बदलाची गरज

0
172

सतत या ना त्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात राहणार्‍या आम आदमी पक्षात सध्या फेररचनेचे वारे वाहते आहे. गेली चार वर्षे राजकारणात सक्रिय असलेला हा पक्ष एकामागून एक पराभवांना सामोरा जाऊ लागल्याने आजवर हवेत तरंगणारी पक्षाची नेतेमंडळी जमिनीवर आली आणि त्यातून या आत्मचिंतनाला गती मिळाली असे दिसते. गोवा आणि पंजाबात ‘आप’ चा बार फुसका ठरला आणि खुद्द दिल्लीमध्येही विविध पालिका निवडणुकांमध्ये पक्षाची पार धूळधाण झाली. त्यामुळे एकीकडे राष्ट्रीय पातळीवर जाण्याची दिवास्वप्ने पाहात आलेल्या ‘आप’ ला पायाखालची वाळू सरकू लागल्याचे एव्हाना पुरते उमगले आहे. त्यामुळे दिल्लीकरांचा विश्वास कमावण्यापासून आपली आजवर गेलेली पत सावरण्यापर्यंत खूप बदल करणे आवश्यक ठरलेले आहे. अलीकडेच त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची जी बैठक झाली, त्यात अशा प्रकारच्या फेरबदलांचे संकेत देण्यात आले आहेत. पहिली गोष्ट आम आदमी पक्षाला करावी लागेल ती म्हणजे आपली ध्येयधोरणे निश्‍चित करावी लागतील. मुळात या पक्षाचा जन्म झाला तो भ्रष्टाचाराला विरोध करण्याच्या मुद्द्यावर. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात भ्रष्टाचार हा मुद्दा सतत ऐरणीवर होता. मात्र, नरेंद्र मोदी सरकारच्या गेल्या तीन वर्षांच्या काळात भ्रष्टाचाराचे नावही कोठे ऐकू आलेले नाही. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या हातातले ब्रह्मास्त्रच जणू निकामी झालेले आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधाची बात करणार्‍या ‘आप’ वरच भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप सातत्याने झाले आणि त्यात त्यांची स्वपक्षीय मंडळीच आघाडीवर राहिली. कपिल मिश्रांनी तर ‘आप’ ची पुरती पोल खोल चालवली आहे. अशा वेळी आपल्या भावी रणनीतीची निश्‍चित आखणी त्यांना करावी लागेल. आपला पक्ष गरिबाभिमुख, शेतकरीभिमुख करण्याचे ‘आप’ ने म्हणूनच ठरवलेले आहे. आपला जनाधार हा मुख्यत्वे असा उपेक्षित, वंचित आम आदमी आहे हे केजरीवाल जाणून आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रश्न हाती घेण्याचे पक्षाने ठरवलेले दिसते. त्यासाठी देशव्यापी शेतकरी आंदोलनात उतरण्याची घोषणाही पक्षाने नुकतीच केली, मात्र त्यापूर्वीच विविध राज्यांतील शेतकरी स्वतःहून आंदोलनात उतरले आणि काही कर्जमाफी मिळवण्यात यशस्वीही ठरले, त्यामुळे ‘आप’ ला या विषयात उतरण्यास उशीर झालेला आहे. राष्ट्रीय पातळीवर स्थान मिळवण्याचे आम आदमी पक्षाचे स्वप्न आहे, परंतु दिल्लीतूनच उखडले जाण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. अशा वेळी सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्तरावर उतरायचे असेल तर त्यासाठी मुळात पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत होणे आवश्यक आहे. बूथपातळीवर संघटना उभारणीचे प्रयत्न पक्षाला करावे लागणार आहेत. पक्षाची जेवढी हानी विरोधकांनी केली, त्याहून अधिक हानी त्यांच्या स्वकियांनीच केली आहे. सध्या कुमार विश्वास पक्षात राहून पक्षनेत्यांवर शरसंधान करताना दिसत आहेत. नुकतेच राजस्थानात ते म्हणाले की पक्षाच्या नेत्याची पोस्टरे निवडणुकीत लावली जाणार नाहीत. त्यांचा रोख अर्थातच केजरीवाल यांच्या प्रतिमानिर्मितीच्या सोसावर होता. म्हणजे या पक्षामध्येच आलबेल नाही. ज्या अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या बळावर प्रतिष्ठा कमवून ‘आप’ ची निर्मिती झाली, ते अण्णाही केजरीवाल यांच्यावर नाराज आहेत. पक्षाच्या प्रतिमेला या सगळ्या घडामोडी मारकच ठरल्या आहेत. सोशल मीडियाच्या उंटावरून शेळ्या हाकण्याऐवजी आता प्रत्यक्ष मैदानात उतरून लढण्याची तयारी ‘आप’ने करायला हवी. दिल्ली ही त्यांची प्रयोगभूमी आहे. शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रांत मौलिक काम करून दाखवले गेले, तरच इतर राज्यांतील मतदार त्यातून प्रभावित होतील. नुसत्या भाषणांना भुलायचे दिवस आता राहिलेले नाहीत.