प्रादेशिक आराखडा : कागदपत्रे तज्ज्ञ समितीसह तपास यंत्रणेकडे

0
6

>> लवकरच सोपवणार; नगरनियोजनमंत्र्यांची माहिती; 7 सदस्यीय समितीची स्थापना

प्रादेशिक आराखडा-2021 च्या स्थापनेपासूनची कागदपत्रे, योजना, बैठकीचे इतिवृत्त आणि राज्यस्तरीय समितीची भूमिका या संबंधीची सर्व कागदपत्रे आपल्या कार्यालयाने ताब्यात घेतली आहेत, अशी माहिती नगरनियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी काल दिली. तसेच ही कागदपत्रे कलम 17 (2) अन्वये तज्ज्ञ समितीसह तपास यंत्रणेकडे सोपवली जातील. त्यानंतर येत्या तीन महिन्यांत होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनापूर्वी प्राथमिक चौकशी अहवाल तयार केला जाईल, असेही राणेंनी स्पष्ट केले. दरम्यान, 6 कोटी चौरस मीटर जमिनीच्या रुपांतरण छाननीसाठी मुख्य नगरनियोजकांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.

प्रादेशिक आराखडा 2021 च्या तयार करण्याच्या कामातील राज्यस्तरीय समितीची भूमिका तपासली जाणार आहे. राज्यस्तरीय समितीने खासगी मालमत्तेवर स्मशानभूमी देखील जमीन संपादन न करता दाखविल्याचे आपल्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. राज्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे चांगले आहे; परंतु त्या पायाभूत सुविधा राज्य सरकारने स्वत: तयार करणे आवश्यक आहे. खासगी मालमत्ता हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यांची एनओसी घेतली गेली पाहिजे किंवा जमीन सरकारने संपादित केली पाहिजे. अनेक लोकांच्या मालमत्तेवर रस्ते हे दुसऱ्याच्या निहित स्वार्थासाठी त्यांची विभागणी करताना दाखवले गेले. त्यामुळे या प्रकरणांची सखोल चौकशी झाली पाहिजे, असे राणे यांनी म्हटले आहे.

नगरनियोजन खात्याकडून प्रादेशिक आराखडा 2021 मध्ये रुपांतरित केलेल्या जमिनी पुन्हा पूर्वपदावर आणण्यात सुरुवात केली आहे. नगरनियोजन खात्याकडून जमीनमालकाकडून जमीन रुपांतराबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर चौकशी करून कार्यवाही केली जात आहे. कुजिरा येथील सुमारे 3900 चौरस मीटर जमीन प्रादेशिक आराखडा 21 मध्ये शेतजमीन म्हणून नोंद केली होती. सदर जागा आता सेटलमेंट झोन म्हणून नोंद करण्यात आली आहे, असेही राणेंनी सांगितले.

समितीत कोणाचा समावेश?
प्रादेशिक आराखडा 2021 च्या मध्ये रुपांतरित केलेल्या अंदाजे सहा कोटी चौरस मीटर जमिनीची छाननी करण्यासाठी मुख्य नगरनियोजक (नियोजन) राजेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली एका तज्ज्ञ समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये जीसीसीआयचे अध्यक्ष राल्फ डिसोझा, गौतम देसाई, सुजीत कुमार डोंगरे, राजीव सुखटणकर, गेल वेरोनिका आराजुओ, परेश गायतोंडे, नीलेश आमोणकर यांचा समावेश आहे. या समितीच्या सदस्य सचिवपदी विनोद कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.