फटकार

0
58

लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या विरोधकांवर प्रथमच एवढा थेट, घणाघाती हल्ला चढविल्याचे काल पाहायला मिळाले. कॉंग्रेसमुळे देशातील लोकशाही वाचली या मल्लिकार्जुन खड्‌गेंच्या विधानाचा आणीबाणीच्या दिवसांची आठवण करून देत तर त्यांनी समाचार घेतलाच, शिवाय देशाला स्वातंत्र्य केवळ एकट्या गांधी – नेहरू घराण्याने मिळवून दिलेले नाही याचेही स्मरण करून दिले. गांधी घराण्यातील कुत्र्यांच्याही देशभक्तीला आपण शंका घेऊ शकत नाही या खडगेंच्या विधानाचा समाचार घेताना ‘हम कुत्तोंवाली परंपरासे पले बढे नही है|’ अशी सौ सोनारकी, एक लोहारकी त्यांनी लगावली. सकारात्मक टीकेचे आपण स्वागत करू, परंतु एखादी चांगली गोष्ट केलेली असेल तर विरोधकांनी तिचे स्वागत करून ती पुढे न्यायला हवी अशी अपेक्षाही मोदींनी यावेळी व्यक्त केली. पंतप्रधानांचे हे भाषण उत्तर प्रदेशमधील अत्यंत महत्त्वपूर्ण विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने देशाची नजर त्याकडे खिळलेली होती. शिवाय नोटबंदीविषयी संसदेच्या पटलावर मोदी त्यात प्रथमच बोलणार असल्यानेही जनतेमध्ये त्याविषयी उत्सुकता होती. संसदेचे गेले हिवाळी अधिवेशन नोटबंदीच्या विषयावरील चर्चेविना विरोधकांच्या गदारोळात वाहून गेले होते. कालच्या भाषणात पंतप्रधानांनी नोटबंदीचे जोरदार समर्थन तर केलेच, शिवाय देशाची अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असताना ही नोटबंदी केल्याने अर्थव्यवस्था हा धक्का पचवू शकली असेही पंतप्रधान म्हणाले. मोदींच्या भाषणातील विखार आणि त्याची धार काल काही वेगळीच होती. बेनामी मालमत्तेविरुद्धचा कायदा ८८ साली केलेला असताना गेली २६ वर्षे तो अधिसूचित का केला गेला नाही, हा त्यांचा कॉंग्रेसला केलेला सवालही बिनतोड होता. नोटबंदीचे नियम वारंवार बदलले अशी टीका करणार्‍यांनी मनरेगाचे नियम १०३५ वेळा बदलले होते याचेही स्मरण मोदींनी करून दिल्याचे पाहायला मिळाले. मोदींच्या भाषणात सुभाषिते, काव्यपंक्ती यांचीही पखरण होती. नीती आणि नियत यांचा जवळचा संबंध असतो हेही विरोधकांना सुनावले. काळा पैसा केवळ रोखीत नसतो तर दागदागिने, सोने, मालमत्ता यातही असतो या विरोधकांच्या युक्तिवादावर ‘‘हे ज्ञान आपल्याला केव्हा झाले?’’ निरूत्तर करून सोडले. त्यामुळे काचेच्या घरात राहणार्‍यांनी दुसर्‍यांना दगड फेकू नयेत या उक्तीचा प्रत्यय संसदेतील समस्त कॉंग्रेसजनांना कालच्या या तडाख्यामुळे निश्‍चित आलेला असेल. नोटबंदीच्या विषयावरून सरकारला घेरणे काही विरोधकांना जमले नाही आणि पंतप्रधानांच्या कालच्या भाषणातून तर जी काही टीकाटिप्पणी झाली होती, तिची धारही बोथट होऊन गेली आहे. अर्थात, सरकारचा निर्णय कितपत योग्य होता आणि त्याचे फायदे किती आणि तोटे किती झाले हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे. खरोखर काळ्या पैशाविरुद्धची कारवाई धसास लागणार का याविषयीही जनतेच्या मनात शंका आहेच, कारण मोठे मासे सुखात आहेत. परंतु जनतेच्या मनातील या शंका प्रभावीपणे मुखर करण्यात विरोधक संसदेत कमी पडले ही दारूण वस्तुस्थिती या संसद अधिवेशनात उघडी पडली आहे. निष्प्रभ विरोधक ही कोणत्याही लोकशाहीसाठी धोक्याची घंटी असते. त्यामुळे कॉंग्रेससह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या या उणिवांचा आणि धोरणात्मक त्रुटींचा विचार गांभीर्याने करायला हवा. प्रदीर्घ काळ देशात सत्ता उपभोगलेल्या कॉंग्रेसला आपल्याच चुकांमुळे आज ताठ कण्याने उभे ठाकता येत नाही आणि इतर विरोधकांची आवळ्या भोपळ्याची मोट एकत्र जुळून येऊ शकत नाही याची ही दारूण परिणती आहे.