प्राणशक्तीचे महत्त्व

0
98

योगसाधना- ५१२
अंतरंग योग – ९७

  • डॉ. सीताकांत घाणेकर

आता तरी कोरोनाच्या महामारीमुळे आपण प्राणोपासना करूया व प्राणशक्ती वाढवूया.
आता केवळ कर्मकांडात्मक चर्चा न करता त्यामागील तत्त्वज्ञान व भाव समजून घेऊया. प्राणायामाचे फायदे होतीलच, पण त्याशिवाय आनंदही होईल.

गेल्या दोन वर्षांपासून जग एका भयानक स्थितीतून जात आहे. जगातील प्रत्येक राष्ट्र व व्यक्ती ‘कोरोना’ या छोट्याशा विषाणूमुळे प्रभावित झाली आहे. सुरुवातीच्या काळात लाखो लोक मृत्युमुखी पडले, पण कितीतरी पट अधिक संख्येने कोरोनाने संक्रमित झाले. त्यांच्या प्रारब्धाने ते वाचले. पण अनेक लोक अजूनही भयग्रस्त आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे, प्रत्येक व्यक्तीला आज वेगवेगळ्या पद्धतीने माहिती उपलब्ध होते आहे. एका दृष्टीने हे चांगले असले तरी काहीवेळा चुकीच्या बातम्या व माहिती छापली जाते. त्यामुळे ती व्यक्ती चिंतित होते. म्हणून योग्य शास्त्रशुद्ध बातम्याच वाचणे आवश्यक आहे.

हल्ली तर वॉटस्‌ऍप, फेसबुक… वगैरेंचा पूरच आला आहे. तासन्‌तास लोक त्यांच्या सहवासात असतात. लहान, मोठे, सुशिक्षित, अशिक्षित. कितीतरी मौल्यवान वेळ ते वाया घालवतात आणि वर मन चिंतेने ग्रासते ते वेगळेच.
आकड्यांकडे लक्ष दिले तर सहज लक्षात येईल की कोरोनाचे वैश्‍विक संकट थोडे थोडे आटोक्यात येते आहे. याला अनेक कारणे आहेत.

  • मार्गदर्शनाप्रमाणे आवश्यक गोष्टींचे पालन करणे- मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हातांची सफाई करणे.
  • ‘लॉकडाउन’- सुरुवातीला कडक पण नंतर हळूहळू शिथिलता आणणे.
  • अनेक व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढली तसेच ‘व्हॅक्सिन’ मोहीम सुरू केली. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढली.

यात संशोधक, डॉक्टर्स, नर्सेस, इतर कामगार, तसेच पोलीस… यांचे कष्ट तर आहेतच. त्यामुळे त्यांचे उपकार मानवतेवर सदा राहतील. रुग्णसेवा करता करता अनेकजण कोरोना संक्रमित होऊन मृत्युमुखी पडले. त्यांच्या सत्कार्यामुळे त्यांना सद्गती मिळेलच, पण आम्हीही प्रार्थना करुया!
कोरोना आपले रूप बदलतोच आहे. प्रत्येक विषाणूचा तो स्वभावच आहे. सध्यातरी माहीत झालेले अल्फा, बिटा, गॅमा, डेल्टा, डेल्टा प्लस… हे आहेत. व्हॅक्सिनचा परिणाम या सर्वांवर कसा व किती होतो यावर सखोल संशोधन चालू आहे. थोड्या काळानंतर योग्य उत्तर मिळेलच, पण तोपर्यंत प्रत्येकाने सकारात्मक भाव ठेवणे आवश्यक आहे. सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

प्राथमिकतेनुसार वेगवेगळ्या गटांना व्हॅक्सिनेशन केले गेले आहे. आता बाकी राहिले आहेत ते तरुण. त्यांनी आवश्यक ती बंधने पाळायला हवीत. योग्य शाकाहारी आहार, सात्विक भोजन, औषधे त्यांच्याबरोबरच नियमित शास्त्रशुद्ध योगसाधना केली तर यांची रोगप्रतिकारशक्ती वाढेलच, पण त्याचबरोबर आत्मशक्तीदेखील वाढेल. विषाणूशी समर्थपणे लढा द्यायला या शक्ती गरजेच्या आहेत.
आज आपण विचार करीत आहोत तो विषय म्हणजे- प्राणोपासना. वेद व विविध उपनिषदांमध्ये यासंदर्भात चांगले श्‍लोक आहेत. अत्यंत ज्ञानपूर्ण व उपयुक्त असे आहेत.

प्राणः प्रजा अनुवस्ते पिता पुत्रमित प्रियम्‌|
प्राण ही सर्वस्य ईश्‍वरो नश्‍च प्राणति यथा न्‌|

  • अथर्ववेद
    जसे वडील मुलांसाठी असतात तसाच प्राण सर्वांसाठी आहे. प्राण हा सगळ्या ब्रह्मांडाचा स्वामी. याचा अर्थ प्राण सर्व ब्रह्मांडात आहे. प्राणशक्ती अगदी छोट्याशा व मोठ्या झाडांतदेखील आहे. त्याची दोन उदाहरणे जाणकार देतात.
    १. लाजरी ः छोटेसे लाजरीचे झाड. थोडीशी हवा आली अथवा फुंकर मारली किंवा हात लावला तरी लगेच त्याची पाने मिटतात.
    २. ‘ड्रॉसरा’ः हे झाड बहुधा आफ्रिकेत दिसते. त्याच्या पानावर कुठलाही जीव बसला की ते झाड एक चिकट द्रवपदार्थ लगेच निर्माण करते व त्या जिवाला त्यात अडकवते व आपला भक्ष्य बनवते. शास्त्रकार सांगतात की हे सर्व त्या झाडातील प्राणशक्तीमुळे घडते.
    ‘अथर्ववेदा’मध्ये या प्राणाच्या संदर्भात आणखी एक श्‍लोक आहे ः
    यदा त्वं प्राणं चिन्तस्वथ स जायते पुनः|
    ज्यावेळी आपण प्राणशक्तीचे चिंतन, ध्यान करतो त्यावेळी ती शक्ती कार्यरत होते.

