फेडरर, जोकोविचची तिसर्‍या फेरीत धडक

0
105

सर्बियाचा अव्वल मानांकित नोवाक जोकोविच व स्वित्झर्लंडच्या तिसर्‍या मानांकित रॉजर फेडरर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत युएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. विद्यमान विजेत्या जोकोविच याने सामन्या दरम्यान आपल्या दुखर्‍या डाव्या खांद्यावर उपचार घेत जागतिक क्रमवारीत ५६व्या स्थानावरील अर्जेंटिनाच्या जुआन इग्नासियो लोंडेरो याचा सरळ तीन सेटमध्ये ६-४, ७-६, ६-१ असा पराभव केला. दुसरीकडे फेडररला मात्र विजयासाठी चार सेट झुंजावे लागले. बोस्निया हर्झेगोविनाच्या दामिर झुमूर याच्याविरुद्धचा पहिला सेट ३-६ असा गमावल्यानंतर फेडररने पुढील तिन्ही सेट ६-२, ६-३, ६-४ असे जिंकले. विशेष म्हणजे पहिल्या फेरीत भारताच्या सुमीत नागल याच्याविरुद्ध पहिल्या फेरीच्या सामन्यातही फेडररने पहिला सेट गमावला होता. जपानच्या सातव्या मानांकित केई निशिकोरी याला देखील विजयासाठी बराच घाम गाळावा लागला. कडव्या संघर्षानंतर त्याने अमेरिकेच्या ब्रेडली क्लान याचे आव्हान ६-२, ४-६, ६-३, ७-५ असे परतवून लावले.

महिला एकेरीत कॅरोलिना प्लिस्कोवाने जॉर्जियाच्या मरियम बॉल्कावाद्झे हिचा ६-१, ६-४ असा फडशा पाडला. १७ वर्षीय कॅथरिन मॅकनेली हिने अमेरिकेची दिग्गज सेरेना विल्यम्स हिच्या अनुभवाची परीक्षा पाहिली. पहिला सेट ७-५ असा जिंकून तिने चांगली सुरुवात केली. परंतु, आठव्या मानांकित सेरेनाने पुढील दोन्ही सेट ६-३, ६-१ असे जिंकत पुढील फेरी गाठली. सेरेनाची ज्येष्ठ भगिनी व्हीनसला मात्र बाहेरचा रस्ता धरावा लागला. युक्रेनच्या इलिना स्वितोलिना हिने व्हीनसला ६-४, ६-४ असा बाहेरचा रस्ता दाखविला. द्वितीय मानांकित ऍश्‍ले बार्टीने लॉरेन डेव्हिसला ६-२, ७-६ असे हरवून तिसरी फेरी गाठली.