फुलपाखरू

0
47
  • मीना समुद्र

खिन्न मनाला आपल्या अस्तित्वाने आणि मुक्त लीलालाघवाने प्रसन्न, मुग्ध आणि आनंदित करणारी निसर्गाची ही तरल कविता शतायुषी झाली तर नवल नव्हे! अशीच ती पुढच्या पिढ्यांसाठीही आनंददायी ठरणार आहे!

छान किती दिसते| फुलपाखरू
या वेलीवर| फुलांबरोबर
गोड किती हसते| फुलपाखरू
पंख चिमुकले| निळेजांभळे
हालवुनी झुलते| फुलपाखरू
डोळे बारीक| करिती लुकलुक
गोल मणी जणु ते| फुलपाखरू
मी धरू जाता| येई न हाता
दूरच ते उडते| फुलपाखरू
श्री. गणेश हरी पाटील यांची ही अत्यंत सुंदर कविता. प्रत्येकालाच आपल्या बालपणात नेणारी. साध्याशा चालीत गुणगुण करत गळ्यात फिरणारी. बालकांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या विषयाचे- फुलपाखराचे वर्णन करणारी. सृष्टीच्या हिरव्या पसार्‍यावर रंगाची रांगोळी काढणार्‍या फुलपाखराचं अगदी बारकाईनं यथातथ्य वर्णन करणारी. फुलपाखराच्या अंग-प्रत्यंगाचे अतिशय सूक्ष्म निरीक्षण अत्यंत सोप्या शब्दांत मांडणारी. सभोवतालच्या सृष्टीतल्या पहिल्यावहिल्या सुंदर चलचित्राशी बाळाचा परिचय करून देणारी. मुक्त स्वातंत्र्य एखाद्या लहानशा कटिपतंगाला, फुलपाखरालाही कसे प्रिय असते याची जाणीव करून देणारी. फुलपाखराची हालचाल आणि त्याचं आपल्याला न दिसणारं हसू कवीच्या नजरेनं टिपणारी ही अतिशय सुंदर, साधी, सरळ, सोपी कविता. या कवितेत जोडाक्षर नाही; पण फुलपाखराशी मैत्रीचे धागे जोडणारी, जिव्हाळ्याचे नाते जोडणारी ‘अक्षरे’ मात्र आहेत.

श्री. ग. ह. पाटील या कवीने ऑगस्ट १९२२ मध्ये ते ७ वीत असताना ही कविता लिहिली. फुलपाखराचं आयुष्य खूप कमी असतं; परंतु ‘ही’ कविता मात्र आज १०० वर्षांची झाली असा मेसेज व्हॉट्‌सऍप ग्रुपमधील एका मैत्रिणीने १४ ऑगस्टला पाठवला, त्यामुळे या कवितेची आठवण फुलपाखराच्या रंगाइतकीच सतेज टवटवीतपणे झाली. कविता आणि कवीचा फोटोही होताच. बालपणी तोंडपाट केलेल्या किंवा आपोआप पाट झालेल्या कवितांपैकीच ही एक मनतळ्याच्या तळाशी असलेली रत्नखड्यासारखी कविता… फुलपाखरासारखेच झळाळते रंग मिरवणारी!
पावसाळ्याच्या या दिवसांत पंख झुलवीत उडणारी कितीतरी फुलपाखरं आजूबाजूला दिसतात. परवा नागपंचमी दिवशी तर आमच्या घरासमोरच्या मातीच्या पट्‌ट्यावर दोन सुंदर रंगावर ठिपके असणार्‍या फुलपाखरांनी सुंदर नाचच केला. एकमेकांच्या हातात हात गुंफून परकर्‍या पोरींनी फुगडी-झिम्मा खेळावा तशा पंखांच्या हालचाली करत ती मिनिटभर मातीवर झुलत राहिली आणि नंतर एकाने पंख पसरून उंच उडून हवेत एक सुंदर गिरकी घेतली आणि ते पुन्हा खाली त्या जोडीदारांबरोबर हितगुज करू लागले. अनिमिष नेत्रांनी आम्ही हा खेळ पाहत राहिलो. मग गिरक्या घेत ती उडून गेली. कवीने आपल्यावर लिहिलेल्या कवितेला १०० वर्षे झाली हे सांगण्यासाठी तर ती आली नसतील?
आपल्या इवल्याशा जीवनसृष्टीची सारी कोमलता, सुंदरता भरून ही फुलपाखरे उडत असतात. पिवळी, पांढरी, उदी, काळी, आभाळी, निळी तर कधी गोकर्णी निळ्या, जांभळ्या रंगाची ही फुलपाखरे या वेलीवरून त्या वेलीवर, या फुलावरून त्या फुलावर उडत असतात. फुलांच्या पेल्यातून मधुर रसपान करीत असतात. त्यांच्याशी लाडीगोडी लावत त्यांच्या अंगावर, अंकावर विराजमान होत असतात. दोन्ही पंख मिटून कधी एकाग्रतेने त्यांचे मधुर रसपान चालू असते. काही मुले ती पकडतात. काडेपेटीत बंदिस्त करून ठेवतात. दुसर्‍या दिवशी उघडून पाहिले तर त्यांचे निष्प्राण सुकलेले, तुटलेले पंख त्यांना दिसतात. धरावीशी, आपल्याजवळ असावीशी वाटणारीच ही गोष्ट, पण ती हाती येत नाहीत. ती चंचलही असतात आणि चैतन्याने भरलेली आणि भारलेलीही असतात, त्यामुळे ती दूर-दूर उडून जातात. त्यांच्या डोळ्यातले गोल लुकलुकणारे मणी आणि त्यांचे निळे-जांभळे पंख आपल्याला खुणावत राहतात, भुलवीत-खुलवीत राहतात, मोहवीत राहतात. मग ती अगदी चिमटीत मावण्याएवढी छोटी असोत की तळहात पसरल्यासारखी जंगली मोठी असोत! भिरभिरणार्‍या नजरेला, मनातल्या अतितरल प्रेमभावनेला आणि मृदुमधुर सुंदर जाणिवेला नेहमी फुलपाखरांचीच उपमा दिली जातो.

