प्राचार्य गोपाळराव मयेकर यांचे निधन

0
252

>> गोमंतकाच्या मराठी चळवळीचा आधारस्तंभ हरपला

>> म्हापसा येथे आज अंत्यसंस्कार

माजी खासदार, गोव्याचे माजी शिक्षणमंत्री, ज्येष्ठ साहित्यिक, अमोघ वाणी लाभलेले ज्ञानेश्‍वरीचे गाढे अभ्यासक, प्राचार्य, विद्यापीठ संलग्न महाविद्यालय विकास मंडळाचे संचालक आणि शिक्षणाबरोबरच साहित्य, कला, संस्कृती अशा जीवनाच्या विविधांगांना स्पर्श करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व प्राचार्य गोपाळराव मयेकर (८७) यांचे काल गुरूवार दि. २ जुलै रोजी रात्री ८.३० वा. गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात अल्प आजाराने निधन झाले.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मंगळवारी म्हापसा येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तेथे कोविड अँटिजेन चाचणीत ते पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना दोन दिवसांपूर्वी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली ती निगेटिव्ह आली होती. मात्र, काल रात्री जेवण घेत असताना अचानक त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर म्हापशात अंत्यसंस्कार होतील, परंतु कोविडचा संसर्ग झाल्याचा कयास व्यक्त झालेला असल्याने व सध्या संचारबंदी असल्याने अंत्यसंस्कारांस मोजक्याच व्यक्तींना उपस्थित राहता येणार आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी उषा, पुत्र शैलेंद्र व राजेंद्र, कन्या सौ. रेश्मा, नातवंडे असा परिवार आहे.

प्रा. मयेकर यांच्या मार्च २०१२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘मज दान कसे हे पडले’ या आत्मचरित्रास महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा ग्रंथपुरस्कार लाभला होता. २००५ मध्ये त्यांचा ‘स्वप्नमेघ’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला व त्या एकमेव काव्यसंग्रहाने त्यांना कवीचा मान मिळवून दिला. अलीकडेच गोवा मराठी अकादमीने तो पुनःप्रकाशित केला आहे. ‘अनाहत ध्वनिपत्रे’ या त्यांच्या पत्रसंग्रहाचे प्रकाशन कविवर्य शंकर वैद्य यांच्या हस्ते झाले होते. मयेकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने त्यांच्यावर सोन्याचा पिंपळ हा सद्भाव ग्रंथही प्रकाशित झाला होता.
प्राचार्य मयेकर हे ज्ञानेश्‍वरीचे गाढे अभ्यासक होते. ते मराठी तसेच संस्कृतचे नामवंत प्राध्यापक होते. ज्ञानप्रसारक मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय तसेच देवगड महाविद्यालयाचे प्राचार्य, गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी दिलेले योगदान अपूर्व होते. गोव्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी आपल्या रसाळ व्याख्यानांनी लोकप्रियता मिळवली होती. अनेक थोर साहित्यिकांशी त्यांचा स्नेहभाव होता. ते मराठी भाषेचे जाज्वल्य अभिमानी होते. मराठी राज्यभाषा चळवळीत त्यांनी फार मोठे योगदान दिले होते.

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत ते आमदार व शिक्षणमंत्री झाले. नंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या उमेदवारीवर ते उत्तर गोव्याचे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या निधनाने गोव्याच्या सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

मान्यवरांकडून शोक
लेखणी व वाणीद्वारे अजरामर

गोमंतकाच्या सांस्कृतिक सामाजिक आणि राजकीय जीवनाला नवी दिशा देणारी महान व्यक्ती हरपली. गोमंतकात मराठीचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अतिशय मोलाचे होते. अनेक साहित्यिक, शिक्षक, विद्यार्थी घडवणारा मार्गदर्शक आमच्यातून गेला, मयेकर सरांना कसला येणार मृत्यू? त्यांचे ग्रंथ व वाणी यातून मयेकर सर सदैव आमच्यामध्ये असतील.

  • अनिल सामंत
    अध्यक्ष, गोवा मराठी अकादमी
    प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्व पडद्याआड
    प्राचार्य गोपाळराव मयेकर यांच्या निधनाने गोमंतकातील एक प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. मराठी व संस्कृतचे नामवंत प्राध्यापक तसेच कुशल प्रशासक म्हणून त्यांनी नावलौकिक प्राप्त केला होता. त्यांचे मराठी भाषा व साहित्यावर निस्सीम प्रेम होते. त्यांना अमोघ वाणी लाभली होती. संतवाङ्‌मयाचे व्यासंगी विद्वान तसेच प्राचीन व आधुनिक वाङ्‌मयाचे ते गाढे अभ्यासक होते. त्यांच्या जाण्याने सांस्कृतिक जगताचे समर्थपणे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्त्व लोप पावले आहे.
  • डॉ. सोमनाथ कोमरपंत
    ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक
    सांस्कृतिक क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व
    प्राचार्य मयेकर हे साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी मराठी भाषा व साहित्यासाठी दिलेले योगदान कधीच विसरता येणार नाही. त्यांच्या जाण्याने एक व्यासंगी, विद्वान साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ व वक्ता हरवला आहे. राजकारणात वावरूनही त्यांनी आपली प्रतिभा निष्कलंक राखून आदर्श निर्माण केला.
  • दशरथ परब
    अध्यक्ष, इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा

साहित्यसंपदा
ज्ञानदेव संकीर्तन, समष्टी चिंतन
ज्ञानेश्‍वरांची पसायदानाची अपूर्वाई
स्वप्नमेघ (काव्यसंगह)
मज दान कसे हे पडले (आत्मचरित्र)
सोन्याचा पिंपळ (गौरवग्रंथ)
अनाहत ध्वनिपत्रे
श्री ज्ञानदेवांचे अध्यात्मचिंतन आणि आधुनिक विज्ञान
ज्ञानेश्‍वरीवरील व्याख्यानांच्या विविध सीडीज्