बनावट कागदपत्रांद्वारे सरकार मालकीची जमीन देखील हडपली

0
20

>> मुख्यमंत्र्यांची माहिती; ६० ते ७० प्रकरणे समोर

राज्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन बळकावणे व जमीन विक्रीची ६० ते ७० प्रकरणे आढळून आली आहेत. सरकारी मालकीची जमीन सुध्दा बनावट कागदपत्रांच्या आधारे हस्तांतरित करण्यात आलेली आहे. या प्रकरणांची सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथका (एसआयटी)ची स्थापना करण्यात आली आहे, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना केला.

राज्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे करण्यात आलेल्या जमीन विक्रीत मोठा घोटाळा झालेला आहे. बनावट कागदपत्रांचा वापर करून केलेली जमीन विक्री आणि जमीन हस्तांतरणाच्या प्रकरणांची एसआयटीककडून कसून चौकशी करणार आहे. या पथकामध्ये पोलीस, महसूल, निबंधक, पुरातत्त्व आदी खात्यांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आलेला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन विक्री व हस्तांतर करण्याचे प्रकार वाढत आहेत. बार्देश, तिसवाडी, पेडणे, सासष्टी या किनारी भागातील तालुक्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन विक्री आणि जमीन हडप करण्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. विदेशात राहणार्‍या नागरिकांच्या येथे असलेल्या जमिनींची बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करण्यात आलेली आहे. मागील २० वर्षांपासून बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन विक्रीचे प्रकार घडत आहेत आणि मागील १०-१५ वर्षांत या प्रकारात वाढ झाली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्य निबंधक कार्यालयाकडे सुध्दा बनावट कागदपत्रांचा वापर करून जमीन विक्री झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. नागरिकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे करण्यात आलेल्या जमीन विक्रीच्या तक्रारींसाठी थेट एसआयटीकडे संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.