प्रेरणास्त्रोत

0
138

इस्त्रोच्या चंद्रयान – २ च्या विक्रम लँडरशी संपर्क साधण्याच्या उरल्यासुरल्या सगळ्या आशा त्याच्या ७ सप्टेंबरच्या प्रक्षेपणानंतर चौदा दिवसांत म्हणजे गेल्या आठवड्यात २१ सप्टेंबरला संपुष्टात आल्या होत्या. ‘विक्रम’ जेथे उतरणार होते, त्या ठिकाणाच्या वरून जाणार्‍या स्वतःच्या लुनर ऑर्बिटरने टिपलेली काही छायाचित्रे ‘नासा’ ने काल जारी केली आहेत, त्यामध्येही ‘विक्रम’ चा थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे ‘विक्रम’ ने चंद्रावर हलकेच उतरण्याऐवजी ते भरवेगाने त्यावर आदळले असावे असे ‘नासा’ ला वाटते आहे. परंतु त्यासंबंधी खात्रीलायक असे काहीही सांगणे अजूनही शक्य झालेले नाही. एक गोष्ट या सार्‍यातून स्पष्ट झाली आहे ते म्हणजे ‘विक्रम’ चंद्रावर उतरवण्याचा आपला प्रयत्न अयशस्वी ठरला आहे हे आता मान्य करण्याची वेळ आली आहे. ते चंद्रावर उतरत असताना शेवटच्या तीन मिनिटांत ते चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या तीनशे मीटरवर असताना त्याच्याशी संपर्क तुटला होता. त्यामुळे ते नियोजनाबरहुकूम चंद्रावर उतरले असेल या आशेने त्याच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न आजवर चालले होते, परंतु त्याच्यावरील सौर बॅटरीचा कार्यकाल चंद्रावरील एका दिवसाचा म्हणजे पृथ्वीवरील चौदा दिवसांपुरताच होता, त्यामुळे हे चौदा दिवस उलटल्याने आता ते यदाकदाचित अस्तित्वात असले तरी त्याच्याशी संपर्क साधणे निव्वळ अशक्य असेल. ‘नासा’च्या ताज्या छायाचित्रांत त्याचे अवशेष तरी दिसतील अशी अटकळ होती, परंतु त्याचा कोणताही अंश त्यात दिसून येत नाही. नासाचे हे ऑर्बिटर जेव्हा वरून चालले होते, तेव्हा चंद्राच्या पृष्ठभागावर मोठमोठ्या सावळ्या पडल्या होत्या, त्यामुळे त्यातल्या एखाद्या सावळीमध्ये ते लपले गेले असेल असे ‘नासा’ ला वाटते आहे. त्यामुळे पुन्हा जेव्हा हे ऑर्बिटर येत्या चौदा ऑक्टोबरला चंद्राच्या त्या प्रदेशावरून जाईल, तेव्हा तेथे उजेड असल्याने कदाचित विक्रमचा थांगपत्ता लागू शकेल. ह्या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत. मात्र, या सार्‍या घडामोडींमधून एक गोष्ट सिद्ध झाली आहे ती म्हणजे ‘विक्रम’ चंद्रावर उतरवणे जरी इस्रोला शक्य झालेले नसले, तरी संपूर्ण देश त्याच्या पाठीशी आजही ठामपणे उभा आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये शंभर टक्के यशापयशाची खात्री कधीच देता येत नसते. शिवाय अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या चांद्र मोहिमांमध्ये अपयश येण्याचे प्रमाणही मोठे असते. १९६५ पासून आजवर चंद्रावर ज्या १०९ मोहिमा राबवल्या गेल्या, त्यापैकी केवळ ६१ यशस्वी ठरल्या. त्यातील ४६ मोहिमांत चंद्रावर यान उतरवण्याचा प्रयत्न झाला, त्यापैकी केवळ २१ यशस्वी झाल्या आहेत. चंद्रयान -२ चे विक्रम लँडर तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या अंधार्‍या प्रदेशात उतरणार होते. तेथील विवरांमुळे काही भागांत कायमचा अंधार असतो. तेथील तापमान शून्याखाली दोनशेच्या आसपास असते. ‘विक्रम’ शी संपर्क तुटल्यानंतर सातत्याने तो पुनःप्रस्थापित करण्याचे जोरदार प्रयत्न झाले. ते उतरत असतानाचा टेलिमॅट्रिक डेटा, शेवटच्या काही मिनिटांत त्यावरून पाठवले गेलेले सिग्नल, चंद्राचे परिभ्रमण करणार्‍या ऑर्बिटरने पाठवलेली माहिती, इतकेच नव्हे, तर ‘नासा’ नेही सहकार्याचा हात पुढे केला होता. उपलब्ध माहितीचे विश्लेषण अजूनही सुरू आहे. त्यानंतरच ‘विक्रम’ च्या बाबतीत शेवटच्या क्षणी काय घडले त्याचा अंदाज येऊ शकेल. अर्थात, ‘विक्रम’ अपयशी ठरल्याचे आता जवळजवळ स्पष्ट झालेले असले, तरी त्याचे चंद्राभोवती परिभ्रमण करणारे ‘ऑर्बिटर’ सुस्थितीत आहे व व्यवस्थित काम करते आहे. चंद्रयान – १ नेही आपली कामगिरी फत्ते केली होती. चंद्रावर हेतुतः आदळवण्यात आलेल्या त्याच्या उपकरणांनी इस्रोला हवी असलेली माहिती चोखपणे पाठवली होती. ‘इस्रो’चे मंगलयानही पहिल्याच प्रयत्नात सफल ठरले होते. आता इस्रोला ‘गगनयान’ चे वेध लागलेले आहेत. त्यामुळे ‘चंद्रयान २’ चे अपयश विसरून भविष्याला नव्या उत्साहाने सामोरे जाणेच योग्य ठरेल. ‘चंद्रयान’ मोहिमेचे ते शेवटचे क्षण अवघ्या देशाने डोळ्यांत प्राण आणून अनुभवले होते. ही चांद्र मोहीम ९८ टक्के यशस्वी ठरली असल्याचे इस्रोचे प्रमुख कैलासवडिपु सिवन म्हणाले आहेत. ‘विक्रम’चे चंद्रावर उतरणे व त्यातून प्रग्यान बाहेर येणे हा त्याचा कळसाध्याय ठरला असता, परंतु दुर्दैवाने ते घडले नाही. परंतु या एकूण मोहिमेने जी वैज्ञानिक जागृती या देशामध्ये विशेषत्वाने नव्या पिढीमध्ये निर्माण केली आहे, ती अभूतपूर्व आहे. किती जनसामान्य या मोहिमेच्या अपयशाने हळहळले, किती मुले या चांद्रमोहिमेने भारली गेली, किती मुलांमध्ये अवकाश संशोधनासंबंधी प्रेरणा निर्माण झाली याचे मोजमाप करता येणार नाही. देशामध्ये वैज्ञानिक जाणिवांचे एक नवे पर्व या मोहिमेने निर्माण केले आहे. त्याचा योग्य वापर करीत नव्या पिढीला मूलभूत संशोधनक्षेत्राकडे आकृष्ट करण्याचे काम आता भारत सरकारचे आहे. आज भारताची ‘इस्रो’ प्रगत अमेरिकेच्या ‘नासा’च्या खांद्याला खांदा लावून उभी आहे. तिचा झेंडा असाच फडकता ठेवायचा असेल, तर नव्या पिढीमध्ये ‘चंद्रयान’ मोहिमेने रुजवलेल्या संकल्पबीजांना खतपाणी जरूरी असेल!