‘फणी’चा तडाखा

0
257

गेले कित्येक दिवस ज्याचा गाजावाजा चालला होता, ते फणी (खरा बांगलादेशी उच्चार फोणी) वादळ काल उडिसात येऊन धडकले. एम्स भुवनेश्वरसह अनेक इमारतींची त्या धडाक्यात वाताहत झाली आहे आणि काही बळीही गेले आहेत. या वादळातून नेमकी किती जीवितहानी झाली वा मालमत्तेचे नुकसान झाले ते कळायला अजून वेळ लागेल, कारण या वादळाच्या मार्गात उडिसातलीच जवळजवळ ५२ शहरे आणि दहा हजार गावे आहेत. वादळी वार्‍याने त्या बहुतेक गावांतील संपर्क यंत्रणा नेस्तनाबूत केलेली असेल. त्यामुळे सविस्तर माहिती कळायला अजून वेळ लागेल. अशा वादळांना नावे देण्याची एक सुनियोजित प्रक्रिया असते. बंगालच्या उपसागरात जी वादळे तयार होतात, त्यांच्या नामकरणाचे काम आलटून पालटून या प्रदेशातील आठ सदस्य देश करीत असतात. त्यांनी सुचवलेली नावे येणार्‍या वादळांना दिली जातात. त्यानुसार सध्याचे हे नाव बांगलादेशने दिलेले आहे आणि त्याचा मूळ अर्थ नागाचा ‘फणा’ असाच आहे. निसर्गाने अशा प्रकारे फणा काढणे भारताच्या पूर्व किनार्‍याला काही नवे नाही. वर्षाला सात आठ छोटी – मध्यम वादळे त्या उपसागरात निर्माण होत असतात आणि काही किनार्‍यावरही धडकत असतात. काही पावसाळ्यानंतर येतात, तर क्वचित काही आजच्यासारखी पावसाळ्याच्या आगमनापूर्वीही धडक मारतात. त्यामुळे तेथील जनतेला अशा वादळांचा सामना करण्याची तशी सवय आहे. परंतु तरीही एखादे मोठे वादळ जेव्हा येऊ घातल्याचे कळते तेव्हा त्याची धास्ती आणि दहशत निर्माण होणे स्वाभाविक असते. या फणी वादळाची दहशतही माध्यमांनी अधिक निर्माण केली. अर्थात, जनतेला जागे करण्यातही त्याचा उपयोग झाला हेही तेवढेच खरे आहे. प्रशासन यंत्रणा अधिक जागरूक झाली आणि या वादळाची पूर्वसूचना मिळताच जवळजवळ दहा लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याची अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची जबाबदारी विविध यंत्रणांनी मिळून राबवली. पूर्वीच्या काळी वादळाची पूर्वसूचना मिळण्याची साधने नसत, त्यामुळे जीवितहानी वा वित्तहानी फार मोठ्या प्रमाणावर होई. अजूनही अनेक देशांमध्ये वादळांची पूर्वसूचना देणारी प्रभावी यंत्रणा अस्तित्वात नाही. जवळजवळ दशकभरापूर्वी जेव्हा म्यानमारमध्ये नर्गिस वादळ येऊन धडकले होते, तेव्हा तेथे त्याने महाविनाश घडवला होता. अक्षरशः लाखो लोकांना त्याने बेघर केले. लाखोंना मृत्युमुखी धाडले. यावेळी भारतीय प्रदेशावर धडकणार्‍या या वादळाची पूर्वसूचना कित्येक दिवस आधी मिळाली होती. श्रीलंकेच्या दक्षिण पूर्वेला खोल समुद्रात हे वादळ निर्माण होत असल्याची चाहुल मिळाली होती. त्यानंतर ते जवळच्या तामीळनाडूवर धडकेल असा कयास होता, त्यामुळे तेथे खबरदारीचे उपाय योजण्यात आले होते, परंतु आपला मार्ग बदलून हे वादळ समुद्रमार्गे उडिसा, पश्‍चिम बंगालच्या दिशेने रोंरावत गेले. अशा प्रकारे एखादे वादळ जेव्हा समुद्रावरून आपला मार्ग आखत असते, तेव्हा ते अधिक धोकादायक ठरत असते, कारण समुद्रातील आर्द्रता शोषून घेत त्याची गती वाढलेली असते. त्यामुळे समुद्रमार्गे वेग पकडून पुन्हा भारतीय पूर्व किनार्‍यावर उडिसात ते धडकणार अशी जेव्हा चिन्हे दिसू लागली तेव्हा भारतीय हवामान खात्याने आणि राष्ट्रीय सागरी माहिती सेवा संस्थेसारख्या संस्थांनी त्याच्या मार्गक्रमणासंबंधी प्रशासनाला वेळीच सतर्क केले. त्यामुळे एकीकडे नौदल, तटरक्षक दल, एनडीआरएफ, स्थानिक प्रशासन वगैरे सर्व यंत्रणा सक्रिय झाल्या आणि त्यांनी किनारपट्टीवरील लोकांचे स्थलांतराचे अवाढव्य काम हाती घेतले. दहा लाखांहून अधिक लोकांचे स्थलांतर करणे ही काही खायची चीज नव्हे, परंतु त्यांनी हे साध्य केल्याने मोठी प्राणहानी टळू शकेल अशी आशा करूया. अर्थात, वादळी वार्‍यांनी उद्ध्वस्त केलेल्या घरादारांचे पुनर्वसन हे एक मोठे आव्हान असेल. केंद्र सरकारने एक हजार कोटींची अग्रीम रक्कम वादळग्रस्तांसाठी वेळीच मंजूर केली आहे. सध्या निवडणुकांचा काळ असल्याने आचारसंहिता लागू आहे, परंतु निवडणूक आयोगानेही अकरा जिल्ह्यांतील आचारसंहिता स्थगित करण्याची तत्परता दाखविली. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही एका दिवसापुरता आपला निवडणूक प्रचार स्थगित करून माणुसकीचे दर्शन घडवले आहे. त्यामुळे या वादळग्रस्त जिल्ह्यांमध्ये वेगाने मदतकार्य झाले पाहिजे. शेवटी वादळाचा तडाखा बसलेली आपल्यासारखीच हाडामांसाची माणसे आहेत. त्यांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत, संसार उघड्यावर पडले आहेत. शून्यातून सारे पुन्हा उभारणे गोरगरीब कुटुंबांना शक्य नसते. त्यामुळे प्रशासनाने त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. ही केवळ उडिसा किंवा पश्‍चिम बंगाल किंवा आंध्र, तामीळनाडूपुरती आपत्ती नव्हे. ही एक राष्ट्रीय आपत्ती आहे आणि संपूर्ण देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला तर या संकटाचा सामना करण्याची शक्ती वादळग्रस्तांना मिळू शकेल. केरळच्या पुरावेळी जो माणुसकीचा महापूर आला, तसाच मदतीचा ओघ उडिसाकडे वळण्याची आज आवश्यकता आहे.