फडणवीसांसोबतची भेट वैयक्तिक ः ढवळीकर

0
39

>> युतीबाबतचा निर्णय केंद्रीय समिती घेणार असल्याचे स्पष्ट

भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना भेटलो ही गोष्ट खरी आहे. मात्र, ही भेट वैयक्तिक स्वरुपाची होती व या भेटीत बहुचर्चित भाजप-मगो युतीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे मगो पक्षाचे नेते व मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना स्पष्ट केले.

आपण फडणवीस यांनाच नव्हे तर कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनाही भेटलो असल्याचे यावेळी ढवळीकर यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही गोव्यात येणार असून त्यांचीही आपण भेट घेणार असल्याचे ढवळीकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले. पण तीही भेट वैयक्तिक स्वरुपाची असेल असा खुलासाही त्यांनी केला.

युतीचा निर्णय मगोच्या
केंद्रीय समितीकडे

कुठल्या पक्षाबरोबर विधानसभा निवडणुकीसाठी युती करायची याचा निर्णय मगो पक्षाची केंद्रीय समितीच घेणार आहे याचा ढवळीकर यांनी यावेळी या प्रतिनिधीशी बोलताना पुनरुच्चार केला.

दरम्यान, मगोने यापूर्वीच १२ जागांवर आपले उमेदवार निश्‍चित केले आहेत. तसेच आगामी निवडणुकीत मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर व मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांंनी भाजपसोबत युती करण्याचा प्रश्‍नच नसल्याचे वारंवार सांगितले आहे. सुदिन यांनी तर भाजपशी युती म्हणजे आत्महत्याच होय अशाप्रकारचे वक्तव्य केले होते. त्यानंतर काही दिवसांनी ढवळीकर यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजप आणि मगो यांच्यात युती होईल अशी चर्चा सुरू झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आपली ही वैयक्तिक भेट असल्याचे ढवळीकर यांना स्पष्ट करावे लागले आहे.

युतीबाबत कोणताच
निर्णय नाही ः सरदेसाई

राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीपूर्वीच आपली सर्व शस्त्रे म्यान केली आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर आता तृणमूल कॉंग्रेसकडे सर्व विरोधी पक्षांना गांभीर्याने पहावे लागेल. असे फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले. मात्र यावेळी त्यांनी आपल्या पक्षाने निवडणुकीत युतीबाबत अद्याप कोणताच विचार केलेला नाही असे स्पष्ट केले. तृणमूल कॉंग्रेसशी गोवा फॉरवर्ड पक्ष युती करणार का असे विचारले असता त्यावर सरदेसाई यांनी वरील उत्तर दिले. भाजपचा पराभव करण्यासाठी आता गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

काल तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांनी विजय सरदेसाई यांचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित केला. त्यामुळे तृणमूल कॉंग्रेस व गोवा फॉरवर्ड हे पक्ष युती करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. त्या पार्श्‍वभूमीवर या प्रतिनिधीने काल सरदेसाई यांना छेडले असता अद्याप युतीबाबत कोणताच विचार नसल्याचे त्यांनी सांगितले.

प्रसारित झालेल्या सदर व्हिडिओमध्ये सरदेसाई यांनी, प्रत्येकाने आपल्यातील दुर्गा देवीला आता जागृत करण्याची वेळ आलेली आहे. गोव्यात आता ‘नवी सकाळ’ आणण्याची वेळ आलेली असून हे काम पूर्ण करण्यासाठी आपण कुठल्याही प्रकारचा त्याग करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

सध्याही ढवळीकर आमच्यासोबत

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा दावा

पुढील विधानसभेत माझ्यासोबत मगोचे नेते सुदिन ढवळीकर हेही नक्कीच असतील. मात्र आम्ही दोघे सरकारात एकत्र असू की काय ते चर्चेनंतरच ठरेल असे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अनधिकृतपणे पत्रकारांशी बोलताना सांगितले. आताही आम्ही दोघे तसे एकत्रच आहोत असाही दावा पुढे बोलताना डॉ. सावंत यांनी केला.

भाजपचे निवडणूक निरीक्षक देवेंद्र फडणवीस व सुदिन ढवळीकर यांची नुकतीच भेट झाली. त्या पार्श्‍वभूमीवर बोलताना डॉ. सावंत यांनी वरील विधान केले.

मुख्यमंत्र्यांच्या या विधानाबाबत या प्रतिनिधीने ढवळीकर यांना विचारले असता ढवळीकर यांनी, काल विधानसभा कामकाज समितीची बैठक होती. बैठकीनंतर आपण बाहेर आलो असे सांगितले.

दरम्यान, मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी काल सुदिन-फडणवीस भेटीसंदर्भात बोलताना, ह्या भेटीचा अर्थ भाजप आणि मगोत युती होणार आहे असा काढू नये असे सांगितले. आम्ही स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी केली असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.