प्लाझ्मा उपचार पद्धती चालूच ठेवणार

0
331

>> आरोग्यमंत्र्यांची माहिती, २६३ जणांवर प्लाझ्मा थेरपी

गंभीर अवस्थेतील कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी प्लाझ्मा उपचार पद्धतीचा बराच फायदा होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ही उपचार पद्धती चालूच ठेवण्यात येणार असल्याचे काल आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्याशिवाय कोरोनाचा संसर्ग आटोक्यात ठेवता यावा यासाठी रोज किमान २००० ते २५०० जणांचे स्वॅब तपासणीसाठी गोळा केले जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.

मागील काही दिवस राज्यात कोविड रुग्णांचा आकडा कमी झाला असल्याचे आढळून आलेले असले तरी रुग्ण कमी झाले असे समजून खोटे समाधान बाळगण्यात अर्थ नाही. मागील काही दिवस चाचण्यांची संख्याही कमी होती असे ते म्हणाले. आता परत एकदा चाचण्यांची संख्या वाढवण्यात येणार असून त्यासाठी रोज किमान २००० ते २५०० जणांचे स्वॅब गोळा करण्यात येतील, असे राणे यांनी स्पष्ट केले.

आतापर्यंत ज्या कोविड रुग्णांना प्लाझ्मा थेरपी देण्यात आली व रेमडेसीवीर औषध देण्यात आले ते रुग्ण लवकर बरे झाल्याचे आढळून आल्याने राणे यांनी नमूद केले.
सरकार सामान्य लोकांसाठी मोफत चाचण्या करीत असून जर राज्यातील मोठ्या कंपन्यांना (मोप विमानतळाचे काम करणार्‍या कंपनीसह) आपल्या कर्मचार्‍यांची कोविडसाठीची चाचणी करायची असेल तर ती त्यांनी पैसे मोजून खासगी प्रयोगशाळेतून करून घ्यावी.

३५०० कीट्‌सचे वितरण
आपल्या घरी विलगीकरणात राहणार्‍या कोविड रुग्णांसाठी सरकारने आतापर्यंत ३५०० होम आयसोलेशन कीट्‌सचे वितरण केले. तर ४ हजार किट्‌सचा स्टॉक सरकारकडे शिल्लक असल्याची माहिती त्यांनी यावेळी पुढे बोलताना दिली. मडगाव येथील जुन्या हॉस्पिसियो इस्पितळात ‘पोस्ट कोविड केअर सेंटर’ सुरू केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पत्रकार परिषदेला आरोग्य सचिव अमित रुतीजा, गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य संचालक जुझे डिसा आदी हजर होते.

२६३ जणांवर प्लाझ्मा थेरपी
दरम्यान, राज्यात आतापर्यंत २६३ जणांवर प्लाझ्मा थेरपी करण्यात आली आणि ही थेरपी दिलेले रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ७० टक्के एवढे असल्याचेही राणे यांनी यावेळी माहिती देताना स्पष्ट केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, ज्या रुग्णांना प्लाझ्मा थेरपी, रेमडेसीवीर व स्टेरॉईड असे उपचार देण्यात आले त्या रुग्णांना कोविडविरुद्ध लवकर लढा देता आल्याचे दिसून आले. कोरोनाचा संसर्ग झालेले जास्तीत जास्त रुग्ण शोधून काढायचे असतील तर रोज किमान २००० ते २५०० जणांची कोरोनासाठीची चाचणी व्हायला हवी, असे आपले वैयक्तिक मत असल्याचे राणे म्हणाले.