हल्ल्यात 90 जवान ठार झाल्याचा दावा
बीएलएचा 8 लष्करी वाहनांवर हल्ला
बीएलएने पाकिस्तानमधील जाफर एक्सप्रेस हायजॅक केल्यानंतर पाकिस्तानी आर्मीने ऑपरेशन रावबून बलूच आर्मीतील 30 जवानांना ठार करत ट्रेनमधील ओलीस ठेवलेल्या प्रवाशांची सुटका केली होती. मात्र त्यानंतर पुन्हा बलूच आर्मीने प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानी कॅम्पवर हल्ला चढवला आहे. बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) काल रविवारी दावा करताना पाकिस्तानी सैन्यावर आत्मघातकी हल्ला करत 90 पाकिस्तानी सैनिकांना ठार केले असल्याचे म्हटले आहे. बीएलएच्या माजीद ब्रिगेड आणि फतेह ब्रिगेडने लष्कराच्या ताफ्यावर आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणला. क्वेट्टाहून कफ्तानला जाणाऱ्या पाकिस्तानच्या 8 लष्करी वाहनांवर हा हल्ला केला असूनॉ नोश्की येथील महामार्गाजवळ आत्मघातकी दहशतवाद्यांनी वाहनांना लक्ष्य केले. एका आत्मघातकी बॉम्बरने स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने लष्कराच्या ताफ्याला धडक दिली. या हल्ल्यात बस जळून खाक झाली.
या संदर्भात द बलुचिस्तान पोस्टने पाकिस्तानी सैन्य दलाच्या तुकडीवर नोशिकी येथे आरसीडी हायवेवर बलूच आर्मीकडून हल्ला केल्याचे म्हटले आहे. येथे सुरुवातीला काही स्फोट झाले, त्यानंतर मोठ्या प्रमाणात गोळीबाराची घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा रक्षक आणि रुग्णवाहिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याचे 90 जवान ठार झाल्याचा दावाही बलूच आर्मीकडून करण्यात येत असून या हल्ल्याची जबाबदारी बीएलएने स्वीकारली आहे. या तुकडीत 8 पाकिस्तानी सैन्य दलाच्या बसेसचा समावेश होता. त्यापैकी, एक बस पूर्णपणे नेस्तनाबू झाली आहे.
यानंतर बीएलएच्या फतेह पथकाच्या सैनिकांनी सैन्याच्या ताफ्यात घुसून सैनिकांना ठार मारले. ज्या वाहनावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला ते वाहन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. यातील जखमींना नोश्की येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिसरात आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
बलुचिस्तान लिबरेशन
आर्मी म्हणजे काय?
बलुचिस्तानमधील अनेक लोकांचा असा विश्वास आहे की भारत-पाकिस्तान फाळणीनंतर त्यांना स्वतंत्र देश म्हणून राहायचे होते, परंतु त्यांच्या संमतीशिवाय त्यांना पाकिस्तानात समाविष्ट करण्यात आले. यामुळे आजही बलुचिस्तानमध्ये सैन्य आणि जनतेमधील संघर्ष सुरू आहे. बीएलएची मुख्य मागणी पाकिस्तानपासून वेगळे होऊन बलुचिस्तान देशाची स्थापना करणे आहे. बलुचिस्तानमध्ये स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या अनेक संघटना आहेत. यापैकी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ही सर्वात शक्तिशाली संघटना आहे. पाकिस्तानने 2007 मध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला दहशतवादी संघटना म्हणून सूचीबद्ध केले आहे.
तेहरीक ए तालिबानची धमकी
तहरीक-ए-तालिबान या संघटनेने (टीटीपी) पाकिस्तानमध्ये हल्ल्यांची धमकी दिली आहे. टीटीपीने म्हटले आहे की पाकिस्तानी सैन्याला धडा शिकवण्यासाठी आम्ही ऑपरेशन अल-खंदक’ सुरू करू. या ऑपरेशनद्वारे पाकिस्तानी लष्कर, सुरक्षा संस्था आणि त्यांच्या सहयोगींवर हल्ले केले जातील. लष्करी तळ, सुरक्षा दल आणि सरकारी संस्थांना लक्ष्य केले जाईल. तसेच संघटनेने पाकिस्तानी सैन्य गेल्या 77 वर्षांपासून देशाला उद्ध्वस्त करत असून आम्ही त्याविरुद्धची लढाई सुरूच ठेवणार असल्याचा इशारा दिला आहे.