‘प्रश्‍नोपनिषदा’मध्येही असाच एक भावपूर्ण श्‍लोक आहे ः
प्राणस्वेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम्‌|
मातेव पुणान रक्षस्व श्रीश्‍च प्रज्ञांश्‍च विधेहि न इति॥

  • तिन्ही जगात (स्वर्ग, पृथ्वी, पाताळ) जे-जे काही आहे ते सगळे प्राणाच्याच नियंत्रणात आहे. हे प्राणा! जशी माता आपल्या मुलांचे रक्षण करते तसेच तू आम्हाला राख व ऐश्‍वर्य आणि ज्ञान दे. ही प्रार्थना प्राणायाम करण्याच्या आधी म्हणायची असते. पण फक्त ती पाठांतर करून उपयोगाचे नाही तर त्याचा शब्दार्थ, गर्भितार्थ समजून घेऊन म्हटली तर फायदा निश्‍चितच वाढेल. या प्रार्थनेच्या खोलात जाऊन थोडे चिंतन केले तर लगेच लक्षात येते की-
    प्राण तिन्ही जगांत आहे. तसेच जे आहे ते सर्व प्राणाच्या नियंत्रणात आहे. याचा अर्थ असा समजला पाहिजे की, हे तिन्ही लोक एवढे विस्तृत आहेत की त्यात कितीतरी गोष्टी आहेत. त्या सगळ्या प्राणांच्या नियंत्रणात आहेत म्हणजे प्राण ही केवढी मोठी जबरदस्त शक्ती आहे बघा.
    आपल्या ऋषींनी या शक्तीला मातेची उपमा दिली आहे. एवढेच नव्हे तर ती आपले रक्षण करते हेदेखील अभिप्रेत आहे. आपण तिच्याकडे भ्रामकपणे मागणी करतो की आमचे रक्षण कर. तसेच ऐश्‍वर्य व ज्ञान दे! हे दोन शब्द फार विस्तृत आहेत. ऐश्‍वर्य म्हणजे फक्त धनधान्य नाही तर सर्व ऐश्‍वर्य… बुद्धी, भाग्य, प्रारब्ध, संचित… सगळे काही अपेक्षित आहे. त्याशिवाय पंचमहाभूते- पृथ्वी, जल, वायू, तेज, आकाश हीसुद्धा सहभागी आहेत.

‘ज्ञान’ हा शब्ददेखील फार मोलाचा आहे. फक्त जीविका चालविण्यासाठी आपण ज्ञान मागत नाही. ते तर पाहिजेच. नाहीतर आपले या विश्‍वातील अस्तित्वच संपेल. पण अभिप्रेत आहे ते म्हणजे जीवनाचे, जीवनविकासाचे ज्ञान. हे ज्ञान भारतीय तत्वज्ञान व साहित्यात मुबलक उपलब्ध आहे… वेद, उपनिषदे, गीता, महाकाव्ये.. पण सहसा आपण या असल्या ज्ञानाची अपेक्षा करीत नाही. कारण हे ज्ञान भौतिक गरजा पुरवणारे नाही.
आज मानवाची बुद्धी एवढी उथळ झाली आहे, तसेच ती षड्‌रिपूंनी- काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, स्वार्थ व अहंकाराने- बरबटलेली आहे की त्यामुळे मानवाचे अधःपतनच होत आहे.

एवढी श्रेष्ठ प्राणशक्ती आपल्या शरीरात स्थायिक होऊन शरीराचे सर्व व्यवहार- इंद्रिये, मन, बुद्धी चालवते हे लक्षात आल्यावर वाटते की भगवंताचे आपल्या अपत्यांवर तसेच सर्व सृष्टीवर किती अगाध प्रेम आहे! पण दुर्भाग्य म्हणजे ही गोष्ट आपल्या लक्षातदेखील येत नाही; मग त्या शक्तीची कृतज्ञता व्यक्त करायची गोष्टच सोडा! तसेच योग्य उपासना करायला हवी हेदेखील आपल्याला माहीत नाही.

खरेच, आपले ऋषी-महर्षी किती महान आहेत! त्यांनी या अद्भुत शक्तीचे ज्ञान विविध पातळीवर करून दिले. वेद, उपनिषदे, योगशास्त्र, श्रीमद् भगवद्गीता, स्तोत्रे… तसे पाहिले तर क्षणोक्षणी आम्हाला त्या अदृश्य शक्तीची जाणीव व्हायला हवी.
आतातरी कोरोनाच्या महामारीमुळे आपण प्राणोपासना करूया व प्राणशक्ती वाढवूया.

योगसाधक प्राणायाम करीत असतीलच, पण आता आपण फक्त कर्मकांडात्मक चर्चा न करता त्यामागील तत्त्वज्ञान व भाव समजून घेऊया. प्राणायामाचे फायदे होतीलच, पण त्याशिवाय आनंदही होईल- तोदेखील एकच असा अतिंद्रिय परमानंद.

चित्रे ः दोन झाडे
१) लाजवंती
२) ड्रोसेरा
३) प्राणायाम