फलोत्पादन मंडळातर्फे स्वस्त दरात कांदा

0
122

गोवा फलोत्पादन मंडळाने राज्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी नाशिक – महाराष्ट्र येथून सुमारे २५ टन कांद्यांची खरेदी केली असून सोमवारपासून ९० ते १०० रुपये प्रति किलो अशा माफक दरात कांद्यांची विक्री केली जाणार आहे, अशी माहिती फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष, आमदार प्रवीण झांट्ये यांनी काल दिली. राज्यातील बाजारपेठेत कांद्याच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. खुल्या बाजारात कांदा १५० ते १७० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. तर, गोवा मार्केटिंग फेडरेशनच्या भाजी विभागात कांदा १४० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. फलोत्पादन मंडळाकडून १२० ते १३० रुपये प्रति किलो दराने कांद्याची विक्री केली जात आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कांदा खरेदीसाठी १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केल्यानंतर फलोत्पादन महामंडळाने कमी दरात नाशिक येथे २५ टन कांद्यांची खरेदी केली आहे. महाराष्ट्रातून कांदा आणण्याचे काम सुरू आहे. सोमवारी सकाळपर्यंत कांदा फलोत्पादक मंडळाच्या गोदामात आणला जाणार आहे. महामंडळाच्या राज्यभरातील भाजी विक्री केंद्रातून थोड्या कमी किमतीमध्ये कांदा विकला जाणार आहे, असे मंडळाचे अध्यक्ष झांट्ये यांनी सांगितले.