प्रादेशिक आराखडा प्रश्‍नावरून कॉंग्रेस आंदोलनाच्या तयारीत

0
92

भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी आपल्या जाहीरनाम्यातून सत्तेवर आल्यास प्रादेशिक आराखडा अधिसूचित केला जाईल, असे आश्‍वासन जनतेला दिले होते. तसेच सत्तेवर आल्यानंतर २०१२ साली राज्यपालांच्या अभिभाषणातूनही नवा प्रादेशिक आराखडा अधिसूचित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, सरकार सत्तेवर येऊन तीन वर्षांचा काल पूर्ण होण्यास आला असताना अजून प्रादेशिक आराखड्यासाठीची प्रक्रिया सरकारने सुरू केलेली नाही. या पार्श्‍वभूमीवर गोवा बचाव अभियानच्या धरतीवर कॉंग्रेस आंदोलन सुरू करणार असल्याचे कॉंग्रेसचे प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी काल येथे पत्रकार परिषदेत सांगितले.प्रादेशिक आराखड्याच्या मुद्यावरून त्यासंबंधी आवाज उठवणार्‍या विविध बिगर सरकारी संघटना, अन्य संस्था, पंचायत स्तरावरील लोक अशा सर्व घटकांची भेट घेऊन आम्ही एक चळवळ उभी करण्याचा विचार करीत आहोत असे कवठणकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना यतीश नाईक म्हणाले की, प्रादेशिक आराखड्याच्या प्रश्‍नावरून विविध बिगर सरकारी संघटनांनी त्यांची वेळोवेळी भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी आपण कामात व्यस्त असल्याचे सांगून वेळ मारून नेली. लोकांना सरकारने प्रादेशिक आराखड्या संदर्भात झुलवत ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रश्‍नावरून आंदोलन करण्यासंदर्भात तयारी चालू असल्याचे ते म्हणाले.