प्लास्टिकला आळा घालण्यासाठी ‘आमची पोती’ उपक्रम

0
8

>> पणजी महानगरपालिकेचा खास उपक्रम; भाडेपट्टीवर कापडी पिशवी घ्या अन्‌‍ वापरल्यानंतर परत करा

पणजी महानगरपालिकेने प्लास्टिकला आळा घालण्यासाठी मार्केटमध्ये कापडी पिशव्या भाड्याने देण्याचा ‘आमची पोती’ हा आगळावेगळा उपक्रम कालपासून सुरू केला. ग्राहकांना कापडी पिशव्या देण्यासाठी मनपाने खास काऊंटर सुरू केला असून, ग्राहकांना कापडी पिशवीच्या भाड्यापोटी 20 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे, अशी माहिती महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिली.

पणजी मार्केटमध्ये या उपक्रमासाठी एक खास स्टॉल उभारण्यात आला आहे. या ठिकाणी ग्राहक 20 रुपये देऊन कापडी पिशवी भाड्याने घेऊ शकतात. पुढच्या वेळा बाजारात पुन्हा आल्यानंतर कापडी पिशवी काऊंटरवर परत देऊन 20 रुपये अनामत रक्कम परत घेऊ शकतात. काही कारणास्तव पिशवी खराब झाली किंवा फाटली असेल, तरी देखील ती परत केल्यावर पूर्ण अनामत रक्कम मिळणार आहे. याशिवाय जुनी कापडी पिशवी देऊन नवी पिशवी घेण्याची सोय देखील उपलब्ध करण्यात आली आहे, असेही मोन्सेरात यांनी सांगितले.

महानगरपालिकेच्या ‘आरआरआर’ केंद्रात दान केलेल्या कपड्यांपासून पिशव्या तयार करण्यात येत आहेत. शहरातील विविध भागांतील गटारामध्ये प्लास्टिक पिशव्या दिसून येत आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावर पाणी साचून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ‘आमची पोती’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे, असेही मोन्सेरात यांनी सांगितले.

मांडवी तीरावरील अष्टमीच्या फेरीमध्ये ‘आमची पोती’चे तीन स्टॉल उभारण्यात येणार आहेत. उपक्रमात यश आल्यास शहरात अन्यत्र देखील अशी सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही मोन्सेरात यांनी सांगितले.

महानगरपालिकेतर्फे पणजी बाजार तसेच अष्टमीच्या फेरीत प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांना 5 ते 10 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे, असे मोन्सेरात यांनी सांगितले.

प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे. पणजी महानगरपालिकेचा कापडी पिशवीचा उपक्रम स्तुत्य आहे. नागरिकांनी बाजारात येताना स्वतःची कापडी पिशवी घेऊन आले पाहिजे किंवा मार्केटमध्ये कापडी पिशवी भाड्याने घेतली पाहिजे, असे कावी चित्रकार सागर नाईक मुळे यांनी सांगितले. यावेळी उपमहापौर संजीव नाईक, नगरसेवक प्रमेय माईणकर, फरदिन सिल्व्हेस्टर, आदित्य कुमार यांची उपस्थिती होती.