फोंडा नगराध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव दाखल

0
46

>> ठरावावर पालिकेतील ७ नगरसेवकांच्या सह्या

फोंडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर यांच्याविरुद्ध ७ नगरसेवकांनी काल अविश्वास ठराव दाखल केला. पालिका संचालकांकडे दाखल केलेल्या या अविश्वास ठरावाच्या निवेदनावर १५ पैकी ७ नगरसेवकांच्या सह्या आहेत.

या घडामोडीमुळे फोंड्यातही राजकीय वातावरण तापू लागले आहे. या अविश्‍वास ठरावावर विश्वनाथ दळवी, वीरेंद्र ढवळीकर, यतीश सावकर, अर्चना डांगी, आनंद नाईक, विलियम आगियार, रितेश नाईक यांच्या सह्या आहेत.

फोंडा पालिकेचे नगरसेवक संख्याबळ १५ असतानाही केवळ ७ नगरसेवकांनी अविश्वासाची नोटीस दाखल केली आहे. त्यामुळे ठराव संमत होण्यासाठी आवश्यक असलेल्या एका नगरसेवकाने आपली भूमिका गुप्त ठेवली आहे की काय, अशी चर्चा फोंड्यातील राजकीय वर्तुळात सुरू आहे. गेल्या १८ मे रोजी शांताराम कोलवेकर यांची नगराध्यक्षपदी निवड झाली होती. त्यावेळेला शांताराम कोलवेकर यांनी भाजपचे उमेदवार रितेश नाईक यांच्यावर मात केली होती. मगो व गोवा फॉरवर्ड समर्थक नगरसेवकांच्या सहकार्याने कोलवेकर हे नगराध्यक्षपदी विराजमान झाले होते.