात जंत किंवा कृमी झाले असतील तर त्यांना कढीपत्त्याची पाने बारीक वाटून त्याचा कल्क करून त्या कल्कामध्ये (चटणीमध्ये) समप्रमाणात गूळ आणि मध एकत्र करून त्याची छोटी गोळी बनवून सकाळ-संध्याकाळ खायला द्यावी.
  • जुलाब-उलटी व रक्त पडत असल्यास कढीपत्त्याच्या पानांचा रस घ्यावा. शीतल असल्याने रक्तही पडायचे थांबते.
  • लघवीला जळजळ होऊन लघवी थेंब थेंब होत असल्यास कढीपत्त्याच्या रसामध्ये सुती कपडा बुडवून कपड्याच्या घड्या ओटीपोटीवर ठेवाव्यात. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन लघवीची जळजळ थांबते.
  • हिरड्या कमकुवत होऊन दात हलत असतील तर कढीपत्त्याच्या पानांचा कल्क हिरड्यांवर चोळावा, त्यामुळे हिरड्यांचे आरोग्य सुधारते व दात मजबूत होतात.
  • दात व जीभ अस्वच्छ राहिल्यामुळे तोंडास दुर्गंधी येत असेल तर कढीपत्त्याची पाने चावून खावीत, त्यामुळे जिभेवर साचलेला पांढरा थर दूर होतो.
  • ही पाने रक्तशुद्धीकर व रक्तवृद्धीकरदेखील आहेत. या पानांच्या नियमित सेवनाने रक्ताचे प्रमाण वाढते.
  • विपुल प्रमाणात ‘अ’ जीवनसत्त्व असल्यामुळे डोळ्यांच्या विकासासाठी गुणकारी आहे.
  • महिलांना मासिकपाळी नियमित येत नसेल तसेच रक्तस्त्राव कमी होत असेल, चेहर्‍यावर वांग, मुरमे, पुटकळ्या येत असल्यास नियमित कढीपत्त्याच्या पानांचा रस घ्यावा.
  • रक्तातील वाढलेल्या साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी कढीपत्त्याच्या पानांचा उपयोग चांगला होतो.
  • तळपाय व टाचेला भेगा पडलेल्या असतील तर कढीपत्त्याच्या पानांचा कल्क टाच स्वच्छ धुवून त्यात रात्री झोपताना भरावा, त्यामुळे टाचेच्या भेगा भरून येण्यास मदत होते.
  • पानांची चटणी करून, ताकात पूड टाकून घेतली तर केसांच्या मुळांना पोषक ठरते. त्यामुळे केस निरोगी राहतात व काळे राहतात.
  • मधमाशा/डास चावल्यावर गांधी उठल्यास त्यावर पानांचा वाटून लेप लावावा.
  • कढीपत्ता हा तारुण्य टिकवून ठेवणारा आहे. नियमित कढीपत्ता सेवन करावा.
  • कोलेस्टेरॉल वाढल्यास कढीपत्त्याची १५-२० पाने अनशापोटी चावून खावीत.
  • कढीपत्त्याची पाने वाळवून चूर्ण करून ती खोबरेल तेलात मिसळून लावावीत. केस पांढरे होत नाहीत. शिवाय केसांची गळती कमी होऊन केस लांब वाढायला मदत होते.
  • केमो व रेडिओ थेरपीनंतर शरीरातील सर्वसामान्य पेशींवरसुद्धा फार घातक परिणाम होतात. अशा रुग्णांना दिवसातून तीन वेळा कढीपत्त्याची पाने खडीसाखरेसोबत चावून खाण्यास द्यावीत.
  • यकृताच्या आजारांवर कढीपत्ता म्हणजे रामबाण उपाय. कोणत्याही काविळीत कढीपत्ता चावून खाणे हा साधा व तितकाच प्रभावी उपाय आहे.
  • रेचक गुणांमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. परिणामी शरीरातील पित्ताचे प्रमाणही कमी होते. चोंदलेले नाक व छाती मोकळी होण्यास मदत होते. म्हणून सर्दी किंवा सायनसमुळे नाक चोंदल्यास कढीपत्त्याची पावडर मधात मिसळून दिवसातून दोन वेळा घ्यावी. कढीपत्त्याची पेस्ट बनवून चेहर्‍यावर लावल्यास सुंदरता वाढते. त्याच्या वापराने पिंपल्स तसेच सुरकुत्या कमी होतात. यासाठी कढीपत्त्याची पाने रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ही पाने वाटून त्याची पेस्ट बनवून या पेस्टने बॉडीला मसाज केल्यासही त्वचेशी संबंधीत समस्या दूर होतात.

अशा या बहुगुणी, आरोग्यदायी कढीपत्त्याला ताटाच्या बाहेर ठेवू नका, त्याचे सेवन करा. त्यासाठी फोडणीमध्ये यापुढे कढीपत्त्याची पाने टाकताना ती चिरून किंवा कुस्करून टाका म्हणजे त्याचा स्वादही पदार्थांस चांगला लागेल व कुणीही ती बाहेर काढून टाकणार नाहीत.

कोणत्याही आजारांत हा कढीपत्ता मात्र औषध म्हणून सेवन करायचा असेल तर वैद्याचा सल्ला मात्र नक्कीच घ्या.