फुलपाखरू म्हटलं की प्रसिद्ध गोमंतकीय कवयित्री राधा भावे यांचा शेर आठवतो- ‘दुःखालाही चिमटीमध्ये धरता येते, आणिक त्याचे फुलपाखरू करता येते.’ गोवा-महाराष्ट्रातील कार्यक्रमांत सर्वत्र गाजलेल्या या ओळी. दुःख कितीही मोठं बोचलं असलं तरी त्याला चिमटीत दामटून पकडून काबूत आणून मात करता येते. त्यावर हलकेच फुंकर घालून त्याला सुखात, आनंदात, सुंदरतेत परिवर्तित करता येते हा अत्यंत आनंददायी, आशावादी दृष्टिकोन त्यांनी मांडला आहे. त्यामुळे या ओळींवरही सुंदरतेचा साज चढला आहे.

त्याबरोबरच आठवण होते ती शिरीष पै यांच्या हायकूची- ‘धरू नकोस हातात फुलपाखराचे अंग, दुखतिल त्याच्या पंखावरचे रंग.’ अशाच काहीशा अत्यंत कोमल, हळव्या भावना हायकूत व्यक्त झाल्या आहेत. निरुपद्रवी, निष्पाप, आकर्षक अशा या जीवाला पकडून आपण त्याच्या अंगावरचे रंग विस्कटतो. रंगात त्यांचा जणू जीव आहे. आपण त्याला पकडले तर ते रंग दुखतील अशी हळुवार भावना हायकूत दिसते. शब्दात अगदी नीट सांगता येणार नाही; पण हृदयाला भिडतील, कळतील अशा अतिशय कोमल भावना यामागे आहेत हे नक्कीच!
‘आठवणींच्या कविता’मध्ये अ. ज्ञा. पुराणिक यांचीही फुलपाखराविषयक कविता आठवते- ‘धरू नका ही बरे फुलांवर उडती फुलपाखरे, काल पाकळ्या रानी निजल्या, सकाळ होता सगळ्या उठल्या आणि त्याच का उडू लागल्या पंख फुटुनी गोजिरे’ ही त्यांची कल्पना अतिशय मनोरम आणि अतिशय खरी वाटते. फुलांबरोबर हासत-खेळत, पिंगा घालत उडणारी ही फुलपाखरे धराल तर पंख फाटतील, पाय तुटतील, मग दूरदूरच्या घरी ती कशी जातील? म्हणून या मुक्या जीवाला धरून त्रास देऊ नका, अशी कणवेची भावना व्यक्त करणारी ही सुंदर कविता. ‘हवेचिया डहाळीला फुटे पाखराचा झुला’ म्हणत कविवर्य कुसुमाग्रजांनीही फुलपाखराचे अचानक येऊन आनंदित करणारे अस्तित्व दाखवले आहे. कविवर्य केशवसुतांना फुलपाखरे म्हणजे कवीची तरल कल्पना वाटते.

‘तरल कल्पना जशी कवीची, सुंदर विषयावरुनी याची भ्रमण करी, गति तशीच वाटे- फुलपाखराची!’- असं त्यांनी म्हटलं आहे. त्यानंतरच त्यांच्या या प्रसिद्ध पंक्ती आहेत- ‘जे रम्य ते बघुनिया मज वेड लागे, गाणे मनात मग होय सवेची जागे, गातो म्हणुनी कवनी फुलपाखराते, व्हायास सौख्य मम खिन्न अशा मनाते|’
खिन्न मनाला आपल्या अस्तित्वाने आणि मुक्त लीलालाघवाने प्रसन्न, मुग्ध आणि आनंदित करणारी निसर्गाची ही तरल कविता शतायुषी झाली तर नवल नव्हे! अशीच ती पुढच्या पिढ्यांसाठीही आनंददायी ठरणार आहे!